श्रीरामपूर (प्रतिनिधी) – तालुक्यातील नायगाव येथे हिंदू मातंग समाजातील तरुण निलेश शेंडगे यांच्या संशयित हत्येप्रकरणी महिनाभर उलटूनही आरोपींना अटक न झाल्याने श्रीरामपूर शहरात शनिवारी दुपारी हजारोंच्या उपस्थितीत भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चातून आरोपींना तात्काळ अटक करावी, तसेच फिर्यादी व साक्षीदारांवर दाखल गुन्हे मागे घ्यावेत, अशी ठाम मागणी करण्यात आली.
मोर्चाची सुरुवात शहरातील भगतसिंग चौकातून झाली. छत्रपती शिवाजी महाराज रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोर्चा शिवतीर्थ येथे पोहोचला. मार्गावर घोषणाबाजी करत संतप्त नागरिकांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. महिलांची उपस्थिती विशेष लक्षणीय होती.
शिवतीर्थ येथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. शिवप्रहार प्रतिष्ठानचे प्रमुख सुरजभाई आगे, विराट प्रतिष्ठानचे प्रदीप सरोदे यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करत आरोपींना तात्काळ अटक न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. निलेश शेंडगे यांना पाण्यात बुडवून हत्या केल्याचा आरोप करत कथित वाळू तस्कर व त्यांच्या साथीदारांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. तसेच या प्रकरणात आरोपींना पाठीशी घालणाऱ्या एका सरकारी कर्मचाऱ्यालाही आरोपी करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
सभेत मयत निलेश शेंडगे यांच्या मुलीने भावनिक शब्दांत न्यायाची याचना केली. “माझ्या वडिलांना न्याय मिळालाच पाहिजे,” असे म्हणताना ती भावुक झाली. तिच्या आक्रोशाने उपस्थित महिलांसह अनेकांच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले.
सभेनंतर हजारो मोर्चेकरांनी पोलीस उपविभागीय अधिकारी जयदत्त भवर यांना निवेदन सादर केले. यावेळी पोलीस निरीक्षक नितीन देशमुख उपस्थित होते. प्रशासनाने लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिला.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडक बंदोबस्त ठेवला होता. आरोपींवर नेमकी कोणती कारवाई होते, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

