वाळकी प्रतिनिधी (दादासाहेब आगळे):-अहिल्यानगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यातील रांधे या छोट्याशा गावात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वाढलेले प्रसाद शोभा भाऊसाहेब आवारी यांनी आपल्या जिद्दीच्या आणि अथक परिश्रमांच्या जोरावर अभूतपूर्व अशी कामगिरी करत भारत सरकारच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयामध्ये ऑपरेशन अधिकारी म्हणून नावाची नोंद केली आहे. ही निवड प्रतिष्ठित युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (UPSC) परीक्षेद्वारे झाली आहे.
प्रसाद हे कल्याण संघटक अहिल्यानगर चे चंद्रकांत शिंदे यांचे भाचे असून, आदरणीय अण्णा हजारे आणि पद्मश्री डॉ. पोपटराव पवार यांच्या आदर्शातून प्रेरणा घेणारे तरुण आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे केवळ त्यांच्या कुटुंबाचा नव्हे, तर पानोली गावाचा, पारनेर तालुक्याचा आणि संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याचा मान अभिमानाने उंचावला आहे.अत्यंत साध्या घरातून, मर्यादित साधनसंपत्तीमध्ये वाढलेल्या प्रसाद यांनी दाखवून दिले की खऱ्या अर्थाने यश हे जन्मात नाही, तर जिद्द आणि निष्ठेत असते. कठीण परिस्थितीशी दोन हात करत त्यांनी सिद्ध केले की“देशसेवेची ज्योत मनामध्ये असेल, तर कोणतेही स्वप्न अशक्य नसते.”
प्रसाद यांचा प्रवास हा साधेपणातून उगवलेल्या अथक परिश्रमांचा आणि उच्च ध्येयाच्या शक्तीचा जिवंत संदेश आहे. असंख्य युवकांना प्रेरणा देत त्यांची कहाणी सांगते“मनुष्याला उंची परिस्थिती देत नाही, तर ध्येयावरचा अटळ विश्वास देतो.”आज पानोली गावचे भाचे, रांधे गावचे सुपुत्र म्हणून आणि संपूर्ण पारनेर तालुका व अहिल्यानगर जिल्ह्याचा अभिमान म्हणून प्रसाद आवारी यांचे नाव प्रत्येकाच्या अंत:करणात अभिमान निर्माण करत आहे.

