shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कळस बु येथे गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या बलिदान दिनानिमित्त अभिवादन सभा

अकोले (प्रतिनिधी):
गुरु तेग बहादूर यांचे जीवन त्याग, बलिदान आणि मानवतेचा सर्वोच्च आदर्श आहे. त्यांनी केवळ शीख धर्मासाठीच नव्हे तर हिंदू धर्माच्या रक्षणासाठीही प्राणांचे बलिदान दिले, असे प्रतिपादन भाजपा सोशल मीडिया सेल जिल्हा संयोजक भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले.
कळस बु येथे ग्रामपंचायतीच्या वतीने गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या बलिदान दिनानिमित्त आयोजित अभिवादन सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी कळसचे उपसरपंच केतन वाकचौरे होते.

यावेळी कळस सोसायटीचे चेअरमन विनय वाकचौरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रभात चौधरी, डी. टी. वाकचौरे, मच्छिंद्र भोर, अजित वाकचौरे, आकाश वाकचौरे, अमित वाकचौरे, मुख्याध्यापक तान्हाजी वाजे, जिल्हा बँकेच्या सौ. स्नेहल वाकचौरे, सौ. वृषाली वाकचौरे आदी मान्यवर उपस्थित होते.
भाऊसाहेब वाकचौरे पुढे म्हणाले की, गुरु तेग बहादूर हे शीख धर्माचे नववे गुरु, महान आध्यात्मिक नेते आणि ‘हिंद दी चादर’ म्हणून ओळखले जाणारे महापुरुष होते. औरंगजेब यांच्या धार्मिक जुलूमाविरुद्ध त्यांनी काश्मिरी पंडितांच्या रक्षणासाठी दिल्ली येथे सर्वोच्च बलिदान दिले. ते फासावर गेले, पण धर्मांतर स्वीकारले नाही. त्यांच्या त्यागाची आठवण ठेवणे आणि त्यांच्या विचारांचा प्रसार करणे हे आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
शीख समाज हा लढवय्या समाज असून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांचे मोठे योगदान आहे. तसेच संत नामदेव महाराज यांचे अभंग गुरु ग्रंथ साहिब मध्ये समाविष्ट आहेत. तसेच लोकमान्य टिळक व लाला लजपतराय यांनी एकत्रित कार्य केले असल्याचे सांगत महाराष्ट्र आणि शीख समाजातील ऐतिहासिक नातेसंबंध अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान गुरु तेग बहादूर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच त्यांच्या जीवनावर आधारित गायन सादर करण्यात आले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक ग्रामसेवक ज्ञानेश्वर सुर्वे यांनी केले. सूत्रसंचालन पशुधन पर्यवेक्षक डॉ. रवींद्र घोडके यांनी तर आभार स्वाभिमानी सचिव संघटनेचे राज्य अध्यक्ष गणेश रेवगडे यांनी मानले.
close