मातेचे दु:ख मातेलाच ठावे
‘घाईत येतोस
आणि
परत जातोस...
आता कधी येशील?’
- मधुकर भावे
अजितदादा गेले... सर्वांनाच एक दिवस जायचे आहे... पण, दादांना आलेले मरण असे यायला नको होते... हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अनेकजण अचानक जातात... आमचे डॉ. गोवर्धनलाल पाराशर चहा पिता-पिता असेच अचानक गेले. दादांचे जाणे हे अचानक नाही... अत्यंतू क्रूर अशा काळाने त्यांच्यावर झडप घातली. दादांच्या मृत्यूचा धक्का इतका तीव्र होता की, अख्खा महाराष्ट्र हादरून गेला... सर्वांची एकच भावना होती की, ‘अरेरे’... असे मरण नको यायला होते...’ शिवाय अगदी बारामतीच्या वेशीजवळ येऊन दादा अचानक गेले... बारामतीच्या त्या धावपतट्टीवर दादांचे विमान आतापर्यंत इतक्यावेळा उतरले अाहे की, दादांना तो हवाई मार्ग पाठ झाला होता... दादा ‘पायलट’ असते तर त्यांनी काळोखातही ते विमान उतरवले असते... इतकी ती धावपट्टी दादांना माहिती होती... यापूर्वी विमान अपघातात माधवराव शिंदे असेच गेले... तो झटकाही मोठा होता. पण, त्यांचे छोटे विमान वादळात सापडले होते... तेही प्रचाराकरिताच जात होते. त्या घटनेलाही आता १५ वर्षे झाली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांचे हेलिकॉप्टर तर बेपत्ता होऊन जंगलात कोसळले. त्यांचाही मृत्यू भयानक होता. लष्करप्रमुख बिपिन रावत हे विमान अपघातातच गेले. पण दादांनी बारामतीच्या वेशीला जणू हात लावलेला होता... अगदी मिनीटात- दोन मिनिटात त्यांचे विमान उतरले असते तर त्यांच्यासाठी गाड्या सज्ज होत्या... ते निवडणूक प्रचाराला िनघाले होते... एका दिवसात प्रचार आटोपून संध्याकाळी मुंबईला परतणार होते... पण... नियती िकती क्रूर आहे...
शरद पवारसाहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर सकाळी ८ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात पोहचून पक्षासाठी राबलेले दादा होते. वयाच्या अवघ्या ३२ व्यावर्षी ते लोकसभेत खासदार म्हणून पोहोचले. पवारसाहेब हे १९९१ साली महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून आले. अजितदादांना त्यांनी लोकसभेच्या पोट निवडणुकीत पहिल्यांदा खासदार केले. दादा आमदार नंतर झाले... दादांनी सुरुवात संसदीय राजकारणापासून केली आणि मग ते विधानमंडळात आले. पण राबणाऱ्या नेत्यांमध्ये दादांऐवढा राबणारा नेता दुर्मिळ... झपाटल्यासारखे ते काम करायचे... पवारसाहेबांद्दल त्यांना परम अादर होता. पवारसाहेब ज्या व्यासपीठावर असायचे त्या व्यासपीठावर भाषण करायलाही दादा संकोच करायचे. प्रशासनावर त्यांचा वचक, धाक, दरारा होता... कारण त्यांना ‘फाईल’ समजत होती. प्रशासनातील अध्िाकारीमंडळी त्यांना ‘चकवे’ देवू शकत नव्हती. त्यांचा अभ्यासही होता... निरिक्षणही चांगले होते.... विचासणरणी सकारात्मक होती. ‘न होणारे काम नियमात बसवून कसे करून घ्यायचे’, याची एक खूबी त्यांना माहिती होती. त्यामुळे दादांनी एकदा ‘हो’ म्हटले की, काम होणारच... ही सामान्य माणसाला खात्री होती. त्यातूचन दादांचे नेतृत्त्व लोकाभिमूख होत गेले... त्यांची भाषा, त्यांची भाषणे व्यवहारी होती. ती कार्यकर्त्यांच्या मनाला थेट भिडायची... प्रशासनाला त्यांची भिती नव्हती.. त्यांचा दरारा असायचा... ‘भिती’ शब्दाचा अर्थ वेगळा आहे... ‘दरारा’शब्दाचा अर्थ वेगळा आहे...
महाराष्ट्रात वसंतराव पाटील हे ‘वसंतदादा’ झाले... ते ‘दादा’ घरातले वाटायचे... पण हे दादा एक वेगळे रसायन होते. बाळासाहेब देसाई यांच्यानंतर गेल्या ६५ वर्षांत प्रशासनाला दरारा वाटणाऱ्या नेत्याचे नाव कोणी विचारले तर त्याचे नाव ‘अजितदादा’ हेच आहे. शरद पवारसाहेबांचा आवाका दादांपेक्षा खूप मोठा.... त्यांच्याविषयीचा प्रशासनाला पूर्ण आदर... पण दादांचे व्यक्तिमत्त्व वेगळे घडले. अशा या दादांचा मृत्यू इतका भीषण झाला की, तो चटका कालपासून अस्वस्थ करून गेलाय... तडक उठून बारामतीला जावे, असे सतत वाटायचे... पण ज्या गर्दीचे पूर्वी आकर्षण वाटायचे... त्या गर्दीत आता उभे राहण्याची किंवा फार चालण्याची ताकद राहिलेले नाही. निसर्ग नियमाने अशी हतबलता येते.... महाराष्ट्रातील गेल्या ६५ वर्षांतील तीन पिढ्यांचे मी राजकारण पाहतोय.... महाराष्ट्रातील असा एकही प्रसंग नाही.... ज्याचा मी साक्षीदार नाही... यशवंतराव, भाऊसाहेब हिरे, मालोजीराव निंबाळकर ही पिढी पाहिली.... वसंतदादा, शंकरराव चव्हाण, राजारामबापू, बाळासाहेब देसाई, मधुकरराव चौधरी, प्रतिभाताई पाटील, यशवंतराव मोहिते, हे कर्तबगार मंत्री पाहिले... नंतरच्या पिढीत शरद पवारांची पिढी आहे.... आणि मग विलासराव- अजितदादा ही पिढी आहे... विलासराव आणि आर. आर. आबा हे ही अकाली गेले... पण, त्यांच्या भीषण दुखण्याने समाजाची एक मानसिकता तयार झाली होती... सर्वांच्या प्रार्थना सुरू होत्या... पण त्या सफल झाल्या नाहीत... माधवराव शिंदे, गोपिनाथ मुंडे, अजितदादा यांचा मृत्यू असा नाही... विनोबांनी मृत्यूला ‘महोत्सव’ म्हटले... पण दादांचा मृत्यू हा ‘महोत्सव’ म्हणता येणार नाही.. हा ‘दु:खोत्सव’च आहे.
पवारसाहेबांचे दु:ख तर कल्पनेच्या पलिकडचे आहे. माशाचे अश्रू पाण्यात दिसत नाहीत... पण त्याला दु:ख होत नसेल, असे थोडेच आहे....? गेल्या ६६ वर्षांत पवारसाहेबावरील अनेक राजकीय घटना अशा आहेत की, सह्याद्रीचा हा कडा असा अविचल रािहलेला आहे. त्यांच्या तोडीचा नेता होणेच नाही.. पवारसाहेब पहिल्यांदा ज्या दिवशी मुख्यमंत्री झाले.. ती तारीख १८ जुलै १९७८ आहे. शपथ घेतल्यानंतर त्यांनी त्यांच्या मातेला म्हणजे त्यांच्या आवडत्या ‘बाईला’... (सर्व पवारबंधू आपल्या आईला बाईच म्हणायचे) एक पत्र लिहिले...शरद पवारसाहेबांच्या राजकारणातील पहिल्या गुरू म्हणजे मातोश्री शारदाबाई याच होत्या. यशवंतराव चव्हाण हे पवारसाहेबांच्या घरी गेले आणि त्यांनी शारदाबाईंना सांगितले की, ‘तुमचा मुलगा राजकारणासाठी आमच्या ओटीत टाका...’ आणि शारदाबाईंनी ‘हो’ म्हटले... पवारसाहेबांना घडवण्यात मातोश्री शारदाबाईंचा मोठा वाटा... अजितदादांना घडवण्यात पवारसाहेबांचा मोठा वाटा...
शरद पवारसाहेब पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर आप्ाल्या आईला लिहिलेल्या पत्रात त्यांनी एकच वाक्य लिहिले... ‘बाई, आज मी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली... नामवंत लोक समोर हाेते... पण, मला तू समोर हवी होतीस... आणि तू समोर नव्हतीस...’ त्यावेळी पवारसाहेबांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले होते... त्यानंतर काळ झपाट्याने पुढे गेला आिण ५० वर्षांनी दादांच्या अकाली मृत्यूसंबंधांत आपल्या भावना व्यक्त करताना पवारसाहेबांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले... ते पाहात असताना महाराष्ट्रातील लाखो कार्यकर्त्यांच्या भावना काय झाल्या असतील ते घरात बसून जाणवत होते. सह्याद्री गद्गगद झाल्याचे जाणवले. आणि हे दु:ख ते कसे सहन करतील, यामुळेही महाराष्ट्र अस्वस्थ आहे. गेली १२ वर्षे पवारसाहेब सत्तेत नाहीत... पण ते हिंमतीने त्यांच्या विचारांवर उभे आहेत... त्यांच्या इच्छाशक्तीने ते लढत आहेत... त्यांच्या बरोबरचे... जवळचे... रक्ताचे सोडून गेले तरी, त्यांनी त्यांच्याबद्दल एकही वावगा शब्द उच्चारला नाही... आणि दादांनीही कुटुंबात मिसळताना कसलाही वेगळेपणा जाणवू दिला नाही... त्यामुळे राजकारणातील ‘वाद’ किंवा ‘भांडण’ हे किती शुल्लक काळासाठी असते, हे महाराष्ट्र पाहतो आहे... सगळे काही विसरून गेल्यासारखे आहे... राजकारण होत राहिल... पण, या अशा कुटुंबाच्या ऐक्याच्या भावना आणि अश्रू हे किती सामर्थ्यवान आहेत... हाही इतिहास लिहिला जात आहे...
दादा, तुमचे अचानक जाणे असे सर्वांची मने चिरून गेलेले आहे... तुमची कामाची तडफ, तुमची जिद्द, तुमचा उत्साह, चुकांची कबुली देण्याची तुमची उदारता... आणि पवारसाहेबांशी मतभेद झाले तरी त्यांच्याबद्दलचा आदर हे सगळे महाराष्ट्र मनोमन जाणतो आहे... तुमचे मतभेद झाले पण मनभेद झाले नव्हते... तसे म्हटले तर यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा यांचे भांडण झाले नव्हते का? टोकाचे भांडण झाले होते... जगात हे दोन असे नेते आहेत की, ज्यांचे ‘भांडण मिटवण्याकरिता जाहिर सभा’ झाली आिण ते भांडण मिटले. (२२ मे १९८२ औदुंबर)
अजितदादा गेले... त्यांच्या जाण्याने उद्याचे राजकारण कसे होईल, हे आज सांगता येणार नाही... ते कसे व्हावे, हे सांगण्याची आज वेळही नाही... समाजमाध्यमांनी एकीकडे दादांच्या अपघाताची दृष्ये दाखवताना ‘राष्ट्रवादीचे काय होईल....’ ‘पवारसाहेबांचे काय होईल...’ अशा बालीश आणि अप्रस्तूत प्रश्नांची चर्चा घडवून आणली... आणि हमरी-तुमरीने मते मांडली गेली... अरे, प्रसंग काय.... विषय काय... तुम्ही विमान अपघाताची चित्र एकीकडे दाखवता आहात... आणि तुमच्या चॅनलवर चर्चा काय करत आहात....? आग लागो त्या समाजमाध्यमांना... इतका संताप येऊन गेला... मीही ६५ वर्षे पत्रकारितेत काढली आणि आजही निवृत्त झालो नाही... माझ्या लेखणीचे वय आजही ३० वर्षांचेच आहे. आणि माझ्या शब्दांचे वयही तेवढेच आहे. लेखणी आणि वय ८६ वर्षांचे झालेले नाही. पण ते सगळे ऐकत, पाहात असताना पत्रकारितेची किळस आली. आजच्या राजकारणाच्या बाजाराची चर्चा करताना कोणत्या दिवशी करावी, याचे भान शहाण्या संपादकांना नसावे.... राजकारणाचा अध:पात झालाच आहे... आमची पत्रकारिताही आम्ही मातीत घातल्यासारखी झालीय... आपल्याच पत्रकारितेची लाज वाटावी, असे कालच्या दिवशी ती चर्चा ऐकताना वाटले... शेवटी टी.व्ही. बंद करून टाकला.. शांतचित्ताने दादांबद्दल अनेक आठवणी येत राहिल्या.
१२ डिसेंबर २०१० रोजी शरद पवारसाहेब ७० वर्षांचे झाले तेव्हा त्यांच्यावर ‘एकमेव’ असा एक ग्रंथ तयार केला... सुनील तटकरे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता... त्यासाठी बारामतीला गेलो... किरण गुजर यांनी पवारसाहेबांचे सगळे प्रकल्प दाखवले... ‘मती गुंग करणारी बारामती’ हा विस्तृत लेख त्यातूनच तयार झाला. झटकन मनात आले की, दादांच्या आईंनाही भेटावे... विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त किरण गुजर आणि मी दादांच्या घरी गेलो... श्रीमती आशाताई अनंतराव पवार म्हणजेच दादांच्या आई. काट्याच्या वाडीला त्या असतात... अजित पवार यांनी आपल्या जुन्या घराच्या जागेवरच नवीन घर बांधले त्या घरामध्ये आशाताई राहतात... त्यांनी शरद पवारसाहेबांबद्दल सांगितले की, ‘ते माझे धाकटे दीर... त्यांच्यामुळेच सगळे पवार कुटुंबीय दिवाळीत बारामतीला चार दिवस आम्ही एकत्र राहतो... सगळ्या कुटुंबीयांना एकत्र आणणारी प्रत्येक दिवाळी अशी आनंदाची असते... पण निघायची वेळ आली की, हूरहूर लागते... मग मी पुन्हा घरी एकटी... पण, मनाला मी समजावले आहे... घराण्यातील सर्वांनीच आपला वेळ समाजासाठी दिलेला आहे... आणि माझा मुलगा अजित तरी काय.... त्यानेही राजकारणाला वाहून घेतलेय... काट्याच्या वाडीला आला तरी पाच-पंचवीस कार्यकर्त्यांना घेऊनच येतो... घाईघाईतच येतो... मी आपली त्याची वाट बघत असते.... निघायची वेळ आली की, कार्यकर्त्यांना सांगतो, ‘अरे, आईला पाच मिनीटे तरी भेटायला जाऊ द्याल की नाही....?’ मग स्वयंपाक घरात येतो... बसतो... ‘काही खा’ म्हटले तर ‘नको-नको’ म्हणतो... ‘जातो -जातो’ म्हणतो... आणि पाठमोरा होऊन बाहेर पडतो.... तो पाठमोरा झाला की, मी आपली पाठमोरी त्याच्याकडे पाहात राहाते... ‘समाजाकरिता काम करतो आहेस ना... कर बाबा... घाईत येऊन जातोस... आता कधी येशील? असे विचारते... माझे तुला आशीर्वाद आहेत...’ असे म्हणते...
आमची सुनबाई सुनेत्रा. ती मात्र येते आणि तिने बघता बघता गाव बदलून टाकले... पण दादाचे काही येणे फारसे होत नाही... माझं जाणे होत नाही... तो आला की लगेच निघाला... मग त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे मी अशी पाहात राहते... ‘आता पुन्हा कधी येशील रे....’ मनाशीच म्हणत राहते...
आज त्या दिवसाची मुलाखत आठवली... आता आशाताई दारात उभ्या राहून ‘त्यांचा लाडका अजित कधी येईल,’ त्याची वाट पाहात असतील का?... त्या मातेचे दु:ख काय असेल... पवारसाहेबांचे दु:ख आणि अजितदादांच्या मातेचे दु:ख महाराष्ट्राला समजू शकेल का?
राजकारण गेले चुलीत... असं म्हणण्याची वेळ आली आहे. देवा, तू असशील तर असे मरण कोणत्याही राजकीय नेत्याला येऊ देऊ नकोस... आणि त्याच्या आईला वाट पहायला लावू नकोस.... आज आणखी काय म्हणता येईल...
दादा, तुमच्या अंत्यसंस्काराच्या वेळी फार चालण्याची शक्ती नसल्यामुळे त्या गर्दीत यायला मनाची तयारी झाली नाही.. मनाने तिथेच आहे...
तुमची-माझी शेवटची भेट ही जांबोरी मैदानावर तुम्ही माझा सत्कार करूनच झालेली आहे... जावेद अख्तर आणि मी....
आज तुम्ही नाहीत.... तुम्ही परत येणार नाहीत, हे माहिती आहे... त्यामुळेच विनोबांनी मृत्यूला ‘महोत्सव’ म्हटले तरी तुमचा हा मृत्यू महाराष्ट्रासाठी ‘दु:खोत्सव’च आहे...
दादा,
भावपूर्ण श्रद्धांजली...
पवारसाहेब,
तुमच्यासोबत नेहमीच राहिलोय... या दु:खात तुमच्या सोबत आहे.

