शून्यातून १२७८ शाखांचे विश्व निर्माण करणाऱ्या निलेश जाधव यांचा पत्रकार तुषार महाजन यांच्या हस्ते सन्मान
नगर प्रतिनिधी:
शिर्डी शहरातील सामाजिक संघटना असलेल्या साईश्रद्धा प्रतिष्ठान, शिर्डी शहर' च्या वतीने नूतन वर्षानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या आकर्षक दिनदर्शिकेचे (कॅलेंडर) वितरण उत्साहात सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून पत्रकार तुषार महाजन यांनी तरुणाईसाठी प्रेरणास्थान ठरलेले उद्योजक आणि 'ग्रॅज्युएट चहा' चे संस्थापक श्री. निलेश जाधव सर यांना दिनदर्शिकेची प्रत सप्रेम भेट दिली.
साईश्रद्धा प्रतिष्ठानने केवळ दिनदर्शिका प्रकाशित न करता त्या माध्यमातून समाजप्रबोधनाचा व जनसंपर्काचा एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. याप्रसंगी पत्रकार तुषार महाजन यांनी निलेश जाधव यांची भेट घेऊन त्यांना प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती दिली आणि नूतन वर्षाच्या शुभेच्छांसह हे कॅलेंडर सुपूर्द केले.
असा घडला ‘ग्रॅज्युएट’ उद्योजक
कॅलेंडर वितरणाच्या निमित्ताने निलेश जाधव यांचा प्रवास पुन्हा एकदा अधोरेखित झाला. आई शेतात मजुरीवर, तर वडील गवंडी कामावर... अशा अत्यंत सामान्य कुटुंबातील निलेश जाधव यांनी जिद्द आणि कष्टाच्या जोरावर उद्योजकतेचे स्वप्न पाहिले. "एक चहावाला देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, तर राहात्यातला चहावाला उद्योजक का होऊ शकत नाही?" या ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी मित्रांच्या सहकार्याने ‘ग्रॅज्युएट चहा’ची स्थापना केली. अवघ्या अडीच वर्षांत महाराष्ट्रासह ५ राज्यांमध्ये १२७८ शाखा आणि २३०० जणांना रोजगार उपलब्ध करून त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे.
परस्परांकडून कार्याचे कौतुक
कॅलेंडर स्वीकारताना निलेश जाधव यांनी साईश्रद्धा प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याचे भरभरून कौतुक केले. प्रतिष्ठानने शिर्डी शहरात नेहमीच विधायक कामे केली असून, हे कॅलेंडर देखील सर्वांसाठी उपयुक्त ठरेल, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. तसेच भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रीन फाउंडेशन उपाध्यक्ष तुषार महाजन यांनी निलेश जाधव यांच्या यशाचा उल्लेख करताना सांगितले की, "शेतमजुरी करणाऱ्या कुटुंबातील मुलाने उभे केलेले हे विश्व प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी आहे." याप्रसंगी मित्रपरिवार उपस्थित होते. शिर्डी शहरात या उपक्रमाचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे.
१२७८ शाखा आणि २३०० रोजगार!
निलेश जाधव आणि त्यांचे सहकारी विशाल गाढवे, नितीन कोळेकर, किरण माळी, प्रतिक खिलारी, गौरव लुटे, अभिषेक तेलोरे यांनी मिळून बेरोजगारीवर मात करत ‘ग्रॅज्युएट चहा’ला ब्रँड बनवले.
तरुणाईसाठी निलेश जाधव आणि त्यांचे सहकारी हे एक जिवंत उदाहरण आहेत – धैर्य, चिकाटी आणि योग्य नियोजन असेल तर काहीही अशक्य नाही!

