shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जातीमध्ये विभागलेला शेतकरी मातीसाठी एकवटला नागपूरच्या आंदोलनाचे यश ऍड. पांडुरंग औताडे (मो. ९८९०२७३६५६)


✍️ 

भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. संविधानानुसार धर्मनिरपेक्षता हा येथील गाभा आहे. परंतु राजकीय नीती-मूल्ये पायदळी तुडवलेल्या या देशात धर्मवाद मोठ्या प्रमाणात निर्माण झाला. या गोष्टीचा फायदा सर्वच राजकीय पक्षांनी घेतला. विविधतेत एकात्मता ही बाब कुठेतरी मागे पडली.

महाराष्ट्र हे भारतातील प्रगतशील राज्य. भौगोलिक आणि नैसर्गिक वरदान लाभलेला महाराष्ट्राने संत विचार दिले. भारताचा विचार हा महाराष्ट्राचा विचार आहे. परंतु अलीकडच्या काळात प्रचंड जातिवाद वाढविण्यासाठी राजकीय शक्ती प्रयत्नशील होत्या. निवडणुका जिंकण्यासाठी मोठ्या प्रमाणात याचा वापर झाला.

“हे शास्त्र चालतंय म्हटल्यावर ते कोणावर चालतं?” — यापेक्षा राजकारण्यांना चालतं, हा प्रश्न नागरिकांसमोर उभा राहतो. नागरिकांचा सर्वांगीण विकास करण्यापेक्षा तोटा कसा करता येईल हे पाहिले जाते. मातीच्या प्रश्नाशी जातीचा प्रश्न सोडवण्याची ताकद आहे, हे सर्वांना माहिती असतानाही निवडणुकीचे राजकारण हेरले जात नाही, हेच दुर्दैव.

मोठमोठाले मोर्चे निघाले, प्रत्येकाने जातीला महत्त्व दिले, परंतु मातीतला शेतकरी सर्व जातींचा. जवळजवळ सहा लाख आत्महत्या झाल्या, परंतु कोणी विचारत नव्हते. ध्येयवेडी माणसे असतात, त्यात प्रहारचे बच्चुभाऊ कडू यांनी निवडणुकीत पराभव झाला तरी लढाऊ बाणा सोडला नाही.

सुरुवात केली ती छत्रपतींच्या रायगडच्या पायथ्याची माती कपाळी लावून — तीन दिवस उपोषण करून. त्यानंतर आमदारांच्या घरासमोर मशाल आंदोलन, पालकमंत्री यांच्या घरासमोर रक्तदान, पायदळ यात्रा आणि जिल्ह्यात शेतकरी जनजागृती सभा यांच्या माध्यमातून शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न लावून धरला.


---

🔹 जरांगे पाटील यांची उपस्थिती — आंदोलनाला नवी दिशा

शेतकऱ्यांना आंदोलन स्थळ सोडण्याचे आदेश येताच, जरांगे पाटील यांची भेट सत्ताधाऱ्यांना हादरवणारी ठरली.
त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, “शेतकरी पुत्र म्हणून या ठिकाणी आलो आहे. त्यामुळे जातीचे बंधन गळाले आणि मातीचे बंधन आंदोलनाला मिळाले.”
जो संदेश सरकारला जायचा होता, तो गेला — आणि सरकार नमले.
या सर्व शक्ती एकत्र येणार, ही बाब सरकारला माहीत असल्याने आंदोलनाची बदनामी सुरू झाली.
परंतु ३० तारखेनंतर पुढे काय होईल हे होऊ नये म्हणून किंमत नसलेले लोक वापरले जाऊ लागले आहेत.


---

सर्वात शेवटी म्हणजे नागपूरात महा एल्गार — यात वामनराव चटप, बच्चुभाऊ कडू, महादेव जानकर, राजू शेट्टी, डॉ. अजित नवले, निलेश कराळे, प्रकाश पोहरे, प्रशांत डिक्कर, प्रा. यशवंत गोसावी आणि रविकांत तुपकर यांची एकजूट दिसली.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे दिव्यांग नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. धर्म बाजूला, जात बाजूला — सत्ताधाऱ्यांना जे नको तेच झाले. कारण शेतकऱ्यांना कोणतीही जात नसते.

हे आंदोलन यशस्वी की अयशस्वी, हे येणारा काळ ठरवेल. भाजप प्रचंड सत्तेत आहे, अनेक प्रस्थापित घराच्या बाहेर पडायला तयार नाहीत. सत्ताधाऱ्यांना भीती आहे की आंदोलन तीव्र झाले तर जनमत बदलू शकते.

आंदोलकांच्या हातात आंदोलन करणे असते, निर्णय घेणे सत्ताधाऱ्यांच्या हातात असते. तरीही शेतकरी एकजूट जात-धर्म सोडून राहिली तर कर्जमाफीचा निर्णय घ्यावाच लागेल.

कर्जमाफी ही शेतकऱ्यांच्या भळभळत्या जखमेवरची मलमपट्टी आहे. अनेक समस्या आहेत, परंतु “बुडत्याला काडीचा आधार” या म्हणीप्रमाणे कर्जमाफी एक आशेचा किरण आहे.

३० तारखेला कर्जमाफी होईल की नाही हे माहीत नाही, परंतु जाती सोडून मातीसाठी लढलेले शेतकरी हे भले मोठे यशच म्हणावे लागेल.

शेतकरी नेते हक्कासाठी भांडत आले, परंतु एकत्र येत नव्हते — तीही सुरुवात आता झाली आहे. अनेकांचे आयुष्य गेले, त्यांच्यावर आरोप झाले, प्रत्येकाला राजकीय यश-अपयश मिळाले की नाही हे संशोधनाचा भाग ठरेल, पण प्रत्येकाने न्याय देण्याचा प्रयत्न केला.

स्व. जोशी साहेबांनाही सत्ताधाऱ्यांनी जातीवरून टार्गेट केले होते, त्यावेळी शेतकऱ्यांचा तोटा झाला. तसे आता होऊ नये.

दीड दमडीच्या लोकांना शेतकरी आंदोलकांनी जास्त भाव देण्यापेक्षा हेच म्हणायला हवे —
“आपण एकत्र आणू, हेच आपले यश!”

“जिंकू किंवा मरू — माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमचे सुरू!”
जय जवान, जय किसान!
close