तारापूर:-
सध्याच्या परिस्थितीमध्ये सगळीकडे जातीजातीत मतभेद पसरलेले दिसत असताना तारापूर येथील ग्रामस्थांनी बंधुभाव जपत सर्वांना ऐक्याचा संदेश दिला आहे. तारापूर गावातील एक ज्येष्ठ मुस्लिम व्यक्ती मोतीलाल बाबुलाला तांबोळी यांनी आपला थोरला मुलगा इलाई बाबूलाल तांबोळी यांच्या स्मरणार्थ ग्रामदैवत श्री दर्लिंग देवस्थानाच्या प्रसाद बनविण्यासाठी लागणारी जवळपास एक लाख रुपयांची भांडी दान केली आहेत.
यावेळी मंदिराचे पुजारी दादा पुजारी, मा. तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर सपाटे, वालगी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सपाटे, ग्रा.पं. सदस्य गोरख वाघमोडे, शशिकांत क्षीरसागर, संजय शिंदे मेजर उपस्थित होते. वालगी मंडळाकडून मोतीलाल तांबोळी यांचा सन्मान करण्यात आला. एक मुस्लिम बांधव असूनही आपल्या पान विकण्याच्या व बांगड्या भरण्याच्या छोट्याशा व्यवसायातून जमवाजमव करत हिंदू मंदिरासाठी निस्वार्थ भक्तीने दान केल्याबद्दल ग्रामस्थांमधून मोतीलाल तांबोळी यांचे कौतुक करण्यात येत आहे.
हिंदू मुस्लिम बंधुभावाची ही एकच बाब नसून तारापूर गावामध्ये अनेक माध्यमातून हिंदू मुस्लिम बांधव एकोप्याने राहतात आणि हीच बाब सध्याच्या काळात सर्वांना एकतेचा संदेश देणारी आहे.

