नवी मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकांवर सरकते जिने (Escalators) उपलब्ध नसल्याबाबत – यापूर्वीच्या पत्रव्यवहाराकडे दुर्लक्ष केल्याबद्दल तीव्र खंत व तातडीच्या कारवाईची मागणी
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
नवी मुंबई ही आंतरराष्ट्रीय दर्जाचे नियोजनबद्ध शहर म्हणून ओळखली जाते. मात्र प्रत्यक्षात येथील बहुतांश रेल्वे स्थानकांवर आजतागायत सरकते जिने (Escalators) उपलब्ध नसणे, ही अत्यंत खेदजनक बाब आहे.
या संदर्भात यापूर्वी देखील संबंधित लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे वेळोवेळी लेखी पत्रव्यवहार करून मागणी करण्यात आलेली आहे. मात्र दुर्दैवाने आजतागायत या गंभीर विषयाची कोणतीही ठोस दखल घेण्यात आलेली नाही, ही बाब नवी मुंबईकरांमध्ये तीव्र नाराजी निर्माण करणारी आहे.
नवी मुंबईकरांनी यापूर्वी खासदार म्हणून माननीय श्री. राजन विचारे साहेब (शिवसेना) यांना तसेच त्यानंतर आपणासही भरघोस मतांनी निवडून दिले. शिवसेना हे मराठी माणसांच्या हक्कांचे व्यासपीठ आहे, या विश्वासावर जनतेने आपल्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. मात्र आजही वयोवृद्ध नागरिक, महिला, दिव्यांग व आजारी प्रवाशांना प्रत्येक वेळी रेल्वे प्लॅटफॉर्मवर जिने चढ-उतार करण्याची सक्ती होत आहे.
मुंबई शहरातील जवळपास सर्वच रेल्वे स्थानकांवर सरकते जिने उपलब्ध असताना, केवळ नवी मुंबईतील स्थानकांकडे सातत्याने दुर्लक्ष का होत आहे, हा प्रश्न उपस्थित होतो. रेल्वेचे मोठे बजेट असताना आणि सिडकोमार्फत आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारला जात असताना, नवी मुंबईकरांना मूलभूत सुविधा मिळू नयेत, ही बाब अत्यंत दुर्दैवी व अन्यायकारक आहे.
आपणास नवी मुंबईकरांची खरी काळजी आहे का, की नागरिकांचे प्रश्न फक्त निवडणुकीपुरतेच मर्यादित राहतात, असा सवाल आज सामान्य जनता विचारत आहे. “आंतरराष्ट्रीय नियोजित शहर” ही संकल्पना केवळ कागदावरच राहणार आहे का, याचे उत्तर कृतीतून अपेक्षित आहे.
तरी आपणास नम्र पण ठाम विनंती आहे की, येणाऱ्या १ फेब्रुवारी २०२६ रोजी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात नवी मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकांवर सरकते जिने, स्वच्छता व पुरेशा पार्किंगसह आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने ठोस मागणी करावी व ती प्रत्यक्षात उतरवावी.
या वेळी तरी नवी मुंबईकरांच्या वारंवारच्या मागणीची दखल घेतली जाईल, अशी अपेक्षा आहे.
धन्यवाद.
जय हिंद
जय महाराष्ट्र
आपला विश्वासू,
ॲड. चंद्रकांत निकम
अध्यक्ष, समता सहकारी सामाजिक संस्था
अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा रहिवासी प्रवासी संघ
प्रत :
१) माननीय श्री. अश्विनी वैष्णव – रेल्वेमंत्री, भारत सरकार
२) माननीय श्री. एकनाथ शिंदे – उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
३) माननीय व्यवस्थापकीय संचालक – सिडको

