माजी शिक्षक–विद्यार्थ्यांचा भावनिक मिलाफ; गुरु–शिष्य नात्याला नवसंजीवनी.
वावडे | प्रतिनिधी —
“जे तुटते ते पुन्हा जोडता येते आणि अधिक मजबूतही होते,” या भावनेतून बी.बी. ठाकरे हायस्कूल,वावडे येथे माजी विद्यार्थीशिक्षक ऋणानुबंध मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.तब्बल ४७ वर्षांपासून दुरावलेले गुरु–शिष्य व मुख्याध्यापक या निमित्ताने एकत्र आले आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
मेळाव्याच्या प्रारंभी शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ माजी गुरुजनांचे औक्षण, पुष्पवृष्टी व वाजत-गाजत स्वागत करण्यात आले. विद्यार्थिनींनी स्वागतगीत व ईश्वस्तवन सादर केले. दिवंगत शिक्षक व विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक एस.बी. पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून वाय.आर. शिंदे, जी.ए. चौधरी, प्रा. बी.जे. जाधव, पी.बी. ठाकरे, जे.व्ही. पाटील उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मेळाव्याची सुरुवात झाली.
मेळाव्यात माजी शिक्षकांनी मनोगते व्यक्त केली, तर जी.ए. चौधरी यांनी भारुड व गवळण सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. माजी विद्यार्थ्यांच्या अनुभवकथनाने वातावरण भावनिक झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव गोसावी यांनी केले. आभार प्रदर्शन सुदाम पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक, माजी विद्यार्थी व इयत्ता आठवी–नववीच्या विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले.
मान्यवरांचे... विचार.
एस.बी. पाटील (माजी मुख्याध्यापक, अध्यक्ष):
“शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नातं काळानुसार बदलत नाही, ते अधिक घट्ट होत जातं.”
वाय.आर. शिंदे (माजी शिक्षक):
“ही शाळा केवळ इमारत नाही, तर आमच्या आयुष्याचा संस्कार आहे.”
प्रा. बी.जे. जाधव (माजी शिक्षक):
“गुरु–शिष्य परंपरा जपली गेली, तर समाज अधिक सक्षम बनेल.”
जी.ए. चौधरी (माजी शिक्षक):
“कलेच्या माध्यमातून संस्कार रुजवण्याचं काम शाळेने कायम केलं.”
एस.वाय. पाटील (माजी विद्यार्थी):
“आज पुन्हा विद्यार्थी झाल्यासारखं वाटलं, गुरुजींच्या चरणी नतमस्तक आहे.”
एन.डी. गोसावी (माजी विद्यार्थी):
“शाळेने दिलेले संस्कारच आजच्या यशाची शिदोरी ठरले.”
सी.जी. पाटील (माजी विद्यार्थी):
“हा मेळावा म्हणजे आयुष्यातील अमूल्य क्षणांचा सोहळा आहे.”
सुनंदा पाटील (माजी विद्यार्थिनी):
“गुरुजींच्या शिकवणीमुळेच आत्मविश्वासाने उभं राहता आलं.”





