मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सायन–माटुंगा परिसरातील प्रतिष्ठित समाजसेविका भारती भरत पाठक यांचा हिरक महोत्सवी ७५ वा वाढदिवस श्री रावजी जीवराज चांगडईवाला हॉल येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी शुभेच्छुकांची मोठी गर्दी उत्स्फूर्तपणे उपस्थित होती. गुजरात हायकोर्टच्या माजी न्यायमूर्ती आदरणीय सोनियाबेन गोकाणी, तारक मेहता का उल्टा चश्मा फेम श्यामभाई पाठक (पोपटलालजी), लायन्स क्लबचे गव्हर्नर, अनेक पास्ट गव्हर्नर, तसेच बुद्धिजीवी, शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक, पाठक व गोकाणी परिवारातील मान्यवर अशा अनेक व्यक्तींची उपस्थिती लक्षणीय होती.
कार्यक्रमातील विशेष आकर्षण म्हणून लहानशी गोड मुलगी विभूती देरोला हिने सादर केलेले मनमोहक नृत्य विशेष दाद मिळवून गेले. आपल्या आजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करत तिने सभागृहात आनंददायी वातावरण निर्माण केले.
या प्रसंगी विनोदभाई निवेटिया यांनी मुलींच्या शिक्षणासाठी ‘सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी’ला ₹५०,००० आणि लायन ताराचंद बापा रुग्णालयाला ₹५०,००० देणगी जाहीर केली. त्यांच्या प्रेरणेने भारती भरत पाठक यांनीही मुलींच्या शिक्षणासाठी ₹५०,००० आणि रुग्णालयासाठी ₹५०,००० अशी समतुल्य देणगी जाहीर केली. समारोपात पाठक व गोकाणी परिवाराने सर्व उपस्थित मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली.


