खर्ची–चोरटक्की व कढोली–सावदा रस्त्यांचे भूमिपूजन; आमदार अमोल पाटील यांच्या पाठपुराव्याला यश.एरंडोल | तालुक्यातील नागरिक, शेतकरी व विद्यार्थ्यांची वर्षानुवर्षांची मागणी अखेर मार्गी लागली असून खर्ची–चोरटक्की आणि कढोली–सावदा या दोन्ही महत्त्वाच्या रस्त्यांच्या विकासकामांचे भूमिपूजन आमदार मा. अमोल पाटील यांच्या शुभहस्ते पार पडले. या कामांमुळे परिसरातील दैनंदिन दळणवळण सुलभ होणार असून नागरिकांच्या दीर्घकालीन अडचणी दूर होणार आहेत.
कढोली ते सावदा रस्त्यासाठी जलनिस्सारणासह मजबुतीकरण व डांबरीकरणाकरिता २५ लाख रुपये, तर खर्ची ते चोरटक्की रस्त्यासाठी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.
या रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे प्रवास खर्चिक व वेळखाऊ ठरत होता, तसेच शेतमाल वाहतुकीस अडथळे निर्माण होत होते. मात्र आता या विकासकामांमुळे पंचक्रोशीतील गावांचा संपर्क मजबूत होणार आहे.
यावेळी दिलेल्या निवेदनात आमदार पाटील यांनी, “दळणवळण आणि सिंचनाला प्राधान्य देत मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधला जाईल,” असे नमूद केले.
भूमिपूजनप्रसंगी शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




