डॉ. सुजय विखे पाटलांनी ओढला साईंचा रथ; सर्वपक्षीय नेत्यांची मांदियाळी
परिक्रमा मार्गाचे होणार २ ते ३ पदरी रुंदीकरण; पुढील वर्षी 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'चा प्रयत्न!
शिर्डी प्रतिनिधी:
पहाटेची बोचरी थंडी... आसमंतात दुमदुमणारा 'ओम साई राम' आणि 'अनंतकोटी ब्रह्मांडनायक...'चा अखंड जयघोष... फुलांनी व आकर्षक सजावटीने नटलेला साईबाबांचा भव्य रथ... आणि अनवाणी पायांनी साईचरणी लीन होण्यासाठी चालत निघालेले देश-विदेशातील लाखो भाविक! अशा अत्यंत भक्तीमय, चैतन्यदायी आणि अभूतपूर्व वातावरणात आज (शुक्रवारी) शिर्डीत १४ किलोमीटरच्या भव्य 'शिर्डी महापरिक्रमे'ला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. निमित्त होते ते सलग सातव्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या 'साई परिक्रमा महोत्सवा'चे! भक्ती आणि सेवाभावाच्या या अद्वितीय संगमात सहभागी होत लाखो भाविकांनी आपल्या अढळ श्रद्धेची प्रचिती दिली.
ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि बाबांचे 'सुरक्षा कवच'
'श्री साई सच्चरित्र' या ग्रंथात उल्लेख असल्याप्रमाणे, साईबाबा हयातीत असताना स्वतः गावाच्या सीमाभोवती परिक्रमा करत असत. या परिक्रमेला एक मोठा भावनिक आणि ऐतिहासिक संदर्भ आहे. शिर्डीत जेव्हा कॉलराची (पटकी) मोठी साथ आली होती, तेव्हा साईबाबांनी स्वतः जात्यावर गहू दळून ते पीठ गावाच्या सीमेवर टाकले होते. ती कृती केवळ एक प्रतीक नव्हती, तर गावावर आलेल्या संकटावर मात करण्यासाठी बाबांनी दिलेले ते एक आध्यात्मिक 'सुरक्षा कवच' होते. आजची ही १४ ते १५ किलोमीटरची महापरिक्रमा म्हणजे त्याच सुरक्षा कवचाची आणि साईंच्या असीम कृपेची जिवंत आठवण आहे. विशेष म्हणजे १३ फेब्रुवारी १९२२ रोजी 'श्री साईबाबा संस्थान'ची अधिकृत स्थापना झाली होती. या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून दरवर्षी या महापरिक्रमेचे आयोजन केले जाते.
पहाटेच्या महाआरतीने भक्तीच्या प्रवाहाला सुरुवात,
या भव्य परिक्रमेची सुरुवात पहाटे ४:३० ते ५:३० च्या सुमारास खंडोबा मंदिर परिसरातून झाली. महंत रामगिरी महाराज, काशीकानंद महाराज आणि श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते रथातील साईबाबांच्या प्रतिमेची महाआरती करून या सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला. शिर्डी पोलीस ठाणे, शिव रस्ता, लुटे वस्ती, बिरोबाबन, साकुरी शिव या मार्गावरून हा भक्तीचा प्रवाह वाहत होता. यंदा भाविकांचा उत्साह एवढा प्रचंड होता की, भाविकांची रांग तब्बल १० ते ११ किलोमीटरपर्यंत लांबली होती! रांगेचे एक टोक खंडोबा मंदिरात तर दुसरे टोक वीरभद्र मंदिराच्याही पुढे असल्याचे विलोभनीय चित्र पाहायला मिळाले.
डॉ. सुजय विखे पाटलांचा उत्स्फूर्त सहभाग व रथाचे सारथ्य,
या परिक्रमेचे प्रमुख आकर्षण ठरले ते युवानेते आणि माजी खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील यांचा उस्फूर्त सहभाग. एक निस्सीम साईभक्त म्हणून त्यांनी स्वतः रथाची दोरी हाती घेतली आणि सर्वसामान्य भाविकांच्या खांद्याला खांदा लावून साईंचा रथ ओढला. 'साईबाबा की जय'च्या घोषणा देत त्यांनी तरुणाईचा उत्साह वाढवला. याप्रसंगी ते म्हणाले, "साईबाबांची सेवा करण्याची संधी मिळणे हे आमचे परमभाग्य आहे. साईबाबांचे प्रेम केवळ भारतापुरते मर्यादित नसून ते जगभर पसरले आहे, याची प्रचिती या परिक्रमेतून आली.
देश-विदेशातून भाविकांची विक्रमी उपस्थिती,
यंदाच्या महोत्सवात केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर परदेशातूनही भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
विशेषतः मध्य प्रदेशातील रतलाम येथून सुमारे ५०० भाविक खास रथ आणि छत्रांसह शिर्डीत दाखल झाले होते,
राज्यासह परराज्यातील एकूण १५ ते २० रथ या परिक्रमा सोहळ्यात सहभागी झाले.
महिला, लहान मुले, तरुण, विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि संत-महंत यांची लक्षवेधी उपस्थिती होती. अनेकांनी डोक्यावर साईंचे छायाचित्र, भगवे ध्वज आणि पताका घेऊन ही परिक्रमा पूर्ण केली.
शांततेत परिक्रमा आणि 'विजया एकादशी'चे औचित्य,
गेल्या वर्षी डीजेमुळे झालेल्या त्रासाची दखल घेत, यंदा प्रशासनाने डीजेला पूर्णपणे बंदी घातली होती. त्यामुळे ढोल-ताशांचा पारंपरिक गजर, टाळ-मृदुंगाचा निनाद आणि केवळ साईबाबांच्या नामस्मरणात अत्यंत शिस्तबद्ध व शांततेत ही परिक्रमा पार पडली. आज 'विजया एकादशी' असल्याकारणाने लाखो भाविक उपवास करून अनवाणी चालत होते. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून 'ग्रीन अँड क्लीन फाउंडेशन', ग्रामस्थ आणि स्वयंसेवकांकडून परिक्रमा मार्गावर तब्बल १०० हून अधिक ठिकाणी मोफत फराळ, फळे, चहा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
२ ते ३ पदरी रस्त्याचा आराखडा आणि 'गिनीज बुक'ला गवसणी,
महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली या १४ किलोमीटरच्या परिक्रमा मार्गाच्या विकासाचा एक विशेष आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आला आहे. भविष्यात हा संपूर्ण मार्ग किमान २ ते ३ पदरी व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉ. सुजय विखे पाटील यांनी एक मोठी घोषणा केली. ते म्हणाले, "पुढील वर्षी कुंभमेळ्याचे वर्ष आहे. त्यामुळे कुंभमेळ्याची तारीख आणि परिक्रमेची तारीख एकाच वेळी आणून या ऐतिहासिक भक्तीसोहळ्याची नोंद 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये व्हावी, असा आमचा आणि शिर्डी ग्रामस्थांचा मानस आहे.
भावनिक आणि भक्तीमय वातावरणात पार पडलेल्या या साई परिक्रमे मध्ये एक लाखांहून अधिक भाविकांनी सहभाग नोंदवत साईचरणी नतमस्तक होत श्रद्धेची प्रचिती दिली. खऱ्या अर्थाने आज शिर्डीत साईबाबांचा 'सबका मालिक एक' हा महान संदेश कृतीत उतरलेला पाहायला मिळाला.
शिर्डी परिक्रमेची प्रत्यक्ष अनुभूती...
शिर्डीची साई परिक्रमा म्हणजे केवळ एक पायी प्रवास नसून, ती साक्षात साईबाबांची अनुभूती आहे! यंदाच्या 'साई परिक्रमा २०२६' मध्ये देश-विदेशातील असंख्य भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग आणि शिस्त पाहून मन भारावून गेले. भक्तीच्या या अथांग प्रवाहात मी स्वतः सहभागी होऊन १४ किलोमीटरची संपूर्ण परिक्रमा पूर्ण केली. प्रत्येक पावलावर जाणवणारी साईंची उपस्थिती हा आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण ठरला आहे.
-तुषार संजय महाजन
उपाध्यक्ष: ग्रीन फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य

