shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

स्व. अजितदादा पवार क्रीडा संकुलासाठी ग्राम सुधारणा मंडळाने जागा द्यावी.!आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढूस यांची निवेदनाद्वारे मागणी.

देवळाली प्रवरा दि. २ फेब्रुवारी २६
स्व. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब यांचे नावाने देवळाली प्रवरा शहरात भव्य असे क्रीडा संकुल उभारणी करण्यासाठी देवळाली प्रवरा हद्दीतील गट नंबर २७ मधील क्षेत्र देवळाली प्रवरा नगरपरिषदेकडे वर्ग करणेची मागणी आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढूस यांनी देवळाली प्रवरा येथील ग्राम सुधारणा मंडळाकडे आज ०२ फेब्रुवारी २०२६ रोजी निवेदनाद्वारे केली आहे. ग्राम सुधारणा मंडळाकरिता माजी आ. चंद्रशेखर लक्ष्मणराव कदम, आसाराम रंगनाथ ढूस,  तसेच मुरलीधर जगन्नाथ कदम या पदाधिकाऱ्यांना सदरचे निवेदन पाठविण्यात आले असल्याची माहिती ढूस यांनी दिली आहे. 

     ढूस यांनी रजिस्टर पोस्टाने पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देवळाली प्रवरा शहराची आन.., बान..,  शान..,  असलेले महाराष्ट्र राज्याचे लाडके  उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब यांचे विमान अपघातामध्ये नुकतेच निधन झाले आहे. त्यामुळे देवळाली प्रवरा शहराचा आधारवड हरपला असून दादांच्या अशा अचानक जाण्याने केवळ देवळाली प्रवरा शहरावरच नव्हे तर संपूर्ण राज्यावर शोककळा पसरले आहे. महाराष्ट्रातील जनतेसाठी दादांनी दिलेल्या योगदानामुळे दादांची ख्याती संपूर्ण देशात पसरली आहे. त्यामुळे देवळालीच्या मातीत स्वर्गीय दादांचा जन्म झाला याचा देवळाली प्रवरा शहरवासीयांना सार्थ अभिमान आहे. 
     देवळाली प्रवरा शहराच्या मातीत जन्म घेऊन देशभर आपल्या कार्याच्या महतीने लोकनायक ठरलेल्या दादांना फक्त दोन शब्दांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून आपणास थांबता येणार नाही.  तर क्रीडा क्षेत्रात दादांची असलेली रुची व त्यांनी क्रीडा क्षेत्रात राज्यात दिलेले योगदान पाहता देवळाली प्रवरा शहरात दादांच्या स्मृती चिरकाल जिवंत राहण्यासाठी दादांच्या नावाने देवळाली प्रवरा शहरात भव्य असे क्रीडा संकुल उभारणे गरजेचे आहे. त्या क्रीडा संकुलाच्या समोर दादांचा भव्य असा पुतळा तसेच दादांचे स्मारक उभारल्यास पुढील कित्येक पिढ्यांना दादांचा आदर्श घेता येईल. 
     तालुका क्रीडा संकुलासाठी असलेला कोट्यावधींचा निधी महाराष्ट्र शासनाकडे पडून आहे.. परंतु, जागे अभावी सदरचा निधी शासनाला इच्छा असतानाही जनतेसाठी उपलब्ध करून देता येत नाही. 
     तथापि., देवळाली प्रवरा शहराचे ग्रामदैवत श्री त्रिंबक देव म्हणजेच श्री त्रिंबकराज स्वामी महाराज देवस्थानची देवळाली प्रवरा हद्दीत गट नंबर २७  मध्ये ०८.६७ हे. आर. क्षेत्र जमीन आहे. सदर जमिनीवर देवळाली प्रवरा नगर परिषदेने (पिण्याच्या पाण्याचा तलाव) टॅंक  साठी सन २०१३ साली नगरपरिषदेच्या डेव्हलपमेंट प्लॅन (मंजूर आराखडा) मध्ये आरक्षण टाकलेले आहे. मात्र, महाराष्ट्र शासनाने देवळाली प्रवरा नगरपरिषदेला थेट मुळा धरणातून बंद पाईप द्वारे १७ कोटी ६० लक्ष रुपयांची पाणी योजना दिलेली असल्याने सदर गट नंबर २७ मध्ये असलेल्या (पाण्याचा तलाव) टॅंक ची देवळाली प्रवरा शहराला आता आवश्यकता राहिलेली नाही. त्यामुळे सदरचे क्षेत्र गेले कित्येक वर्षे कोरड्या तलावाच्या रूपाने पडून आहे.
     देवळाली प्रवारा शहराचे ग्रामदैवत श्री त्रिंबक देव म्हणजेच श्री त्र्यंबकराज स्वामी महाराज देवस्थानची देवळाली प्रवरा हद्दीत असलेल्या गट नंबर २७ मधील सातबारा उताऱ्यावर कुळ, खंड, व इतर अधिकारांमध्ये पुजारी देवळाली प्रवरा ग्राम सुधारणा मंडळाचे चालक वहिवाटदार लक्ष्मण बळवंत पाटील अशी नोंद आढळून येते. 
     सबब आपणांस विनंती की, स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब यांच्या देवळाली प्रवरा शहरातील स्मृती चिरकाल जिवंत राहण्यासाठी.. त्यांच्या नावाने देवळाली प्रवरा शहरात भव्य असे क्रीडा संकुल उभारणी करण्यासाठी देवळाली प्रवरा हद्दीतील गट नंबर २७ मधील ०८.६७ हे. आर. क्षेत्र देवळाली प्रवरा नगरपरिषदेकडे वर्ग करणे कामी आपण आपल्या स्तरावरून सत्वर योग्य ती कार्यवाही करून गावात भव्य क्रीडा संकुलाच्या रूपाने दादांच्या स्मृती चिरकाल जतन करण्यासाठी सहकार्य करावे ही आपण या क्षेत्राचे वहिवाटदार आहात या नात्याने आमची आपणास नम्र विनंती आहे. 
     स्व. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या स्मृती जतन करण्यासाठी त्यांच्या नावाने गावात होणाऱ्या नियोजित भव्य क्रीडा संकुलाला आपण सदरची जागा देऊन नक्की सहकार्य कराल या अपेक्षेसह स्वर्गीय अजित दादांना भावपूर्ण आदरांजली ढूस यांनी पत्राचे शेवटी वाहिली आहे.
     ढूस यांनी या पत्राची प्रत देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे अध्यक्ष सत्यजीत पाटील कदम यांना माहितीस्तव दिली आहे.
close