shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना अनाहुत सल्ला!ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, उल्हासनगर यांचे मनोगत !!


जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

 भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे शिवसेनेतून गद्दारी करून बाहेर पडलेल्या धनंजय बोडारे यांच्या विषयी सहानुभूती का बाळगून आहेत? असा गंभीर प्रश्न माझ्यासमोर निर्माण झाला आहे. या धनंजय बोडारेला ज्या शिवसेनेने गेल्या 30 वर्षात सर्व प्रकारची पदं,सत्ता, संपत्ती व वैभव दिले, त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा ऐनवेळी अवसानघात करून भाजपची कास धरली. त्याचं एकमेव कारण म्हणजे समाजसेविका एडवोकेट सरिता खानचंदाणी यांच्या आत्महत्या प्रकरणात धनंजय बोराडे यांच्या गळ्याभोवती अटकेचा फास आवळला जात असल्याने  त्यापासून सुटका होण्यासाठी.  अवघ्या काही दिवसापूर्वी धनंजय बोराडे यांनी "शिवसेनेला आपल्या माय बापाची उपमा दिली" त्याच बोडारेने  भाजपाला कवटाळले. अशा या कोणत्याही प्रकारची निष्ठा, त्याग, स्वाभिमान व जनलज्जा नसलेल्या बोडारे यांना भाजपच्या वतीने पाच जागी उमेदवारी देऊन रवींद्र चव्हाण यांच्या भाजपने फार मोठी चूक केली होती.  या चुकीचे परिणाम भाजपाला भोगावे लागले. कारण उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीत भाजपाला ज्या बोडारेंच्या पाच जागी अपयश आले,  त्यामुळे त्यांना सत्ता संपादनासाठी आवश्यक असलेला "मॅजिक फिगर" गाठता आला नाही.  निवडणुकीत धनंजय बोराडे सह त्यांचे पाच उमेदवार पराभूत झाले. या पराभवानंतर  धनंजय बोराडे हे भाजपच्या कोट्यातून स्विकृत  नगरसेवक पदासाठी आग्रही आहेत. मुळात  पराभूत उमेदवाराला स्विकृत नगरसेवकाची उमेदवारी देणे हे अनैतिक आहे. तसेच ज्या मतदारांनी ज्यांच्या विरुद्ध कौल दिला, त्या मतदारांचा अपमान  करण्यासारखे आहे. धनंजय बोराडे यांना स्विकृत  नगरसेवक पद देऊन पक्षाच्या दावणीला बांधून ठेवण्याचे जर रवींद्र चव्हाण साहेबांच्या मनात असेल तर त्यांनी लक्षात ठेवावे, हे जशी शिवसेनेशी गद्दारी व घातकीपणा करू शकतात, तसा ते भाजपाच्या बाबतीतही करू शकतात. उद्या जर एखादी पोटनिवडणूक लागली तर ते दुसऱ्या एखाद्या पक्षात जाऊन निवडणूक लढवू शकतात. कारण धनंजय बोडारे हे पदाशिवाय राजकारणात जगू शकत नाहीत, हे त्रिवार सत्य आहे. 

यापूर्वी भाजपचे उमेदवार गणपतशेठ गायकवाड यांच्याविरुद्ध दोन वेळा व सौ सुलभाताई गायकवाड यांच्याविरुद्ध एक वेळा अशी एकूण तीन वेळा निवडणूक लढवली आहे, याचा रवींद्र चव्हाण यांनी विसर पडू देऊ नये.  आगामी विधानसभा निवडणुकीत जर त्यांना भाजपाने उमेदवारी नाकारली तर ते कल्याण विधानसभा मतदारसंघातून भाजपा विरुद्ध बंडखोरी करून निवडणूक लढवू शकतात. (2019 साली त्यांनी शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारा विरुद्ध अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती.) त्यांची विचारसरणी ही कायम भाजपा विरोधी राहिलेली आहे. त्यामुळे ते भाजपाशी जुळवून घेऊ शकणार नाहीत. सध्या त्यांना स्विकृत नगरसेवक व्हायचे आहे, त्यामागे दोन कारण आहेत. पहिले कारण स्वतःचे राजकीय अस्तित्व कागदोपत्री टिकवणे व त्या आधारे सरिता खानचंदाणी प्रकरणात दिलासा मिळवणे हे आहे. दुसरे कारण सर्वांना ज्ञात आहे. ज्या कारणामुळे त्यांचे थोरले बंधू चंद्रकांत बोडारे हे शिंदे शिवसेना गटात सामील झाले.

या सर्व बाबींचा सारासार विचार करून भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण यांनी आपली प्रतिष्ठा धनंजय बोडारे यांच्यासाठी वाया घालवू नये. त्याऐवजी भाजपाच्या एखाद्या ज्येष्ठ निष्ठावंत व अनुभवी,ज्याचा भाजपाच्या आगामी राजकीय वाटचालीत उपयोग होऊ शकेल, अशा कार्यकर्त्याला स्विकृत नगरसेवक केले तर ते भाजपाच्या राजकीय दृष्टीने लाभदायक ठरेल.

रवींद्र चव्हाण साहेब, आपण जरी धनंजय बोराडे यांना अट्टाहासाने स्विकृत नगरसेवक पद बहाल केले तरी, समाजसेविका सरिता खानचंदाणीचा तडफडणारा आत्मा त्यांचा पिच्छा सोडणार नाही. आज ना उद्या सर्व कायदेशीर पर्याय संपल्यावर धनंजय बोडारे यांना पोलिसांना शरण जाण्याशिवाय गत्यंतर उरणार नाही. त्यावेळी भाजपची जी नाचक्की होईल, त्याला सर्वस्वी चव्हाण साहेब आपणच जबाबदार असाल. त्याशिवाय शासकीय शौचालयावर अतिक्रमण करून बांधलेले स्वतःचे कार्यालय, जलकुंभावर  केलेले अतिक्रमण, स्वतःच्या मुलाच्या कंपनीच्या नावे  बांधलेली अनधिकृत इमारत, ज्याला रेराची देखील मान्यता नाही. अशा अनेक कारणामुळे धनंजय बोडारे यांचे भाजपने बहाल केलेले स्विकृत नगरसेवक पद कापरा सारखे जळून जाईल. त्यावेळी आपल्या चव्हाण या आडनावातील च निघून जाईल.

इतके सारे अनर्थ "आ" वासून उभे असताना कोणताही राजकीय परिपक्व असलेला नेता अशा उपऱ्या व्यक्तीला स्वतःच्या पक्षाचे स्विकृत  नगरसेवक पद देण्याची घोडचूक करणार नाही.आणि आपण जर ती घोडचूक केली तर त्याचे सर्व दुष्परिणाम आपल्या पक्षाला भोगावे लागती व त्याची  सर्व जबाबदारी महाराष्ट्र प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष या नात्याने आपली राहील.

 वास्तविक माझे भाजपशी काही देणे घेणे नाही किंबहुना मी भाजप विरोधक अशा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा ज्येष्ठ शिवसैनिक आहे. तरी देखील  आपल्या पक्षाची मानहानी होऊ नये,या शुद्ध हेतूने मी आपणास हा अनाहुत सल्ला देत आहे. त्याचा आपण किती गांभीर्याने विचार कराल,त्यावरच  भाजपचे पुढचे भवितव्य अवलंबून असेल. 

आपले राजकीय मतभेद असले तरी वैचारिक मतभेद नसावेत, असे वाटणारा मी एक कार्यकर्ता असल्यामुळे आपल्या आणि बोडारेंच्या संदर्भात हे मत व्यक्त केले आहे. हा आपला पक्षांतर्गत व आपल्या अधिकारातील निर्णय असला तरी आपणास सावध करणे, ही मी माझी नैतिक जबाबदारी समजून हा अनाहुत सल्ला देत आहे.
धन्यवाद!
close