नांदेड (दि. १६ सप्टेंबर) :
मे.वरद कन्स्ट्रक्शनचे प्रमुख विजयराव शिंदे यांनी नुकसानभरपाईसंदर्भातील अन्यायाविरुद्ध काल दिनांक १५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११.४० वाजता सिंचन भवन, नांदेड येथील उर्ध्व पेनगंगा प्रकल्प मंडळ, नांदेड चे अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर उपोषणास प्रारंभ केला होता. या आंदोलनाला महाराष्ट्रातील वडार समाज नेते व कार्यकर्त्यांचा, संघटनांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला होता.
मात्र, उपोषणाची बाब माननीय कार्यकारी संचालक व अधीक्षक अभियंता मा. कचकलवार साहेब यांच्याकडे तात्काळ पोहोचविण्यात आली. त्यानंतर कचकलवार साहेबांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून केवळ एका दिवसात शिंदे यांच्या मागणीप्रमाणे लेखी आदेशपत्र दिले. उपोषणकर्त्यांशी व समाजनेत्यांशी समन्वय साधून त्यांच्या समस्या प्रामाणिकपणे ऐकून घेतल्या. तसेच उपोषण सोडावे यासाठी स्वतःहून पुढाकार घेऊन समुपदेशन केले.
त्यांच्या या तत्परतेमुळे व न्याय्य निर्णयामुळे विजयराव शिंदे यांनी तसेच पाठींबा देणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी काल संध्याकाळी सुमारे ७ वाजता उपोषण मागे घेतले.
वडार समाज संघ, महाराष्ट्र राज्य तसेच सकल वडार समाजाने व इतर संघटनांनी या प्रकरणी कचकलवार साहेबांनी दाखविलेल्या संवेदनशीलता, कार्यतत्परता व न्यायनिष्ठ निर्णयाचे मनःपूर्वक कौतुक केले आहे. सदर न्याय्य मागण्यांबाबत त्यांनी दाखविलेली सकारात्मक भूमिका ही आदर्शवत असल्याचे मत उपोषणाला पाठिंबा देणार्या नेत्यांंनी व्यक्त केले.
माननीय अधीक्षक अभियंता कचकलवार साहेब यांच्या कार्यपद्धतीमुळे शासन व सामान्य जनता यांच्यातील विश्वास अधिक दृढ होत असल्याचेही समाजनेत्यांनी सांगितले. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी संपूर्ण वडार समाजाकडून व सर्व उपोषणाला बसलेल्या सर्व वेगवेगळ्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
०००००

