स्वच्छ, निःस्वार्थी कार्यकर्त्यांनाच पॅनलमध्ये स्थान; ‘स्वतंत्र पॅनल’ची घोषणा
शिर्डी प्रतिनिधी :
शिर्डी नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भाजपचे ज्येष्ठ नेते श्री. बाबुराव पुरोहित यांनी तब्बल १५ ते २० वर्षांनंतर पुन्हा एकदा सक्रिय राजकारणात पुनरागमन केले आहे. प्रस्थापित राजकारणावर सडकून टीका करत त्यांनी ‘परिवर्तनासाठी’ स्वतंत्र पॅनल उभे करण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे शिर्डीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, प्रस्थापित नेत्यांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
“गेल्या १५ वर्षांतील ‘दैना’ संपवण्यासाठी परिवर्तनाचा नारा”
पत्रकार परिषदेत बोलताना श्री. पुरोहित म्हणाले, “गेल्या १५ ते २० वर्षांत शिर्डी शहराची दयनीय अवस्था झाली आहे. गावात प्रस्थापितांनी भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. लोक बदलासाठी आतुर आहेत, पण दबावामुळे उघडपणे बोलू शकत नाहीत. अशा परिस्थितीत मी पुन्हा मैदानात उतरलो आहे.”
त्यांनी स्पष्ट केले की, या लढ्याचा हेतू भाजप किंवा संघ विचारसरणीला विरोध करणे नाही, तर पक्षात शिरलेल्या “भ्रष्ट घटकां”विरुद्ध लढा देणे आहे. “मी स्वतः शिर्डीत संघाची शाखा सुरू केली होती. मूळ विचारसरणीशी मला काहीच वैर नाही, पण पक्षात शिरलेल्या ‘गवता’ विरुद्ध हा संघर्ष आहे,” असे त्यांनी निक्षून सांगितले.
“स्वच्छ, निःस्वार्थी लोकांनाच संधी”
स्वतःच्या पॅनलविषयी बोलताना श्री. पुरोहित यांनी स्पष्ट केले की, “आमच्या पॅनलमध्ये फक्त स्वच्छ चारित्र्याच्या, कष्टाळू, निःस्वार्थी आणि जनसेवेत रस असलेल्या लोकांनाच संधी दिली आहे. उमेदवारीसाठी पैशांची ऑफर देणाऱ्यांना आम्ही स्पष्ट नकार दिला आहे.”
साई संस्थानच्या कारभारावर सडकून टीका
श्री. पुरोहित यांनी साईबाबा संस्थानच्या कार्यप्रणालीवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, “मंदिरातील पारंपरिक ‘हार’ आणि ‘नारळ’ यांवरील बंदीचा निर्णय अयोग्य आहे. तसेच, ६०० कंत्राटी कर्मचाऱ्यांना आजही कायम का केले नाही? MSF सुरक्षेसाठी मोठा खर्च केला जातो, पण स्थानिक कर्मचाऱ्यांचा प्रश्न प्रलंबित ठेवला जातो. न्यायालयीन खटले मुद्दाम लांबवले जात आहेत.”
“शिर्डीचा विकास स्थानिकांच्या विश्वासावर”
शिर्डीत गेल्या काही महिन्यांपासून गावकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण असून, श्री. बाबुराव पुरोहित यांच्या पुढाकाराने तरुण पिढीने लोकांच्या भावना जाणून घेण्यासाठी मोठी जनजागरण मोहीम राबवली. हजारो नागरिकांनी मेसेज आणि कॉलद्वारे आपला पाठिंबा नोंदविला आहे.
तरुणांचा जोम, बाबूजींचा अनुभव आणि शिर्डीकरांचा विश्वास — या त्रिसूत्रीवर आधारित “परिवर्तनाची नवी लाट” उभी राहील, असा आत्मविश्वास त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केला आहे. “ही शिर्डीच्या आत्म्याला पुन्हा जिवंत करण्याची लढाई आहे आणि शिर्डीकरांना बाबूजींसारखे प्रामाणिक नेतृत्व पुन्हा हवे आहे,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
यावेळी बैठकीत विराट पुरोहित, गणेश वाकचौरे, साईधन कुलकर्णी, रवींद्र कोलकर, रोहित सोळंकी, आकाश त्रिपाठी, युवराज निंबाळकर, गणेश मिसाळ, राजेंद्र पांचाल, महेश बाविस्कर, दीपक भांड आदी मान्यवर उपस्थित होते.

