नगर प्रतिनिधी: ( तुषार महाजन )
एड्ससारख्या आजारावर केवळ औषधोपचार नाही, तर सामाजिक मानसिकता बदलणे आणि रुग्णांना सन्मानाची वागणूक देणे हेच खरे औषध आहे, असा संदेश शिर्डी येथे देण्यात आला. १ डिसेंबर २०२५ रोजी 'जागतिक एड्स दिना'चे औचित्य साधून श्री साईनाथ रुग्णालय, शिर्डी येथील एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र (ICTC) आणि साई निर्माण करिअर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स सप्ताहाअंतर्गत विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शिर्डी येथील कवायत मैदानावर पार पडलेल्या या कार्यक्रमात तरुणाईला आणि नागरिकांना एचआयव्ही/एड्स विषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. यावर्षीच्या जागतिक एड्स दिनाचे घोषवाक्य “अडथळ्यांवर मात करू, एकजुटीने एचआयव्ही/एड्सला लढा देऊ, नवं परिवर्तन घडवू!” हे असून, याच विचाराने समाजात जनजागृती करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
भेदभाव नको, साथ हवी: प्रकाश भिटे
कार्यक्रमात श्री साईनाथ रुग्णालयाचे आयसीटीसी समुपदेशक श्री. प्रकाश निवृत्ती भिटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी एचआयव्हीची लक्षणे, गैरसमज, कलंक आणि भेदभाव यांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, "एचआयव्ही संक्रमित व्यक्तींना समाजात समानतेने वागणूक देणे ही आपल्या प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. विवाहपूर्व तपासणी, गुप्तरोग आणि औषधोपचार याविषयी जागरूकता निर्माण झाल्यास आपण एड्स हद्दपार करण्याच्या दिशेने यशस्वी वाटचाल करू शकतो." तसेच त्यांनी हेल्पलाइन क्रमांक १०९७ ची माहिती देऊन विद्यार्थ्यांचे गैरसमज दूर केले.
मोफत तपासणी आणि शासकीय सुविधांचा लाभ घ्या: अल्ताफ शेख
आयसीटीसी प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्री. अल्ताफ गफ्फार शेख यांनी उपस्थितांना शासकीय स्तरावर उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती दिली. अहिल्यानगर जिल्ह्यात आयसीटीसी (ICTC), ए.आर.टी (ART) आणि डॅपकु (DAPCU) कार्यालयामार्फत मोफत तपासणी आणि उपचाराची व्यवस्था उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. समाजकार्यात हातभार लावून इतरांना या आजाराची माहिती देण्याचे आवाहन त्यांनी केले.
होऊया सारे एकसंघ, करूया एच.आय.व्ही. चा प्रतिबंध!
केवळ एक दिवसापुरते मर्यादित न राहता, एड्स निर्मूलनासाठी सातत्याने प्रयत्न होणे गरजेचे आहे. "होऊया सारे एकसंघ करूया एच.आय.व्ही चा प्रतिबंध," हा नारा देत शिर्डीतील युवकांनी या सप्ताहात सामाजिक परिवर्तनाची शपथ घेतली. भेदभाव विसरून संवेदनशीलतेने वागण्याची गरज या कार्यक्रमातून अधोरेखित करण्यात आली.
मान्यवरांची उपस्थिती,
या समाजउपयोगी कार्यक्रमासाठी साई निर्माण करिअर अकॅडमीचे संचालक श्री. ताराचंद कोते, श्री. प्रमोद कदम सर आणि व्यवस्थापक श्री. रणजित परीट सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री साईनाथ रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. मैथिली पितांबरे मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

