एरंडोल (प्रतिनिधी) – जागतिक दिव्यांग दिनानिमित्त एरंडोल तालुका प्रशासनाच्या वतीने खर्ची (खु.) येथे दिव्यांग लाभार्थ्यांसाठी विशेष प्रशासकीय महा-शिबिराचे आयोजन करण्यात आले. तालुक्यातील कोणताही दिव्यांग व्यक्ती शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये, या उद्देशाने घेण्यात आलेल्या या उपक्रमाला लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार अमोल बन यांच्या प्रेरणेतून, उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड आणि तहसीलदार प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महा-शिबिर यशस्वीरित्या पार पडले. खर्ची, रवंजा, खेडी, कडोली, रिंगणगाव, दापोरी, सावदे, विखरण, चोरटकी, खडके, खेडगाव आदी गावांतील दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
शिबिरात शासन निर्णयानुसार पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा रु. २,५०० इतके अनुदान थेट बँक खात्यात (DBT) जमा करण्यासाठी आवश्यक माहिती ऑनलाईन पोर्टलवर तात्काळ अपलोड करण्यात आली. तसेच, अद्यापपर्यंत लाभ न मिळालेल्यांचे नवीन अर्ज भरून घेऊन तेही सीएससी केंद्रांच्या सहकार्याने तत्काळ ऑनलाईन अपलोड करण्यात आले. यामुळे योजनांच्या लाभाचा मार्ग मोठ्या प्रमाणात सुलभ आणि वेगवान झाला.
या एकात्मिक उपक्रमामुळे दिव्यांग व्यक्तींना शासकीय कामकाज सहज, जलद आणि त्रासमुक्तपणे उपलब्ध झाले. प्रशासनाने दाखविलेल्या संवेदनशीलतेबद्दल लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी तसेच तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.


