संगमनेर तालुक्यातील रहिवाशी
शिर्डी ( प्रतिनिधी) :
पोलीस उपअधीक्षक सौ. पुष्पलता दिघे यांना उल्लेखनीय आणि उत्कृष्ट सेवेबद्दल भारत सरकारचे मानाचे राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. सौ.दिघे या संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील रहिवाशी असून रायगड विभाग महामार्ग सुरक्षा पथकात पोलिस उपअधीक्षक पदावर कार्यरत आहेत.
सौ.पुष्पलता दिघे यांना पोलीस दलातील त्यांच्या प्रदीर्घ आणि कर्तव्यदक्ष सेवेची दखल घेऊन हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. त्यांच्या कार्यकाळात विविध विभागांमध्ये अत्यंत आव्हानात्मक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. महामार्ग पोलीस सुरक्षा विभागात त्यांनी महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी ‘शून्य अपघात मोहिमे’ सारखे प्रभावी उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत. यापूर्वी राज्य गुप्तवार्ता विभागात कार्यरत असताना दहशतवाद आणि नक्षलवाद विरोधी मोहिमेत माहिती संकलनाचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले आहे. तसेच गुन्हे शाखेमध्ये असताना अनेक क्लिष्ट गुन्ह्यांची उकल करण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला आहे. विशेषतः गुन्हे शाखेत कार्यरत असताना ‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत पीडित महिला व मुलींची सुटका करणे, तसेच ‘ऑपरेशन स्माईल’च्या माध्यमातून अपहरण झालेल्या बालकांना शोधून त्यांना पुन्हा कुटुंबापर्यंत पोहोचवण्याच्या कामात त्यांनी विशेष योगदान दिले आहे. अनैतिक मानवी तस्करी आणि बालकामगार विरोधी मोहिमांमधील त्यांच्या कामगिरीची दखल देशपातळीवर घेण्यात आली आहे. त्यांच्या या कर्तबगारीबद्दल त्यांना यापूर्वी पोलीस महासंचालक आणि गृह विभागातर्फे राज्यस्तरीय पुरस्कारांनीही गौरवण्यात आले आहे. तसेच उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि पोलीस महासंचालक (सी आय डी) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.
रस्ता सुरक्षा जनजागृती, सायबर गुन्हे प्रतिबंध तसेच विविध महत्त्वाच्या तपास प्रकरणांमध्येही त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. गुप्तवार्ता संकलन व वेळेवर दिलेल्या अचूक माहितीमुळे विभागाला अमूल्य मदत झाली आहे.
सौ. पुष्पलता दिघे या १९९६ च्या PSI बॅचमधील पहिल्या महिला परेड कमांडर असून, त्यांच्या बॅचदरम्यान उत्कृष्ट कायदेशीर ज्ञान, कौशल्य आणि समर्पित सेवेसाठी त्यांना ६ प्रतिष्ठित कायदा पुरस्कार प्राप्त झाले. याच भक्कम पायावर त्यांच्या कायदा अंमलबजावणीतील उज्ज्वल कारकिर्दीची पायाभरणी झाली.
सौ पुष्पलता दिघे या प्रामाणिकपणा, विश्वासार्हता आणि व्यावसायिकतेच्या सर्वोच्च मूल्यांचे प्रतीक आहेत. कायदा अंमलबजावणी व सार्वजनिक सेवेप्रती त्यांची निष्ठा व समर्पण निश्चितच प्रशंसनीय आहे.
या त्यांच्या वरील उत्कृष्ट कार्याची दखल केंद्र शासनाने घेतली असून त्यांना पोलीस सेवेतील गुणवत्तापूर्ण सेवेबद्दलचे राष्ट्रपतीपदक 26 जानेवारी च्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आले आहे.
या यशामध्ये पती डॉ. राजाराम दिघे यांचे देखील मोलाचे योगदान आहे. ते महाराष्ट्र शासनाच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (निवड श्रेणी) या संवर्गातील वरीष्ठ अधिकारी असून सध्या ते ग्राम विकास मंत्रालयाआंतर्गत संचालक, ग्रामीण गृहनिर्माण, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई या पदावर कार्यरत आहेत. तसेच ते मुख्य कार्यकारी अधिकारी, व्हिलेज सोसियल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशन, मुंबई या पदाचा कार्यभार देखील पाहत आहेत.
राष्ट्रपती पदक जाहीर झाल्यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या त्यांच्या कामगिरीमुळे संगमनेरच्या नावलौकिकात मानाचा तुरा खोवला गेला असून अनेक तरुणी व तरुणांसाठी त्या आदर्श प्रेरणास्थान ठरत आहेत.
सौ दिघे यांच्या तपास कौशल्यामुळे ५ वर्षांच्या चिमुकल्या मुलीच्या अपहरण, बलात्कार व निर्घृण खून प्रकरणात आरोपीस फाशीची शिक्षा
७ वर्षांच्या मुलीवरील बलात्कार प्रकरणात आणि एका खुनाच्या गुन्ह्यात आरोपींना जन्मठेप..
ऑपरेशन मुस्कान, स्माईल अंतर्गत त्यांनी ९१ बेपत्ता, अपहृत मुलांचा शोध लावला, १०४ बालकामगार व भिक्षावृत्तीमध्ये अडकलेल्या मुलांची सुटका केली, तसेच ९ दीर्घकाळ प्रलंबित प्रकरणे आणि २१ बेपत्ता व्यक्तींची प्रकरणे उघडकीस आणली.

