नगर प्रतिनिधी: ( तुषार महाजन )
मृत्यू हे जीवनाचं अंतिम आणि अटल सत्य आहे… पण तरीही आपण ते रोज विसरतो,” अशा शब्दांत चेअरमन विठ्ठल पवार यांनी आयुष्याच्या क्षणभंगुरतेवर अत्यंत भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली. अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला असताना, आजचा दिवस जगा हा मूक पण खोल संदेश त्यांनी समाजाला दिला.
ते म्हणाले, “सकाळी हसत घराबाहेर पडलेली व्यक्ती संध्याकाळी परत येईलच याची खात्री नसते. तरीही आपण उद्याच्या चिंतेत, भविष्यातील स्वप्नांत आणि अजून मिळवायचं आहे या धावपळीत आजचा क्षण गमावतो. आयुष्य हातातून निसटतं… आणि आपल्याला कळतही नाही.”
अजितदादा पवार यांच्या अकाली जाण्याने ही जाणीव अधिक तीव्र झाली आहे. “आज दादा गेले, पण त्यांच्या जाण्याने फक्त एक नेता नाही, तर अनेकांच्या आयुष्याला दिशा देणारा आधार हरपला आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो,” अशा शब्दांत त्यांनी श्रद्धांजली अर्पित केली.
“शेवटी पैसा, पद, प्रतिष्ठा, सत्ता काहीच सोबत येत नाही. माणसासोबत जातं ते फक्त त्याने कमावलेलं प्रेम, केलेली माणुसकी आणि लोकांच्या मनात राहिलेली आठवण,” असे सांगताना त्यांचा आवाज शब्दांतूनही भरून आलेला जाणवत होता.
चेअरमन विठ्ठल पवार पुढे म्हणाले, म्हणूनच राग, मत्सर, अहंकार मनात साठवू नका. माफ करा, जवळच्या माणसांशी बोला, मित्रांना वेळ द्या. कारण वेळ कोणासाठीही थांबत नाही. भौतिक सुख ही मोहमाया आहे, पण समाधान, प्रेम आणि शांतता हीच खरी संपत्ती आहे.
उद्या काय होईल हे कुणालाच माहीत नाही. पण आज आपल्या हातात आहे. म्हणून आजचा दिवस जगा, मनापासून जगा, प्रामाणिकपणे जगा. जे आज आपल्या सोबत आहेत, त्यांना आपलं प्रेम आजच दाखवा,” असा भावनिक साद त्यांनी समाजाला घातला.
शेवटी त्यांनी साईबाबांच्या चरणी नतमस्तक होत, “राम कृष्ण हरी…” असे म्हणत अजितदादांना अंतिम आदरांजली अर्पित केली.

