पंढरपूर | प्रतिनिधी
पंढरपूर शहरात लोकशाहीच्या बळाला अभिवादन करणारे दोन महत्त्वाचे सत्कार सोहळे उत्साहात पार पडले. पंढरपूर येथील नवनिर्वाचित नगरसेवक मा. धर्मराज घोडके यांच्या कार्यालयात ज्येष्ठ साहित्यिक संभाजीनगरचे टि. एस. चव्हाण सर व ज्येष्ठ पत्रकार रमेश जेठे सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जनतेच्या विश्वासातून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीचा हा सन्मान उपस्थितांमध्ये प्रेरणा निर्माण करणारा ठरला.
याच अनुषंगाने नवनिर्वाचित नगरसेवक मा. महादेव धोत्रे साहेब (बाॅस) यांच्या पंढरपूर येथील जनसंपर्क कार्यालयातही सन्मान आणि उत्साहाने भारलेला भव्य सत्कार सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यास विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उल्लेखनीय उपस्थिती लाभली.
या प्रसंगी मा. शिक्षक आमदार दत्तात्रेय सावंत साहेब, साहित्यिक संभाजीनगरचे टि. एस. चव्हाण सर, ज्येष्ठ पत्रकार रमेश जेठे सर, तसेच राजकुमार व्यवहारे, लक्ष्मी प्रसाद मोहिते, सतीश चंद्रराव, वागणे सर, प्रमोद कदम आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत महादेव धोत्रे साहेब यांचा राजर्षी शाहू महाराज गौरव ग्रंथ, शाल व हार देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित नगरसेवक महादेव धोत्रे साहेब म्हणाले,
“जनतेने दिलेला विश्वास हा माझ्यासाठी जबाबदारी आहे. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा आणि विकास सर्वांपर्यंत पोहोचावा, यासाठी मी प्रामाणिकपणे व सातत्याने काम करेन.”
उपस्थित मान्यवरांनीही धोत्रे साहेब व घोडके साहेब यांच्या सामाजिक जाणिवेचे, लोकाभिमुख कार्यशैलीचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या दोन्ही सत्कार सोहळ्यांमुळे जनसंपर्क कार्यालय परिसरात उत्साहाचे व सकारात्मकतेचे वातावरण निर्माण झाले होते.
०००

