गुंडेगाव वनक्षेत्र बिबट्याच्या दहशतीने बनले भयारन्य..
वाळकी प्रतिनिधी :- दिवसेंदिवस अहिल्या नगर तालुक्यातील गावांमध्ये बिबट्याच्या हल्ले वाढत असताना नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्या आढळण्याचे वारंवार घटना पहायला मिळत असुन याच पार्श्वभूमीवर गुंडेगाव येथे ग्रामस्थांना वनविभागाकडून मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी बिबट्याची जीवनशैली, बिबट्याची अन्न साखळी व त्याचे महत्त्व, मानव-बिबट्या संघर्षाची कारणे, संघर्षाचे परिणाम, संघर्ष टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना यासह बिबट्याच्या वावर क्षेत्रात घ्यावयाची खबरदारी? याची सखोल माहिती वनपाल शैलेंद्र बडदे यांनी दिली.
तसेच निसर्ग व प्राणीप्रेमी विद्यासागर पेटकर,वनरक्षक संजय गाडेकर यांनीही नागरिकांना मार्गदर्शन केले असता सांगितले की कधीही बिबट्याचा पाठलाग करू नये.त्याला जखमी करू नये तो उलटा हल्ला करू शकतो,मुलांना एकटे सोडू नये,मुलांनी घोळक्याने फिरावे,अंधारात एकटे फिरताना, परसाकडे जाताना गाणी म्हणा, बोला किंवा बरोबर रेडिओ लावून जावे.बिबट्या दिसल्यास जोरात ओरडा करावा. खाली वाकू नये. किंवा ओणवे झोपू नये. त्याचा कधीही पाठलाग करू नये. रात्री उघड्यावर झोपू नये.सायंकाळी व रात्री अनावधाने देखील एकट्याने बाहेर पडू नये. सोबतीने किंवा समूहाने फिरावे.लहान मुलांची पालकांनी विशेष काळजी घ्यावी. एकट्याला सोडू नये.गावाजवळील मोकाट कुत्रे, बकऱ्या व डुकरे यांची संख्या कमी करणे आपल्या हिताचे आहे.गुरे रात्रीच्या वेळी गोठ्यात बांधताना गोठा सर्व बाजूंनी बंदिस्त राहील याची काळजी घ्यावी.शुढळेश्वर परिसरात बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला असुन बिबट्याचे अस्तित्व जाणवल्यास नजीकचे वनरक्षक यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.व्यासपीठावर वनमंजूर रमेश शेळके,कचरु भापकर,राम भोसले,मा.सरपंच विद्यमान सदस्य संजय कोतकर, सुनिल भापकर, शिवनाथ कोतकर, संतोष भापकर, बाळासाहेब लिंभोरे,प्रमोद पवार, सर्पमित्र विनोद सकट,सागर जावळे,अमोल गाढे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
गुंडेगाव सह इतर गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बिबट्याचे दर्शन होत असल्याचे अनेकांनी समक्ष पाहिले असुन वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या परिसराची पाहणी करीत बिबट्याचे अस्तित्व असल्याचे मान्य केले. वन क्षेत्रातच बिबट्याचा वावर असून, नागरिकांनी जंगल परिसरात जाऊ नये असे आवाहनही विभागाच्या वतीने केले आहे.तसेच बिबट्या वास्तव असलेल्या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला आहे.आपल्या गावात जर कुठे बिबट्या बसलेला दिसला किंवा अडकलेला दिसला तर त्या ठिकाणी न जाता गोंधळ न घालता लगेच वनविभागास माहिती द्यावी.
शैलेंद्र बडदे - वनपाल, वनविभाग नगर.
गावात बिबट्या दिसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे लोकांना घरातून बाहेर पडणे आणि शेतात कामाला जाणेही मुश्किल झाले आहे.आमची मागणी एकच आहे की वनविभागाकडून त्याला पकडण्यात यावे म्हणजे लोकांच्या मनातील भीती कमी होईल.' यासोबतच, रात्री ऐवजी दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणीही ग्रामस्थांनी सरकारकडे केली आहे, जेणेकरून त्यांना शेतीची कामे करता येतील आणि त्यांचे जीवनमान सुरक्षित राहील.
संजय कोतकर - मा.सरपंच,गुंडेगाव, ग्रामपंचायत.

