अकोले : (वा) भारतीय कृषी संशोधन संस्था (ICAR) आणि कृषी जागरण यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा कृषी क्षेत्रातील मिलेनियम फार्मर ऑफ इंडिया' राष्ट्रीय पुरस्कार
कळस चे शेतकरी संजय हासे यांना नुकताच प्रदान करण्यात आला.
दिल्लीतील आय सी ए आर पुसा कॅम्पसमध्ये आयोजित भव्य कार्यक्रमात केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते मानाचा पुरस्कार संजय हासे यांना प्रदान करण्यात आला. देशभरातील निवडक उत्कृष्ट शेतकऱ्यांमधून आय सी ए आर ने त्यांची निवड केली. बायोमी टेक्निकल या जैविक कंपनीचे सीईओ डॉक्टर प्रफुल्ल गाडगे सर व बायोमी टीमचे सहकार्य लाभले.
संजय हासे हे उच्चशिक्षित असूनही शेतीची वाट निवडली. त्यांनी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक, संशोधनाधिष्ठित आणि नैसर्गिक शेतीच्या तंत्रांचा विकास केला आहे. हवामान बदलानुसार पीकपद्धतीत वेळोवेळी सुधारणा, स्वतः तयार केलेल्या सेंद्रिय खतांचा प्रभावी वापर, कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे तंत्र विकसित करणे, रोगप्रतिबंधक तंत्रज्ञान आणि नव्या पिकांची प्रयोगशील चाचणी, या नाविन्यपूर्ण प्रयोगांमुळे त्यांची शेती आज एक राष्ट्रीय मार्गदर्शक मॉडेल म्हणून उदयास आली आहे.
मी डाळिंब पिकात केलेल्या नावीन्यपूर्ण प्रयोग व सेंद्रिय खतांचा वापर यासाठी हा पुरस्कार मिळाला असून नैसर्गिक शेती, कमी खर्चिक आणि हवामानाला अनुरूप तंत्रज्ञान वापरून शेतीत मोठे परिवर्तन घडवता येते, हाच माझा संदेश आहे, अशा शब्दांत कळस येथील प्रगतिशील शेतकरी संजय पुंजा हासे यांनी ‘मिलेनियम फार्मर ऑफ इंडिया’ हा सर्वात प्रतिष्ठेचा राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारल्याचा आनंद व्यक्त केला.
संजय हासे यांनी उल्लेखनीय संशोधनात्मक, प्रयोगशील आणि नैसर्गिक शेतीमुळे अकोले तालुका आणि जिल्ह्याचे नाव देशपातळीवर गौरवले गेले आहे. या मानाच्या पुरस्कारामुळे तालुक्यातील शेतकरी बांधवांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि अविरत प्रयोगशील वृत्तीमुळे कृषी क्षेत्रात एक नवा आदर्श प्रस्थापित झाला आहे.

