एरंडोल – जागतिक एड्स दिनानिमित्त शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग आणि ग्रामीण रुग्णालय, एरंडोल यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली. दरवर्षी 1 डिसेंबर रोजी साजरा होणाऱ्या या दिवसाचे औचित्य साधत एड्सविषयी समाजात जागरूकता निर्माण करणे हा रॅलीचा मुख्य उद्देश होता.
रॅलीचे उद्घाटन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. मुकेश चौधरी, शास्त्री इन्स्टिट्यूटचे उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी, समुपदेशन विभागाचे श्री. अंकुश थोरात, प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्री. वीरेंद्र बिर्हाडे, आरोग्य सेवक श्री. दीपक गायकवाड तसेच महाविद्यालयातील शिक्षकवर्ग आणि कर्मचारी उपस्थित होते. NSS स्वयंसेवक, विद्यार्थी आणि आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
रॅलीची सुरुवात आर. टी. काबरे हायस्कूलपासून झाली. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मार्गे मुख्य रस्ता ओलांडत पुन्हा काबरे हायस्कूलवर समारोप करण्यात आला. ‘एड्सबाबत जागरूकता वाढवा’, ‘सुरक्षित राहा – आरोग्य जपा’ अशा घोषणांद्वारे विद्यार्थ्यांनी नागरिकांना जागरूक केले. पथनाट्याद्वारे एचआयव्ही/एड्ससंबंधी गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
आरोग्य तज्ज्ञांनी एड्सची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि जागरूकतेचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. आरोग्य विभागाकडून जनजागृती साहित्याचे वाटपही करण्यात आले. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये एड्सविषयी संवेदनशीलता वाढून सुरक्षित आणि निरोगी समाजनिर्मितीला चालना मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामीण रुग्णालयातील श्री. अंकुश थोरात तसेच शास्त्री इन्स्टिट्यूटचे प्रा. अनुप कुलकर्णी, प्रा. जावेद शेख, सर्व शिक्षकवर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.



