जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
लोकभवनात वेगवेगळ्या राज्यपालांच्या कार्यकाळात शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम झाले आहेत.
महाराष्ट्र राज्य निर्मितीचा शासकीय सोहळा दिनांक ३० एप्रिल १९६० रोजी रात्री साडेअकरा वाजता सुरु झाला व रात्री बारानंतर - म्हणजे दिनांक १ मे १९६० रोजी पंडित नेहरू यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्याचे विधिवत उदघाटन झाले होते.
या कार्यक्रमात लता दीदींनी ज्ञानेश्वर माऊलीचे पसायदान गेले होते. हा कार्यक्रम राज्यपाल श्रीप्रकाश व मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत झाला होता.
कालांतराने पंडित सी आर व्यास यांनी देखील दरबार हॉल येथे सादरीकरण केले होते.
*संगीताला राजाश्रय
आपल्या सव्वा तीन वर्षांच्या कार्यकाळात (डिसेंबर २००४- मार्च २००८) राज्यपाल एस एम कृष्णा यांनी शास्त्रीय संगीताला खऱ्या अर्थाने राजाश्रय दिला.
कृष्णा यांनी लोकभवनात संगीत मैफिली आयोजित केल्या, कलाकारांना सन्मानित केले आणि मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी सुरु असलेल्या संगीत मैफिलींना रसिक प्रेक्षक या नात्याने हजेरी देखील लावली.
सुरुवातीला कृष्णा यांनी प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका गंगुबाई हनगळ यांना लोकभवनावर खास निमंत्रित करुन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करवला.
सन २००५ साली गांधी जयंतीला त्यांनी प्रसिद्ध गायिका कीर्ती शिलेदार यांच्या भजनांचा कार्यक्रम आयोजित केला. त्यावेळी जयमाला शिलेदार यांनी कीर्ती यांना हार्मोनियमवर साथसंगत केली होती.
कृष्णा हे पंडित हरिप्रसाद चौरासिया यांच्या बासरीचे मोठे फॅन होते. रसिक प्रेक्षक म्हणून कुठलाही लवाजमा सोबत न घेता ते नेहरू सेंटर अथवा मुंबईतील इतर ठिकाणी चौरसिया यांच्या कार्यक्रमांना हजेरी लावत.
आपल्या कार्यकाळात कृष्णा यांनी राजभवनात तीन दिवसांच्या संगीत संमेलनाचे आयोजन केले होते. यावेळी पंडित जसराज, पंडित शौनक अभिषेकी व कर्नाटक संगीत क्षेत्रातील सुधा रघुनाथन यांनी लोकभवन संगीतमय केले होते.
सन २००६ साली कृष्णा यांनी पुणे येथे जाऊन पंडित भीमसेन जोशी यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली होती.
कार्यकाळ संपवून जाता-जाता कृष्णा यांनी कर्नाटक संगीतातील शिरोमणी डॉ एम बालमुरलीकृष्ण यांसह शुभा मुद्गल व बॉम्बे जयश्री यांच्या संगीत सभेचे दरबार हॉल येथे आयोजन केले होते.
*अरुण गवळी यांची हजेरी
राजभवनातील एका संगीत मैफिलीला अवचित त्यावेळी आमदार असलेले अरुण गवळी आले होते. ते आपल्या नेहमीच्या वैशिष्ट्यपूर्ण पेहरावात आले आणि शांतपणे मागच्या खुर्चीवर जाऊन बसले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांना अरुण गवळी हे आमदार असल्याचे समजल्यावर त्यांनी लगेचच त्यांना सन्मानाने पुढे नेले व राज्यपाल बसत असलेल्या पहिल्या रांगेत नेऊन बसविले.

