प्रतिनिधी – एरंडोल येथील नेहा ईश्वर पाटील हिने राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस, कर्नाटक आयोजित बी.ए.एम.एस. पदवी परीक्षेत प्रथम श्रेणी मिळवत उज्ज्वल कामगिरी नोंदवली आहे. २०२५ च्या परीक्षानिकालात उल्लेखनीय गुण मिळवत विद्यापीठात आपली वेगळी छाप उमटवल्याने तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. नेहा ही एरंडोलचे कॉम्प्युटर सेंटरचे संचालक ईश्वर पाटील यांची कन्या असून तिच्या सातत्यपूर्ण अभ्यास, चिकाटी व आयुर्वेद विषयातील प्रगाढ आवडीमुळे हे यश प्राप्त झाल्याचे सहाध्यायी व प्राध्यापकांनी सांगितले.
आधुनिक वैद्यकासोबत आयुर्वेदातील प्राचीन ज्ञानाचा समन्वय साधत शैक्षणिक क्षेत्रातील गुणवत्ता सिद्ध केल्याबद्दल नेहाचे भरभरून कौतुक होत आहे. आपल्या प्रतिक्रियेत तिने “हे यश माझ्या आई-वडिलांचे मार्गदर्शन, शिक्षकांचे पाठबळ आणि माझ्या कष्टांचे फलित आहे. पुढे आयुर्वेद क्षेत्रात संशोधन व सेवा या माध्यमातून समाजासाठी कार्य करण्याची इच्छा आहे,” असे सांगितले. नेहाच्या या यशामुळे परिवार, मित्रपरिवार व गावात आनंदाचे वातावरण असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


