प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी :
केज शहरातील क्रांती नगर भागातगेली तब्बल २५ वर्षे भेडसावणाऱ्या पाणी प्रश्नावर मात करत, नगरसेवक अझहर इनामदार यांच्या अथक प्रयत्नांना यश आले आहे. त्यांच्या वार्ड क्र. 01, क्रांती नगर भागासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा पाईप लाईनच्या कामाची प्रत्यक्ष सुरुवात 14/11/2025 रोजी झाली आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे आता या भागातील माता-माऊलींची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबणार आहे, ज्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून मोठा त्रास सोसला आहे.
नगरसेवक अझहर इनामदार यांनी या कामाच्या सुरुवातीबद्दल तीव्र भावना व्यक्त केल्या. "मागील ४ वर्षांपासून निवडून आल्यानंतरही, सातत्याने पाठपुरावा, निवेदन आणि उपोषण करूनही पाण्याची सुविधा मिळवण्यासाठी ४ वर्षे लागली, याची खंत आहे. मात्र, आज केलेल्या प्रयत्नाचे चीज होत आहे आणि प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली याचा मनस्वी आनंद वाटतो," असे त्यांनी सांगितले.
स्वतंत्र नळ आणि हक्काचे पाणी: अझहर इनामदारांचे स्वप्न साकार
अझहर इनामदार म्हणाले की, "माझ्या प्रभागातील प्रत्येक घराला स्वतंत्र नळ आणि धनेगाव पाईप लाईनचे हक्काचे पाणी मिळावे हे माझे स्वप्न होते, जे आज साकार होण्यास सुरुवात झाली आहे. मागील २५ वर्षांचा प्रश्न आता मार्गी लागणार, यात मी साथीदार म्हणून खूप मोठे भाग्य मानतो."
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) शहराध्यक्ष असलेल्या अझहर भाई इनामदार यांनी या महत्त्वपूर्ण कामासाठी माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे विशेष आभार मानले. मुंडे यांच्या सहकार्यानेच क्रांती नगरचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्याच्या दिशेने ठोस पाऊल पडले आहे.
या कामाच्या उद्घाटनामुळे क्रांती नगरमधील रहिवाशांमध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण आहे. आता लवकरच प्रत्येक घरात स्वच्छ आणि पुरेसा पाणीपुरवठा सुरू होईल, अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे.


