जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
इंदिरा गांधींची दुर्दैवी हत्या झाली.. त्या दिवशी राजीव गांधी कलकत्ता येथे होते.त्यांना दिल्लीत आणण्यात आले.राजीव गांधी उन्मळून पडले होते.अशा स्थितीत ज्येष्ठ मंत्री प्रणव मुखर्जी यांना पंतप्रधान केले जाईल असे गृहीत होते आणि सर्व अर्थाने ते सक्षम मंत्री होते,अनुभवी होते..किमान काळजीवाहू करायला तर काहीच हरकत नव्हती..पण अंतर्गत राजकारण पुढे गेले आणि राजीव गांधी यांनी पंतप्रधान व्हावे असे ठरले..सोनिया गांधी यांनी राजीव यांना रडून हात जोडून हे पद स्वीकारू नये म्हणून आग्रह धरला पण दडपण वाढत गेले....पुढे राजीव गांधी यांनी पंतप्रधान म्हणून चांगले काम केले..(माझा राजीव यांच्याबद्दलचा सविस्तर लेख फेसबुकवर आहे . मी त्यांचा चाहता आहे त्यामुळे ही Post गांधी कुटुंबाच्या द्वेषाने लिहिली नाही ) तरी केवळ त्या कुटुंबातील आहे म्हणून थेट पद दिले गेले याचे समर्थन कसे करणार ? त्या सरकारमधील जे ज्येष्ठ मंत्री होते त्यांचाच तो अधिकार नव्हता का ? त्या कुटुंबाचा त्याग आणि सरकारमधील वारस हे पूर्णतः दोन वेगळे मुद्दे आहेत...याची गल्लत केली जाते.
अर्थात एकदा घराणेशाहीचा डोस निवडणुकीत घेण्याची सवय लागली की नेते तसेच वागतात.सोनिया गांधी यांनी सुरुवातीला पक्षापासून दूर राहून पक्षाला घराणेशाही विरहित वाढण्याची संधी दिली होती पण काँग्रेस नेते यांनी अनेकदा सोनिया यांच्याकडे चकरा मारून त्यांना पक्षाचे अध्यक्ष केलेच...तेव्हा घराण्याची सवय ही एक समस्या नेत्यांची आहे.तो यशाचा शॉर्टकट वाटतो..
काल सुनेत्राताई उपमुख्यमंत्री झाल्यावर मांडलेला घराणेशाही विरोधी मुद्दा काहींना खटकला...ताई उपमुख्यमंत्री होण्याला विरोध असण्याचे काहीच कारण नाही किंबहुना एका महिलेला पद मिळण्यात आनंद आहे, त्यांचे संयमी व्यक्तिमत्व चांगले काम करून दाखवील...
पण नेता निवडताना केवळ त्या घराण्यातील आहेत हा निकष चुकीचा आहे..त्या दिवंगत नेत्यांसोबत ज्यांनी अनेक वर्षे काम केले त्यांच्यातून नेता निवडायला हवा...सुदैवाने या पक्षात असे अनेक अनुभवी नेते होते...किमान ३० वर्षे अनुभव असलेले नेते त्या पक्षात असताना केवळ घराण्याचा आग्रह कशासाठी ? यावर चर्चा का होत नाही ?
लोकशाहीत घराणे न बघता नेत्याचा अनुभव त्या पक्षात काम केलेली वर्षे, ज्येष्ठता हेच निकष असायला हवेत...राजेशाहीत त्याच कुटुंबातील वारस निवडण्यात आणि लोकशाहीत नेता निवडण्यात काही फरक असतो की नाही ?
पण भारतीय लोक भावनिक मतदार असल्यामुळे अशा कुटुंबातील वारसांना मतदार लवकर स्वीकारतात , पक्षातील कार्यकर्त्यांचे सांत्वन होते असे अनेकाना वाटते यामुळेच त्या कुटुंबातील व्यक्तींना पक्ष पुढे करतो..अर्थात पक्षातील असलेला ज्येष्ठ नेता निवडला तर त्याच्या स्पर्धेतील इतर नेते नाराज होतात आणि पक्षात तणाव वाढतो,वाद वाढतात त्यामुळे सर्व नेते समान अंतरावर राहण्यासाठी कुटुंबातील पर्याय निवडला जातो हा ही एक मुद्दा असतो...
घराणेशाहीचे लोक नेतृत्वस्थानी आणण्यात पक्ष बळकट होत नाही हे आपण काँग्रेसमध्ये बघतो आहे.काँग्रेसमध्ये वरच्या पातळीवरील घराणेशाही खालपर्यंत गेली आहे .त्यातून पक्ष बळकट झाला नाही..आज हे सुभेदार भाजपात गेले आणि पक्षाची सूज ओसरली..घराणे पक्ष बळकट करत नाहीत..सामान्य कार्यकर्ते जोडले जात नाहीत..त्यामुळे राष्ट्रवादी काय पण सर्वच पक्षांनी घराण्यातील तात्पुरती मिळणारी शक्ती न घेता सर्वसामान्य कार्यकर्त्यातून नेतृत्व घडवायला हवे....त्यातून पक्ष दीर्घकालीन मोठे होतात अन्यथा घराणे केवळ त्यांचे हितसंबंध आणि त्यांच्या संस्था,कारखाने,शिक्षणसंस्था यांचे फायदे बघत असल्याने ते पक्ष वाढवण्यापेक्षा हितसंबंध वाढवत राहतात..आज राज्यात घराणी दूर गेल्याने काँग्रेस ज्याप्रमाणे शक्तिहीन झाली त्यावरून इतर पक्षांनी शिकायला हवे. शेवटी सामान्य कार्यकर्ता मोठा केला तरच पक्ष मोठा होतो..महाराष्ट्रात घराणे जिकडे जातील, तिकडे सत्ता येते..ही घराणी राजकीय पक्षांना ब्लॅकमेल करतात ,पाहिजे तसे पक्षांना वाकायला लावतात...त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी याचा विचार करायला हवा...या घराण्यांनी राजकारणाचा बॅलन्स घालवून टाकला आहे..
त्यामुळे घराणेशाही नाकारण्यातूनच राजकीय पक्ष आणि लोकशाही अधिक बळकट होणार आहे हे लक्षात घ्यायला हवे.
त्यामुळे हा मुद्दा राजकीय पक्ष यांच्या विरोधात नसून राजकीय पक्षाच्या दीर्घकालीन हिताचा आहे..
000

