पिंपरी चिंचवड:-
प्रभाग क्रमांक १४ रामनगर येथून वडार समाजाचे सक्रिय सामाजिक कार्यकर्ते लखन हरिश्चंद्र पाटकर यांना भारतीय जनता पार्टीकडून स्वीकृत नगरसेवक अथवा शासकीय समितीवर प्रतिनिधित्व देण्याची दाट शक्यता असल्याची जोरदार चर्चा राजकीय व सामाजिक वर्तुळात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर रामनगरसह संपूर्ण वडार समाजात समाधान आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
लखन पाटकर हे सुशिक्षित, संयमी आणि सर्व समाजाशी सलोख्याचे संबंध ठेवणारे व्यक्तिमत्त्व म्हणून रामनगर परिसरात परिचित आहेत. गेल्या १० ते १२ वर्षांपासून ते ‘वडार मजूर शिल्प प्रतिष्ठान’चे सक्रिय सदस्य असून समाजाच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत आहेत. दरवर्षी १ मे रोजी साजऱ्या होणाऱ्या कामगार दिन कार्यक्रमात त्यांचा आवर्जून सहभाग असतो.
पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरातील वडार समाजाच्या विविध संघटनांमध्ये ते सक्रीय भूमिका बजावत असून समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे.
विशेष म्हणजे, पिंपरी चिंचवडमधील भारतीय जनता पार्टीचे चारही आमदार यांच्याशी त्यांचे सौहार्दपूर्ण संबंध असून आमदार अमित गोरखे यांचे ते जवळचे म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांना पक्षाकडून न्याय मिळण्याबाबत वरिष्ठ स्तरावर सकारात्मक चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
रामनगर परिसरातील तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा भरघोस पाठिंबा लखन पाटकर यांच्या पाठीशी असून, त्यांच्या सामाजिक कार्यामुळे त्यांच्याविषयी विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. जर त्यांना पक्षाकडून संधी मिळाली, तर वडार समाजाला प्रथमच प्रभावी राजकीय प्रतिनिधित्व मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

