खर्डी | प्रतिनिधी
ॐ साई श्रद्धा सेवा मंडळ, डोंबिवली यांच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारी पवित्र साईबाबांची पायी दिंडी श्रद्धा, सबुरी आणि सेवाभावाचा जिवंत अनुभव देणारी ठरली आहे. डोंबिवली येथून प्रस्थान करून शिर्डीला साईचरणी नतमस्तक होत ही दिंडी पुन्हा डोंबिवलीत दाखल होते. या संपूर्ण प्रवासात असंख्य साईभक्त आनंदाने, भक्तिभावाने सहभागी होत असतात.
या पवित्र पालखी सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी रात्रीचा मुक्काम खर्डी येथील श्री बालाजी राजस्थानी हॉटेल येथे अत्यंत भक्तीमय वातावरणात पार पडला. साईनामाचा अखंड गजर, टाळ-मृदंगांचा नाद आणि “साई साई”च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला होता. श्रद्धा–सबुरीचा सुगंध जणू हवेत दरवळत होता.
या मंगल प्रसंगी श्री सूरज सांडे माऊली व श्री जगदीश सांडे माऊली यांच्या सौजन्याने भाविकांसाठी भव्य व प्रेमळ साई भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले. पालखीतील साईमाऊलींच्या दर्शनानंतर भाविकांनी अत्यंत भक्तिभावाने प्रसादाचा लाभ घेतला. सेवाभाव, समर्पण आणि साईप्रेम यांचे जिवंत दर्शन या भंडाऱ्याच्या माध्यमातून अनुभवायला मिळाले.
या सेवाभावी व भक्तीपूर्ण उपक्रमामुळे पालखी सोहळ्याची शोभा अधिकच वाढली. लहानांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येक भाविकाच्या चेहऱ्यावर समाधान, शांतता आणि आनंद स्पष्टपणे दिसून येत होता. “सबका मालिक एक” या साईबाबांच्या महान संदेशाचा प्रत्यय या सेवेतून पुन्हा एकदा आला.
या संपूर्ण दिंडी प्रवासात भरत माऊली भोईर हे सर्व भाविकांची आपुलकीने काळजी घेत असून, नियोजन, शिस्त व सेवेत ते सदैव अग्रेसर असतात. त्यांच्या मार्गदर्शनामुळे दिंडीचा प्रत्येक दिवस सुरक्षित, सुव्यवस्थित आणि भक्तीपूर्ण वातावरणात पार पडतो.
या पवित्र सेवेसाठी ॐ साई श्रद्धा सेवा मंडळ, डोंबिवली यांच्या वतीने श्री सूरज सांडे माऊली व श्री जगदीश सांडे माऊली यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
ईश्वरचरणी प्रार्थना आहे की, साईबाबांचा कृपाशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी राहो व अशीच निस्वार्थ सेवा त्यांच्या हातून घडत राहो.
— ॐ साई श्रद्धा सेवा मंडळ, डोंबिवली 🙏🌸
०००

