विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मांदियाळीत भव्य सत्कार; भाविकांची मोठी गर्दी
शिर्डी प्रतिनिधी: ( तुषार महाजन)
विश्ववंद्य श्री साईनाथांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिर्डी नगरीत आज एका अत्यंत मंगलमय आणि भक्तीपूर्ण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यात्माचे गाढे अभ्यासक आणि भाविकांचे मोठे श्रद्धास्थान असलेले गुरुवर्य श्री श्री १००८ महामंडलेश्वर श्री काशीकानंद जी महाराज सरस्वती यांच्या वाढदिवसानिमित्त शिर्डीत एका भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी परिसरातील भाविक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवत महाराजांचे शुभाशीर्वाद घेतले.
महाराजांच्या प्रदीर्घ, निस्वार्थ आणि तपस्वी आध्यात्मिक वाटचालीचा व त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान करण्यासाठी शिर्डी शहरातील राजकीय, सामाजिक, आणि पत्रकारिता क्षेत्रातील अनेक दिग्गज एकाच मंचावर एकत्र आले होते. अत्यंत उत्साही आणि आनंदमय वातावरणात महाराजांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन अत्यंत हृद्य सत्कार करण्यात आला.
या दिमाखदार आणि देखण्या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे विद्यमान चेअरमन विठ्ठलराव पवार, 'ग्रीन क्लीन शिर्डी' या चळवळीचे प्रणेते अजित पारख, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अनिल शेजवळ, सामाजिक कार्यकर्ते संजय त्रिभुवन सर, दत्तात्रय गोंदकर, शिर्डीचे तडफदार युवा नेते नानासाहेब शिंदे आणि ज्येष्ठ पत्रकार संजय महाजन आदी मान्यवर आवर्जून उपस्थित होते.
उपस्थित सर्वच मान्यवरांनी महामंडलेश्वर श्री काशीकानंद जी महाराज यांना निरोगी, सुखमय आणि प्रदीर्घ आयुष्यासाठी मनःपूर्वक सदिच्छा दिल्या. तसेच, महाराजांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करत आपले कृपाशीर्वाद दिले. या भक्तीमय सोहळ्याला शिर्डी शहर व पंचक्रोशीतील नागरिक, तसेच महाराजांचे अनेक अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीमुळे आणि महाराजांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. शिर्डीच्या आध्यात्मिक परंपरेत आजचा हा सत्कार सोहळा एक संस्मरणीय क्षण ठरला आहे.

