नंदुरबार(प्रतिनिधी)-प्राथमिक शाळांमध्ये सकाळी ७ वाजता सुरू होणार्या वर्गांविषयी महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण विभाग यांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार प्री-प्राथमिक ते चौथी/पाचवीपर्यंतच्या शाळा सकाळी ९ वाजेनंतरच सुरू कराव्यात, अशी मागणी ईस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशनतर्फे करण्यात आली आहे. तसे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्यामार्फत देण्यात आले.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, नंदुरबार शहरातील व जिल्ह्यातील सरकारी तसेच खाजगी आणि मराठी, गुजराथी, ऊर्दू व इंग्रजी माध्यमांच्या काही प्राथमिक शाळांमध्ये (इयत्ता पहिली ते पाचवी तसेच प्री-प्राथमिक) विद्यार्थ्यांसाठी सकाळी ७.०० वाजता शाळा सुरू केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. सध्या थंडीचे दिवस सुरू असून, अशा वातावरणात अल्पवयीन विद्यार्थ्यांना पहाटेच्या वेळेत शाळेत हजर राहणे अत्यंत गैरसोयीचे ठरत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे अडचणी निर्माण होत आहेत. पहाटे उठण्यामुळे झोपेची कमतरता, थंड हवामानात घराबाहेर पडताना होणारी शारीरिक अस्वस्थता. प्रवासासाठी थंडीत प्रतीक्षा करताना उद्भवणारा सुरक्षिततेचा प्रश्न. सदर बाबींमुळे पालकांनाही याबाबत शारिरीक, मानसिक व आर्थीक त्रास होत आहे. महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण विभाग यांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार प्री-प्राथमिक ते चौथी/पाचवीपर्यंतच्या शाळा सकाळी ९.०० वाजेनंतरच सुरू कराव्यात, अशी स्पष्ट तरतूद आहे. या निर्देशांचा उद्देश विद्यार्थ्यांचे आरोग्य, सुरक्षितता, झोपेचा कालावधी आणि मानसिक-शारीरिक विकासाचा सर्वांगीण विचार करून योग्य व सुरक्षित अध्ययन वातावरण उपलब्ध करणे हा आहे. वरील परिस्थितीचा विचार करून विद्यार्थ्यांच्या हिताच्यादृष्टीने ईस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशनतर्फे खालील प्रमाणे मागण्या करण्यात येत आहे. नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील सर्व सरकारी व खाजगी, तसेच मराठी, गुजराथी, ऊर्दू व इंग्रजी माध्यमांच्या प्राथमिक गाळांमध्ये सकाळी ७.०० वाजता अथवा त्यापूर्वी सुरू होणार्या वर्गांविषयी तातडीने तपासणी करून शासन परिपत्रकानुसार पुनर्विलोकन करण्यात यावे. शासनाच्या निर्देशानुसार प्री-प्राथमिक ते पाचवीच्या वर्गांसाठी शाळा सकाळी ९ वाजेनंतरच सुरू करण्याबाबत आवश्यक सूचना व मार्गदर्शन संबंधित प्रशासकीय स्तरावरून तातडीने करण्यात यावे. विद्यार्थ्यांचे आरोग्य, थंडीचे वातावरण आणि सुरक्षिततेचादृष्टीने विचार करून शाळांच्या वेळेबाबत स्पष्ट, योग्य व बंधनकारक निर्देश प्रदान करण्यात यावेत.
वरील निवेदनाचा सहानुभुतीपुर्वक विचार करून आवश्यक ती कार्यवाही त्वरित करण्यात यावी ही नम्र विनंती. आमच्या मागणीचा विचार होवून योग्य ती कार्यवाही त्वरीत करण्यात यावी व सदर कार्यवाहीचा उलट तपासणी अहवाल आम्हास कळविण्यात यावा. अन्यथा विविध प्रकारे आंदोलन, उपोषणे करण्यात येतील, याची आपल्या स्तरावरुन नोंद घेण्यात यावी, असा इशारा देखील निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर एजाज बागवान, रऊफ शाह, प्रा.श्रीकांत पवार, रामकृष्ण मोरे, जावेद अहमद, अजीम बागवान, मन्यार अब्दुल नासिर, छन्नू शाह पठाण, शाकीर बागवान, दानिश बागवान आदींच्या सह्या आहेत.

