विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला व ‘कमवा-आणि-शिका’ संकल्पनेला मिळाले व्यासपीठ.
एरंडोल, दि. २१ — एरंडोल येथील रा. ति. काबरे विद्यालयात बाल आनंद मेळावा उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांना शालेय जीवनातील आनंद अनुभवता यावा तसेच त्यांच्या कलागुणांना व सर्जनशीलतेला चालना मिळावी, या उद्देशाने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापकांच्या प्रास्ताविकाने झाली. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारून ‘कमवा-आणि-शिका’ संकल्पनेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. पालक, शिक्षक व स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीने कार्यक्रमास अधिक रंगत आली.
एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव राजीवजी मणियार, सहसचिव धीरज काबरा, संचालक सतीशभाऊ परदेशी, मुख्याध्यापक एस. एस. राठी, उपमुख्याध्यापक पी. एच. नेटके व पर्यवेक्षक पी. एस. नारखेडे यांच्या उपस्थितीत मेळावा यशस्वी झाला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हेच या उपक्रमाचे खरे यश ठरले.



