साईबाबांच्या भक्तीचा आणि आदिमायेच्या शक्तीचा संगम; शिर्डी-वणी पदयात्रेचा ११ जानेवारीला शुभारंभ
शिर्डी प्रतिनिधी : ( तुषार महाजन )
साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिर्डी नगरीतून आदिमाया शक्तीपीठ सप्तशृंगी गडाकडे जाणाऱ्या भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑप. सोसायटी लि. शिर्डी (कर्मचारी वृंद) यांच्या वतीने आयोजित 'शिर्डी ते सप्तशृंगी गड (वणी)' या पायी पदयात्रा सोहळ्याचे हे २९ वे वर्ष असून, रविवारी (दि. ११) या भक्तीमय प्रवासाला प्रारंभ होत आहे.
गेल्या तीन दशकांपासून अखंडितपणे सुरू असलेली ही पदयात्रा शिर्डीतील कर्मचाऱ्यांच्या एकजुटीचे आणि श्रद्धाभावाचे प्रतीक बनली आहे. यंदाही मोठ्या उत्साहात रविवार, दिनांक ११ जानेवारी २०२६ ते बुधवार, दिनांक १४ जानेवारी २०२६ या कालावधीत हा सोहळा संपन्न होणार आहे. साईबाबांच्या चरणांचा आशीर्वाद घेऊन शेकडो पदयात्री वणीच्या दिशेने मार्गस्थ होतील.
या २९ व्या भव्य पदयात्रा सोहळ्यासाठी संस्थेचे चेअरमन श्री. विठ्ठल तुकाराम पवार (पा.) आणि व्हाईस चेअरमन श्री. पोपटराव भास्करराव कोते (पा.) यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. तसेच संस्थेचे सर्व संचालक मंडळ, सचिव, सहसचिव आणि संपूर्ण सभासद परिवार या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.
चार दिवस चालणाऱ्या या पदयात्रेत भजनाचा गजर, शिस्तबद्ध नियोजन आणि भक्तीमय वातावरण अनुभवायला मिळणार आहे. शिर्डी ते वणी हा प्रवास केवळ अंतर कापण्याचा नसून, साईभक्ती आणि देवीच्या शक्तीची सांगड घालणारा असल्याचे मत आयोजकांनी व्यक्त केले आहे. तरी या सोहळ्यात सहभागी होऊन दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

