shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

द. आफ्रिकेला नमवण्यात भारतीय गोलंदाज अग्रेसर !


                हार्दिक पांड्याची अष्टपैलू कामगिरी व गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर भारताने कटक येथे झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा १०१ धावांनी मोठा पराभव केला. नेहमीप्रमाणे भारतीय कर्णधाराने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना, हार्दिक पांड्याच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारताने २० षटकांत ६ बाद १७५ धावा केल्या. प्रत्युत्तरात, दक्षिण आफ्रिकेचा संघ १२.३ षटकांत ७४ धावांतच गारद झाला. भारताने मोठा विजय मिळविला आणि पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. द. आफ्रिकेची ही त्यांची छोट्या प्रारूपातील निच्चांकी धावसंख्या आहे. त्यांची यापूर्वीची सर्वात कमी धावसंख्या ८७ होती, तीही सन २०२२ मध्ये भारताविरुद्ध. या वर्षातला हा दक्षिण आफ्रिकेचा सहावा टी-२० सामना आहे, त्यापैकी तीन पराभव भारताविरुद्ध आहेत. धावांच्या बाबतीत हा भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा तिसरा सर्वात मोठा विजय आहे. भारताने यापूर्वी सन २०२४ मध्ये दक्षिण आफ्रिकेला १३५ धावांनी आणि सन २०२३ मध्ये १०६ धावांनी पराभूत केले होते. दक्षिण आफ्रिका भारताविरुद्ध टी-२० मध्ये सर्वात कमी धावसंख्या नोंदविणारा चौथा संघ ठरला. या वर्षी युएई ५७ धावांत गुंडाळला गेला, तर सन २०२३ मध्ये न्यूझीलंड ६६ धावांत आटोपला होता. सन २०१८ मध्ये भारताने आयर्लंडला ७० धावांत गुंडाळले.
                 विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली, पॉवरप्लेमध्ये तीन बळी गमावले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने नियमितपणे विकेट्स गमावल्या आणि त्यांच्या एकाही फलंदाजाला लक्षणीय खेळी करता आली नाही. दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी इतकी खराब होती की, फक्त चार फलंदाज दुहेरी आकडी गाठू शकले नाहीत. दक्षिण आफ्रिकेकडून डेवाल्ड ब्रुईसने सर्वाधिक २२, कर्णधार एडेन मार्करामने १४, ट्रिस्टन स्टब्सने १४ आणि मार्को जॅन्सेनने १२ धावा केल्या. २ बाद ४० वरून सर्वबाद ७४ हि धावसंख्या सर्व काही कथन करून जाते. या सामन्यात भारताकडून अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. शिवम दुबे आणि हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी एक बळी मिळाला.


                विशेष म्हणजे, सर्व भारतीय गोलंदाज यशस्वी झाले. बुमराहने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये १०० बळींचा टप्पा गाठला आणि अर्शदीपनंतर असा पराक्रम करणारा तो दुसरा भारतीय गोलंदाज ठरला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रारूपात १०० पेक्षा अधिक बळी घेणारा बुमराह हा पहिला भारतीय आणि एकूण पाचवा गोलंदाज आहे. त्याच्या आधी लसिथ मलिंगा, टिम साउदी, शकिब अल हसन आणि शाहीन आफ्रिदी यांनी हा कारनामा केला आहे. 

                भारताचा अनुभवी अष्टपैलू हार्दिक पंड्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात शानदार कामगिरी केली. हार्दिकने फलंदाजीने आपली ताकद दाखवत नाबाद अर्धशतक झळकावून भारताला दक्षिण आफ्रिकेसमोर आव्हानात्मक लक्ष्य गाठण्यास मदत केली. यासह हार्दिकने टी-२० सामन्यात १०० षटकार पूर्ण केले, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याशी बरोबरी केली. हार्दिक पंड्याने २८ चेंडूत सहा चौकार आणि चार षटकारांसह नाबाद ५९ धावा काढल्या. आशिया कप दरम्यान क्वाड्रिसेप्सच्या दुखापतीमुळे हार्दिक दोन महिन्यांहून अधिक काळ मैदानाबाहेर होता आणि या सामन्यात तो पुनरागमन करत होता.

                हार्दिक परतताना चमकदार कामगिरी करत टी-२० सामन्यात १०० षटकार मारणारा चौथा भारतीय ठरला. हार्दिकच्या आधी, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली यांनी टी-२० सामन्यात १०० हून अधिक षटकार मारले आहेत. भारतासाठी टी-२० सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम रोहितच्या नावावर आहे, त्याने या स्वरूपात २०५ षटकार मारले आहेत. सूर्यकुमार १५५ षटकारांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोहलीने टी-२० मध्ये १२४ षटकार मारले आहेत.

                हार्दिक व्यतिरिक्त भारतासाठी कोणताही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. हार्दिक व्यतिरिक्त तिलक वर्मा २६, अक्षर पटेल २३, अभिषेक शर्मा १७, कर्णधार सूर्यकुमार यादव १२ आणि शिवम दुबे १० धावा काढल्या. दरम्यान, जितेश शर्मा १० धावांवर नाबाद राहिला. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडीने तीन, तर लुथो सिम्पालाने दोन आणि डोनोवन फरेरा यांनी एक विकेट घेतली.

               भारताकडून अर्शदीप आणि भुवनेश्वर यांनी टी-२० मध्ये १ ते ६ षटकांच्या दरम्यान ४७ विकेट्स घेतल्या आहेत. अर्शदीपचा स्ट्राईक रेट १५.९ आहे, तर भुवनेश्वरचा स्ट्राईक रेट २४.५ आहे. जसप्रीत बुमराह ३३ विकेट्ससह तिसऱ्या स्थानावर आहे, त्यानंतर अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर प्रत्येकी २१ विकेट्ससह दुसऱ्या स्थानावर आहेत.

               या सामन्यात अनेक महत्त्वाचे क्षण होते, ज्यात जसप्रीत बुमराहचा शंभरावा टी-२० बळी आणि भारताचा प्रभावी विजय यांचा समावेश होता. सामन्यातील सर्वात वादग्रस्त क्षण दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डेवाल्ड ब्रेव्हीसला बाद देण्यात आले. ही घटना दहाव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर घडली. जसप्रीत बुमराहने ऑफ-स्टंपवर वेगवान चेंडू टाकला, जो ब्रेव्हीस हवेत खेळण्याचा प्रयत्न केला. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने अतिरिक्त कव्हरवर चेंडू सहज पकडला. तथापि, पंचाने निर्णय देण्यापूर्वी तिसऱ्या पंचाचा सल्ला घेतला. रिप्लेवरून असे दिसून आले की बुमराहचा चेंडू नो-बॉल असू शकतो, कारण तो क्रिझपेक्षा थोडा जास्त गेला होता. तथापि, तिसऱ्या पंचाने चेंडू कायदेशीर मानला आणि ब्रेव्हीसला बाद घोषित केले. त्याने १४ चेंडूत २२ धावा काढल्या, ज्यात तीन चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. 

                पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात टिम इंडियाने विश्वविजेत्यांना साजेसा विजय मिळविला असला तरी, हार्दिक व्यतिरिक्त कुठल्याही फलंदाजाची कामगिरी समाधानकारक झाली नाही. त्यातच कर्णधार सुर्यकुमार यादवचे लांबत चाललेले अपयश जास्तच त्रासदायक ठरत आहे. तर उपकर्णधार शुभमन गिलला टी२० मध्ये विनाकारण खेळवून जयस्वाल व सॅमसनसारख्या खेळाडूंना संघाबाहेर तिष्ठत राहावे लागत आहे. या गोष्टीला पुष्टी देण्याचे काम स्वतः गिलची खराब कामगिरीच करत आहे. इतर सर्वच फलंदाजांनी आपली जबाबदारी ओळखून खेळणे गजरेचे असून आगामी विश्वचषकात मागील जेतेपद राखण्यासाठी सर्व संघ लयीत येणे आवश्यक आहे. शिवाय पाहुण्या संघाला कसोटीत झालेल्या क्लिन स्विपची परतफेड करण्याची यापेक्षा योग्य वेळ दुसरी असूच शकत नाही.

@डॉ.दत्ता विघावे                    
    क्रिकेट समिक्षक 
    मो. क्रं - ९०९६३७२०८२.
close