राहुरी | प्रतिनिधी : समाजातील शांतता, सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या राहुरी पोलिसांच्या उल्लेखनीय कामगिरीचा क्रांतीसेना व प्रहार संघटनेच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. ‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत अपहरण झालेल्या सुमारे १०० अल्पवयीन मुलींचा शोध लावणारे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आणि राहुरी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी - कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी पारंपरिक शाल-श्रीफळ, पुष्पगुच्छ देण्याऐवजी बाळासाहेब भोर लिखित ‘प्रवरेच्या काठावरून’ या काव्यसंग्रहाची पुस्तके भेट देत अभिनव पद्धतीने सन्मान करण्यात आला. गेल्या नऊ वर्षांत विविध प्रकरणांत अपहरण झालेल्या जवळपास १०० अल्पवयीन मुलींचा मागील दोन वर्षांत शोध घेऊन त्यांना सुरक्षिततेचा आधार देणे, तसेच भारतातील विविध रेल्वे स्थानकांवरून अपहरण करून वेठबिगारीत ठेवलेल्या २३ महिला-पुरुषांची मुक्तता करून गुन्हेगारांना कायद्याचा धाक दाखवणे, ही पोलिसांची गौरवास्पद कामगिरी ठरली आहे.
या कामगिरीची दखल घेत नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे व जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या वतीनेही पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले होते. त्याच अनुषंगाने क्रांतीसेना व प्रहारच्या वतीने राहुरी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक संजय डेंगळे व सर्व पोलीस अधिकारी - कर्मचाऱ्यांचा पुस्तकभेटीद्वारे विशेष सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी प्रहारचे तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे, क्रांतीसेनेचे संपर्क प्रमुख मधुकर म्हसे, सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब पवार, सुरेश म्हसे, ज्ञानेश्वर पवार, पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ, सहायक फौजदार तुळशीदास गिते, अशोक शिंदे, पोहेकॉ. जालिंदर साखरे, पोहेकॉ. संदीप ठाणगे, पोहेकॉ. विकास साळवे, पोहेकॉ. गणेश सानप, पोकॉ. अजिनाथ पाखरे, पोकॉ. प्रमोद ढाकणे यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
0000

