शिर्डी प्रतिनिधी : (तुषार महाजन)
विश्ववंद्य श्री साईनाथांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिर्डी नगरीत अध्यात्माचे गाढे अभ्यासक आणि भाविकांचे मोठे श्रद्धास्थान असलेले गुरुवर्य श्री श्री १००८ महामंडलेश्वर श्री काशीकानंद जी महाराज सरस्वती यांच्या वाढदिवसानिमित्त एका भव्य आणि मंगलमय सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी परिसरातील भाविक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवत महाराजांचे दर्शन आणि शुभाशीर्वाद घेतले.
महाराजांच्या प्रदीर्घ, निस्वार्थ आणि तपस्वी आध्यात्मिक वाटचालीचा व त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान करण्यासाठी या सोहळ्यात राजकीय, सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते. अत्यंत उत्साही आणि आनंदमय वातावरणात महाराजांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन अत्यंत हृद्य सत्कार करण्यात आला. या दिमाखदार सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कमलाकरजी कोते, सोसायटीचे माजी चेअरमन प्रतापराव कोते, शिर्डीचे तडफदार युवा नेते नानासाहेब शिंदे, सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब काटकर आणि ज्येष्ठ पत्रकार संजय महाजन आदी मान्यवर आवर्जून उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित सर्वच मान्यवरांनी महामंडलेश्वर श्री काशीकानंद जी महाराज यांना निरोगी, सुखमय आणि प्रदीर्घ आयुष्यासाठी मनःपूर्वक सदिच्छा दिल्या. तसेच, महाराजांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करत आपले कृपाशीर्वाद दिले. या भक्तीमय सोहळ्याला शिर्डी शहर व पंचक्रोशीतील नागरिक, तसेच महाराजांचे अनेक अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीमुळे आणि महाराजांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. हा सत्कार सोहळा शिर्डीकरांसाठी एक संस्मरणीय आध्यात्मिक क्षण ठरला आहे.

