राहुरी (वांबोरी) : राहुरी तालुक्यातील वांबोरी गाव हद्दीतील कुक्कडवेढे,गडाख वस्ती- मोरेवाडी या दोन मुख्य रस्त्यांना जोडणारा महत्त्वाचा जोड रस्ता अतिक्रमणामुळे बंद झाल्याने शेतकऱ्यांचे दैनंदिन जीवन व शेती कामकाज गंभीरपणे प्रभावित झाले आहे. शिव पानंद रस्ते चळवळ अंतर्गत हा रस्ता तातडीने मोकळा करून दळणवळणासाठी सुरू करावा, अशी ठाम मागणी वांबोरी गावातील शेतकऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी राहुरी तहसीलदारांना लेखी निवेदन सादर केले. सदर रस्ता अंदाजे दीड किलोमीटर लांबीचा असून त्यातील सुमारे अर्धा किलोमीटरचा भाग अतिक्रमणामुळे पूर्णपणे बंद आहे. परिणामी सुमारे ३०० ते ४०० शेतकरी व ग्रामस्थांना तीन किलोमीटरचा अतिरिक्त वळसा घ्यावा लागत आहे.
सदर रस्ता वांबोरी गावातील अनेक शेतकरी व ग्रामस्थांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून, संबंधित बहुतांश शेतकऱ्यांनी रस्त्याची मोजणी करून मार्ग मोकळा करण्यास संमती दर्शवलेली आहे. तरीही प्रशासनाकडून अद्याप ठोस निर्णय झालेला नसल्याने गावात आणि परिसरात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून वांबोरी गावातील इतर जोड रस्ते व पानंद रस्ते, शिव पानंद रस्ते चळवळ अंतर्गत नोंदवलेले असून, चार महिन्यांपूर्वीच सर्व रस्त्यांची माहिती तलाठी कार्यालयात देण्यात आली आहे. मात्र आजपर्यंत तलाठी यांच्याकडून कोणतीही प्रत्यक्ष कारवाई झालेली नसल्याने शेतकऱ्यांची नाराजी वाढत चालली आहे.
या मागणीसाठी सर्जेराव गडाख, सचिन गडाख, भास्कर पागिरे, भाऊराव गडाख, वामन गडाख, संतोष गडाख, चांगदेव गडाख, अंशाबापू गडाख, विठ्ठल गडाख यांच्यासह अनेक शेतकरी पुढे येत असून, शासनाने शिव पानंद रस्ते चळवळ योग्य पद्धतीने व प्रभावीपणे राबवावी, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे.
चौकट -
"प्रशासनाने तातडीने रस्त्यांची अधिकृत मोजणी करून अतिक्रमण हटवावे, रस्ते वाहतुकीसाठी खुले करावेत आणि ग्रामपंचायतीला विकासकामे सुरू करण्यासाठी मोकळा मार्ग द्यावा अशी मागणी वांबोरी आणि परिसरातील शेतकऱ्यांची आहे."
राहुरीचे तहसीलदार यांना निवेदन देतेवेळी सर्जेराव गडाख, सचिन गडाख, भास्कर पागिरे, भाऊराव गडाख, वामन गडाख, संतोष गडाख, चांगदेव गडाख, अंशाबापू गडाख,विठ्ठल गडाख.

