एरंडोल – शहरातील ३० हून अधिक संघटनांच्या शिष्टमंडळाने आज उपविभागीय अधिकारी मनीष कुमार गायकवाड यांना निवेदन देत राज्यात येत्या हिवाळी अधिवेशनात कठोर ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ तातडीने लागू करण्याची मागणी केली. या वेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
निवेदनात ‘लव्ह जिहाद’ हा खोटी ओळख, प्रेमजाळ, जबरदस्तीचे धर्मांतर, लैंगिक शोषण, तस्करी व दहशतवादी नाळीशी जोडलेला संघटित गुन्हा असल्याचा आरोप करण्यात आला असून, राज्यातील अनेक महिलांना याचा बळी पडावे लागत असल्याचा उल्लेख केला आहे. हिंदू जनजागृती समितीने राबवलेल्या अभियानातून गोळा करण्यात आलेल्या २५ हजारांहून सह्यादेखील प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आल्या.
संघटनांनी निवेदनात उत्तर प्रदेशप्रमाणे कठोर व अजामीनपात्र कायदा महाराष्ट्रात लागू करावा, तपासासाठी विशेष पोलीस शाखा स्थापन करावी, विदेशी निधी तसेच तस्करी व दहशतवादी संबंधांचा सखोल तपास करावा, तसेच जबरदस्तीने धर्मांतरास मदत करणाऱ्या व्यक्ती व संस्थांवर बंदी आणावी अशा प्रमुख मागण्यांचा समावेश केला आहे.
हिवाळी अधिवेशनातच हा कायदा पारित करण्याची संघटनांनी प्रशासनाकडे जोरदार मागणी केली.



