वडाळा महादेव (वार्ताहर) येथील उत्सव मंगल कार्यालया जवळील श्रीसाई मंदिर यांच्या संकल्पनेतून, सर्वेश्वर धर्म सेवा मंडळातर्फे 'घरोघरी श्रीमद् भगवत गीता पठण' ह्या उपक्रमामुळे भारतीय आदर्श, कौटुंबिक संस्कार आणि वाचन संस्कृती वाढवेल असे मत वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर येथील सरस्वती कॉलनी मधील श्रीमती बेबी मुरलीधर पा. पवार यांच्या निवासस्थान प्रांगणात श्रीमद भगवत गीता पठण प्रथम कार्यक्रमाचे उद्घाटनपर भाषणात डॉ. बाबुराव उपाध्ये बोलत होते. मुख्य व्यासपीठ वाचक ह.भ.प. डॉ. पुरुषोत्तम कोळपकर महाराज व ह.भ.प. अशोकराव पा. शिंदे महाराज यांच्या संयोजनाखाली या उपक्रमात श्रीमती बेबी मुरलीधर पा. पवार यांनी सर्वांचे स्वागत केले.
भारतीय धर्मग्रंथ, स्वदेश,स्वभाषा जपणे गरजेचे:- ह.भ.प. डॉ. पुरुषोत्तम कोळपकर
मुख्य वाचक व्यासपीठ वाचक ह.भ.प. डॉ. कोळपकर महाराज यांनी डॉ. बाबुराव उपाध्ये यांचा परिचय करून देताना सांगितले, ते एक अभ्यासू, संशोधक आणि संस्कृतीशील लेखक आहेत. त्यांच्या हस्ते प्रथम उपक्रमाचे उद्घाटन करण्यात अधिक धन्यता वाटते. आजच्या स्थितीत देशभक्ती, धर्मनीती,धर्मग्रंथ संस्कृती, कुटुंबनीती, स्वभाषावृत्ती अशी पंचभक्ती जपली पाहिजे असे सांगून त्यांनी उपक्रमाचे महत्त्व सांगितले.
डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी प्रतिमापूजन, दीपप्रज्वलन करून उपक्रमाचे उद्घाटन केले.डॉ. उपाध्ये म्हणाले, धर्मसेवा मंडळाचे नारायणराव पा. डावखर, माजी नगराध्यक्षा सौ.इंदुमती डावखर, ह.भ.प. विठ्ठलराव पा. साबळे यांच्या मार्गदर्शनातून सुरु झालेला हा उपक्रम सामाजिक,सेवाभावाचा तसेच मानसशास्रीय आणि संस्कृतीपोष क असल्याचे सांगितले, त्यामुळे घरोघरी श्रीमद भगवत गीता जाऊन पोचेल आणि उगवत्या पिढीवर नीतीसंस्कार होतील,असे सांगून डॉ. उपाध्ये यांनी गीतापठण मध्ये भाग घेतला. यावेळी त्यांनी 'आठवणीतील देवमाणसं' पुस्तके देऊन सर्व संयोजकांचा सन्मान केला. ह.भ.प. अशोकराव शिंदे महाराज यांनी देवकी नंदन गोपाला भजन सादर करून सांगितले की, वर्षभर हा उपक्रम राज्यभर घरोघरी होत असून समारोप देवाची आळंदी येथे होणार आहे. ह.भ.प. विठ्ठलराव पा.साबळे महाराज यांनी गीतापठण आणि नीतीमूल्यांचे महत्त्व सांगितले. विवेक भोईर, मंदाताई पवार, चंद्रकला भाऊसाहेब डोळस, रत्नमाला धनवटे, लता कोठावळे, गौरीताई हजारे, मनिषा कुलकर्णी, कलावती आढाव, रुक्मिणीताई साबळे, सुलोचना ढोकणे यांनी श्रीमद भगवत गीता पठण उपक्रमात भाग घेतला.

