संपूर्ण जगात २३१ देश असून ८५० कोटी च्या घरात जगाची लोकसंख्या आहे. त्यामध्ये क्रिकेट खेळणाऱ्या देशांची संख्या १२७ च्या आसपास आहे. त्यातही कसोटी दर्जा असलेले फक्त बारा देश आयसीसीचे पुर्ण सदस्य प्राप्त आहेत. बाकी देश आयसीसीचे सहसदस्य देश आहेत. पूर्ण सदस्य देश असलेल्या न्यूझीलंडची जागतिक क्रिकेटमध्ये मोठी छाप आहे. न्यूझीलंडची लोकसंख्या सुमारे ५,३१०,६९५ इतकी आहे. न्यूझीलंड हा आकाराने लहान देश असला, तरी त्यांच्या क्रिकेट संघाने नेहमीच मोठी कामगिरी केली आहे. ते नेहमी आयसीसी मानांकनात पहिल्या पाच संघात असतात. कसोटी क्रिकेटचा विश्वचषक जिंकण्याचा कारनामाही त्यांनी एकदा केला असून वनडे, टी२० या प्रकारातही त्यांची कामगिरी दमदार राहिली आहे. देशाची लोकसंख्या कमी असूनही इतर देशातील गुणवान खेळाडूंना आपल्या राष्ट्रीय संघात सामावून घेण्याचा दिलदारपणा दाखविण्यात त्यांनी नेहमीच मोठेपण दाखविले आहे. याचा फयदा त्यांना आंतरराष्ट्रीय झाल्याचे वेळोवेळी सिद्धही झाले आहे.
गुणवत्तेला राष्ट्रीयतेच्या सीमारेषा नसतात हे तत्व न्यूझीलंड सरकार व त्यांच्या क्रिकेट बोर्डाने शब्दशः पाळल्याचे त्यांच्या संघात प्रतिनिधित्व करत असलेल्या खेळाडूंच्या संख्येवरून स्पष्टपणे जाणवते. न्यूझीलंडच्या भूमीवर अनेक स्थलांतरित खेळाडूंनी केवळ संघात स्थानच मिळवलं नाही, तर संघाच्या विजयात मोलाचा वाटाही उचलला आहे. न्यूझीलंड देशाने व त्यांच्याकडून खेळणाऱ्या परदेशी खेळाडूंनी क्रिकेटचा आत्माच जागतिक केला असल्याचे दिसून येते. प्रस्तुत लेखात आपण न्यूझीलंड संघात प्रतिनिधनित्व केलेल्या करत असलेल्या खेळाडूंविषयी जाणून घेणार आहोत.
किवी संघात विविध देशांत जन्मलेले खेळाडू आजही आपले योगदान देत आहेत — तेच न्यूझीलंड क्रिकेटचं खऱ्या अर्थाने वेगळेपण आहे.
🇿🇦 दक्षिण आफ्रिकन जन्म असलेल्या खेळाडूंचा ठसा : -
दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या खेळाडूंनी न्यूझीलंडच्या कसोटी क्रिकेटमध्ये नवसंजीवनी फुंकली आहे.
ग्रँट इलियट — सन २०१५ च्या विश्वचषकातील सेमीफायनलचा नायक; त्याच्या शांत फलंदाजीने देशाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवले.
नील वॅगनर — अथक परिश्रमाचे प्रतीक. कसोटीत लांब स्पेल टाकणारा, प्रतिस्पर्ध्यांना त्रास देणारा “लायनहार्ट” गोलंदाज.
डेव्हॉन कॉनवे — आधुनिक युगातील न्यूझीलंड फलंदाजीचा आधारस्तंभ. त्याच्या तंत्रात दक्षिण आफ्रिकेची काटेकोर शिस्त आणि न्यूझीलंडचा संयम दिसतो.
🇿🇼 झिंबाब्वेत जन्मलेले खेळाडू : -
कॉलिन डी ग्रँडहोम — झिंबाब्वेत जन्मलेला परंतु न्यूझीलंडमध्ये परिपक्व झालेला ऑलराउंडर. त्याच्या आक्रमक फलंदाजी आणि उपयुक्त गोलंदाजीने संघाला निर्णायक विजय मिळवून दिले. झिंबाब्वेतून स्थलांतर करून आलेल्या या खेळाडूने किवी संघात आत्मविश्वासाचं नवं पर्व सुरू केलं.
🇦🇺 ऑस्ट्रेलियात जन्मलेले पण न्यूझीलंडसाठी खेळलेले खेळाडू : - ल्यूक रॉन्ची — दुर्मिळ उदाहरण; प्रथम ऑस्ट्रेलियासाठी खेळला आणि नंतर न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला. दोन्ही देशांचे प्रतिनिधित्व करणारा अद्वितीय खेळाडू.
डेव्हिड व्हाईट आणि ब्रूस मार्टिन — मर्यादित काळासाठी खेळले, पण किवी क्रिकेटच्या समावेशकतेचे प्रतीक बनले.
🇮🇳 भारतीय मूळचे “पटेल” – तीन पिढ्यांचा गौरवशाली वारसा : -
🏏 दीपक पटेल : - सन १९५८ मध्ये केनियात जन्मलेले आणि भारतीय गुजराती वंशाचे दीपक पटेल हे न्यूझीलंडसाठी खेळणारे अग्रणी स्थलांतरित खेळाडू ठरले. सन १९९२ च्या विश्वचषकात त्यांनी स्पिनर असूनही ओपनिंग बॉलिंग करून सर्वांना थक्क केले. स्थलांतरित कुटुंबातून आलेले असूनही त्यांनी न्यूझीलंडच्या क्रिकेट संस्कृतीत एक ऐतिहासिक छाप सोडली.
🏏 जीतन पटेल : - वेलिंग्टनमध्ये जन्मलेले जीतन पटेल भारतीय पालकांचे सुपुत्र.सन २००५ ते २०१७ या काळात कसोटी, एकदिवसीय व टी२० क्रिकेटमध्ये न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व केले. नंतर इंग्लंड क्रिकेट संघाचे “स्पिन बॉलींग कोच” म्हणूनही त्यांनी आपली नवी ओळख निर्माण केली.
🏏 एजाज पटेल: - मुंबईत जन्मलेला अॅजाज युनूस पटेल हे बालपणी कुटुंबासह न्यूझीलंडला गेला. सन २०१८ मध्ये कसोटी पदार्पणानंतर त्याने सन २०२१ मध्ये भारताविरुद्ध मुंबई कसोटीत एका डावात १० विकेट्स घेतल्या — क्रिकेट इतिहासातील हा फक्त तिसरा पराक्रम ठरला. मुंबईत जन्म घेऊन मुंबईतच इतिहास घडविणारा हा खेळाडू जागतिक क्रिकेटचे अनोखा प्रतीक ठरला.
दीपक, जीतन व एजाज या त्रिकुटाने तीन पिढ्यांमधून किवी क्रिकेटला भारतीय आत्मा दिला आहे. त्यांच्यात परिश्रम, शिस्त, विनम्रता आणि तंत्र यांचा विलक्षण संगम दिसतो.
🌍 इतर परदेशी जन्म घेतलेले खेळाडू : - ग्लेन फिलिप्स — दक्षिण आफ्रिकेत जन्मलेला, पण न्यूझीलंडसाठी झंझावाती टी ट्वेंटी फलंदाज.
मार्क चॅपमन — हाँगकाँगकडून खेळून नंतर न्यूझीलंडकडे स्थलांतर; दुहेरी राष्ट्रीयतेचा अद्वितीय अनुभव.
टॉम प्रिंगल — नेदरलँड्समध्ये जन्मलेला पण न्यूझीलंडमध्ये विकसित झालेला ऑलराउंडर.
न्यूझीलंडचा दृष्टिकोन सीमांच्या पलीकडील संघभावना
न्यूझीलंड क्रिकेट नेहमीच समावेशकतेचा आदर्श राहिला आहे. येथे राष्ट्रीयत्वापेक्षा “योगदान” महत्त्वाचं मानलं जातं. या विचारातूनच त्यांचा संघ जागतिक प्रतिभांचा संगम बनला आहे. दक्षिण आफ्रिकेची शिस्त, भारताचा आत्मीय स्पर्श, आणि ऑस्ट्रेलियाची आक्रमकता, हे सर्व एका ड्रेसिंगरूममध्ये सामावलेलं आहे.
क्रिकेटमधील जागतिक एकात्मतेचा संदेश : - न्यूझीलंड क्रिकेट आज केवळ एका देशाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर जागतिक संस्कृतीचं प्रतिक बनलं आहे. .भारतीय पटेल असोत, आफ्रिकन वॅगनर असो वा ऑस्ट्रेलियन रॉन्ची. सर्वांनी मिळून “किवी क्रिकेट”चा आत्मा अधिक समृद्ध केला आहे. तेंव्हा लक्षात की, हा संघ जगाला शिकवतो, “क्रिकेट हे फक्त खेळ नाही, तर सीमांच्या पलीकडचं सांस्कृतिक बंधन आहे.”
@डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक
मो. क्रं - ९०९६३७२०८२.

