मलबार हिल लोक भवन परिसराची पूर्वकथा
उमेश काशीकर यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
अलीकडेच एका रील बनवणाऱ्या व्यक्तीने राजभवनावर एक रील 'बनवली' आहे.
आतापर्यंत अनेक लोकांनी ही रील व्हाट्सअप वरून पाठवली आहे.. त्याअर्थी ती प्रचंड व्हायरल झाली आहे हे उघड आहे. सुरुवातीलाच मलबार हिलच्या जमिनीचे बाजार मूल्य सांगून सादरकर्त्याने रील आकर्षक बनवली आहे.
सध्याच्या राजभवनाची जागा सन १८४४ साली एका धनिक पारशी व्यक्तीने ब्रिटिश गव्हर्नरला 'मोफत' दिली होती असा त्याने दावा केला आहे ! हा शोध कुठून लागला किंवा माहितीचा स्त्रोत काय हे त्याने नमूद केलेले नाही. त्यासाठी हा 'पोस्ट प्रपंच' !!
रीलवाल्यांचे बरे असते. त्यांना पुरावा देणे आवश्यक नसते. रील्स वेगाने फिरतात. व्हिज्युअल्स व संगीत टाकून तसेच एडिट करून रील्स आकर्षक बनवल्या जातात.
रीलच्या विश्वात बनवणाऱ्याला 'माहितीचा स्रोत काय आहे? हे विचारण्याची सोय नसते. पण त्यांचा माल जोरात खपतो आणि बळी 'सत्या'चा जातो.
*पूर्वेतिहास
मलबार हिल राजभवनाच्या जागी साधारण १७१० पासून गार्ड हाऊस होते. 'राजभवन्स इन महाराष्ट्र' या पद्मश्री सदाशिव गोरक्षकर यांनी लिहिलेल्या ग्रंथानुसार :
"मलबार पॉईंटवरील सर्वात जुन्या वास्तूंपैकी एक इमारत होती Signaller’s House. बहुतकरून सन १७१० साली श्री गुंडी जवळ एकट दिसणारे पहारेकऱ्यांचे निवासस्थान हेच होते. त्याचा वापर रक्षक चौकी म्हणून केल्या जात असावा. खाडी आणि समुद्रावर नजर ठेवण्यासाठी हे ठिकाण अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे. सन १६७२ साली वलंदेजी (डच) लोकांच्या जहाजांचा ताफा मुंबईच्या किनाऱ्यावर येऊन गेल्यामुळे अशा निगराणीची गरज विशेषत्वाने होती."
"इवान नेपियन यांनी जवळच आपले स्वतःचे कॉटेज (टाइल्ड बंगलो) बांधण्यापूर्वी, मलबार पॉईंटवर हा एकमेव बंगला होता.
जवळजवळ १८१० पर्यंत 'बॉबरी हंट' (Bobbery Hunt) या शिकारीच्या खेळाची सुरुवात याच बंगल्यापासून होत असे आणि त्यामुळे १८१० नंतर त्याला ‘Hunting Lodge’ म्हणून ओळखले जाऊ लागले."
गव्हर्नर इवान नेपियन यांचेनंतर आलेले गव्हर्नर माउंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन (१८१९-१८२७) यांनी 'प्रिटी कॉटेज' नावाचा लहानसा बंगला नेपियन यांच्या बंगल्याच्या शेजारीच बांधला.
मलबार हिल हे ठिकाण किनारपट्टीवर असल्याने कंपनी सरकारने मलबार हिल शिवाय मुंबईतील सहा अन्य ठिकाणांवर जहाजांवर मारा करण्यासाठी 'गन प्लॅटफॉर्म' म्हणजे तोपखाने बांधून सज्ज ठेवले होते.
लेखिका मारिया ग्राहम यांनी देखील मलबार पॉईंट येथे सन 1809 साली भेट दिल्याचे तसेच येथे गार्डन हाऊस पाहिल्याचे नमूद केले आहे.
सन १८२६ साली मलबार हिल येथे अस्तित्वात असलेल्या बांधकामांची यादीच 'राजभवन्स इन महाराष्ट्र' या पुस्तकात जोडली आहे. त्यात 'गन प्लॅटफॉर्म'चा उल्लेख आढळतो. संदर्भाकरिता सदर यादी सोबत जोडली आहे.
मिसेस पोस्टान्स या विदुषीने १८३८ साली प्रकाशित आपल्या पुस्तकात मलबार पॉईंटचे वर्णन खालील शब्दात केले आहे:
"....amongst the most charming spots, however, is the bold promontory, known as Malabar Point, and crowned with a mansion, originally the residence of Sir John Malcolm, now set apart for the accommodation of the Governor, when the heat becomes oppressive at Parell. This agreeable resort pitched upon the tall and rocky headland, like an eiry above the waves commands a varied and extensive view, lovely at all times, but more particularly so when the sun's broad golden disc is half obscured below the azure waters, and the feathery tips of the concoanut woods retain their amber tinted hues.." - Marianne Postans, British Travel Writer, Western India in 1838
मिसेस पोस्टान्स यांचे पती कॅप्टन थॉमस पोस्टान्स सैन्यदलात होते व त्यांचे १८२६ ते १८३० या काळात मुंबई तसेच पश्चिम भारतात वास्तव्य होते. त्यावरून गव्हर्नर जॉन माल्कम (१८२७ - १८३०) असताना मलबार हिल ही जागा गव्हर्नरची प्रॉपर्टी होती, हे दिसून येते.
सन १८३८ साली परळ येथे वास्तव्यास असलेले गव्हर्नर रॉबर्ट ग्रांट यांनी जानेवारी १८३८ मध्ये लिहून ठेवले आहे की “परळ निवासस्थान हे आरोग्याच्या दृष्टीने राहण्यासाठी अयोग्य आहे. एका वेळी तर 'गव्हर्मेंट हाऊस' मधील प्रत्येक माळी आणि जवळजवळ सर्व नोकरचाकर तापामुळे अंथरुणाला खिळले होते. हे आजार स्थानिक कारणांमुळेच उद्भवतात याचा पुरावा म्हणजे त्याच काळात आम्ही (अधून मधून) राहत असलेले मलबार पॉईंट हे ठिकाण पूर्णतः निरोगी व आरोग्यदायी होते.”
वरील सर्व गोष्टींवरून एक गोष्ट सिद्ध होते ती म्हणजे राजभवनाची जागा फार पूर्वीपासून सरकारकडे होती. कोणत्याही धनिक पारशी व्यक्तीची नव्हती. त्यामुळे कुणा पारशी व्यक्तीने ती जागा ब्रिटिश गव्हर्नरला 'फुकट' दिली होती याला कोणताही आधार नाही !

