प्रसाद नगरचे जागृत दैवत श्री म्हसोबा महाराजांचा उत्सव ११ जानेवारीला; भाविकांना दर्शनाची व महाप्रसादाची पर्वणी
शिर्डी प्रतिनिधी : ( तुषार महाजन )
साईनगरी शिर्डी येथील प्रसाद नगर (शिर्डी एअरपोर्ट रोड) परिसरात असलेल्या आणि असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री म्हसोबा महाराज मंदिरात रविवारी, दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी भव्य वार्षिक उत्सव आणि महाप्रसादाचे (जेवण) आयोजन करण्यात आले आहे. भाविक भक्तांच्या श्रद्धेतून साकारलेल्या या पवित्र उत्सवासाठी प्रसाद नगर सज्ज झाले असून, परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.
श्री म्हसोबा महाराज हे प्रसाद नगर परिसरातील 'जागृत दैवत' म्हणून ओळखले जातात. भाविकांच्या हाकेला धावून येणारे दैवत अशी त्यांची ख्याती असल्याने केवळ स्थानिकच नव्हे, तर पंचक्रोशीतून अनेक भाविक येथे नतमस्तक होण्यासाठी येतात. या पवित्र उत्सवाच्या निमित्ताने रविवारी दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
असा असेल कार्यक्रम:
उत्सवाची सुरुवात रविवारी सकाळी ७ वाजता महापूजेने होणार आहे. ही महापूजा सकाळी ११ वाजेपर्यंत चालणार असून, यावेळी श्रींरायांना अभिषेक आणि विशेष साजावट केली जाणार आहे. त्यानंतर सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचे (जेवण) आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्याचे आयोजन श्री म्हसोबा महाराजांच्या कृपाशीर्वादाने आणि समस्त भाविक भक्तांच्या सहकार्यातून करण्यात आले आहे. तरी या पवित्र उत्सवाच्या निमित्ताने सर्व भाविक भक्तांनी आपल्या सहकुटुंब व सहपरिवार उपस्थित राहून महापूजा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे नम्र आवाहन उत्सव समिती आणि समस्त प्रसाद नगर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

