shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रभादेवीचा सिद्धिविनायक ! पूर्वींचा आणि आजचा !!ज्येष्ठ पत्रकार मकरंद करंदिकर यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

माणूस जसजशी ऐहिक आणि वैज्ञानिक प्रगती करतोय तसतशी त्याची धार्मिक गरज तीव्र होत चालली आहे असे दिसते. पूर्वी  कधी कल्पनाही केली नसेल अशा सुखसोयी आज प्रत्यक्षात हात जोडून समोर उभ्या आहेत. पण त्याच बरोबर नीतीमूल्ये, समाज, गरजा खूप वेगाने बदलत आहेत. जीवघेण्या स्पर्धा आणि अनिश्चितता वेगाने वाढत चालल्या आहेत. माणसाला सर्व काही जास्तीत जास्त हवे आहे पण कमी वेळेत आणि कमीत कमी श्रमात हवे आहे. यासाठी देवाला मध्ये घालून पाहिले जाते. देवाकडे काहीतरी मागणाऱ्यांची गर्दी समजू शकतो पण देवाला लाच देऊ करावी अशा तऱ्हेने प्रचंड सोने नाणे, दागिने, पैसे दिले जातात हे पाहून भक्तीचा हेतू आणि लक्ष्य बदलल्याचे लक्षात येते. त्यामुळे देव, देवळे, भक्तिमार्ग, कर्मकांड यांचे स्वरूपही खूप बदलले. देशातील बहुतेक सर्वच मोठ्या मंदिरांच्या कारभारात आमूलाग्र बदल झाले. 
प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाचे मंदिर गेली सुमारे ६० / ६५ वर्षे पाहतो आहे.पूर्वी हा मंदिर परिसर म्हणजे एक छोटा घुमट आणि देव्हाऱ्यात सिद्धिविनायकाची सुंदर मूर्ती, चारही बाजूंनी कौले, पुढे एक पत्र्याची शेड, दीपमाळा आणि मारुतीचे एक छोटेसे मंदिर ! पूर्वी या परिसरामध्ये आगरी समाजातील एका कुटुंबाच्या मालकीच्या अनेक वाड्या होत्या. त्यांना मूलबाळ नसल्याने त्यांनी गणपतीला नवस केला. आम्हाला मूल झाले तर तुझे मंदिर बांधू ! पण मूल होण्याआधी पती निवर्तला. त्या सच्छील बाईने, 'आपल्याला मूल  झाले नाही तरी तो इतरांच्या नवसाला पावावा ' असा विचार करून हे देऊळ बांधले. या देवळाजवळ एक तळे होते. शेजारी नर्दुल्ला तलाव होता. सुरतेहून आलेले रामकृष्ण जांभेकर महाराज हे अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या दृष्टान्तानंतर येथील एका विठ्ठल मंदिरात मुक्कामाला होते. अलिबागजवळील धोकवडे येथील  गोविंद चिंतामणी फाटक हे गृहस्थ मिलमध्ये नोकरी आणि उरलेल्या वेळेत या मंदिरात सेवा करीत असत. जांभेकर महाराजांनी फाटक यांना जवळच्याच  तेव्हा ओसाड अवस्थेत असलेल्या या मंदिराची स्वच्छता व पूजाअर्चा करण्याची आज्ञा केली. नंतर फाटक हे नोकरी सोडून मंदिरसेवा करू लागले. माझ्या वैयक्तिक आयुष्यात कुठल्याही महत्वाच्या परीक्षेच्या आधी मी अनेकदा सिद्धिविनायक आणि या फाटक गुरुजींचा आशीर्वाद घेऊन येत असे. तेव्हा मंदिरात फारशी गर्दी नसे. फाटक गुरुजी शेजारच्या छोट्या खोलीत भिंतीला टेकून उकिडवे बसलेले असायचे. देवापुढची घंटा वाजली की ते गाभाऱ्यात येत असत. देवालासुद्धा फार मोठा नवस बोलावा लागत नसे. महागड्या वस्तू कबूल कराव्या लागत नसत. सिद्धिविनायक मात्र भरभरून देतो याची प्रचिती आणि त्यामुळे प्रसिद्धी वाढू लागली. 
प्रत्येकाला येणारा अनुभव कर्णोपकर्णी पसरत होता. भक्तांच्या रांगा वाढू लागल्या. रांगेतील भक्तांना त्रास होऊ नये यासाठी कै. यशवंतराव चव्हाण हे या देवळात उशिरा येऊन दर्शन घेत असत. अमिताभ बच्चनला झालेल्या गंभीर अपघातानंतर  त्याचा जीव वाचण्यासाठी अगदी गुजरातमधील भक्तांनीही, या सिद्धिविनायकाला नवस केले होते. नंतर नटनट्या, कलावंत, राजकारणी यांचा राबता सुरु झाला. देवाला हार, फुले, दुर्वा. नारळ, मोदक, पेढे यांच्यापेक्षा सोन्याचे दागिने - मोदक - नारळ,  चांदीची उपकरणे, विदेशी चलन, हिरेजडित मोबाईल, बंद झालेल्या नोटा इ. मोठ्या प्रमाणात येऊ लागल्या. दर्शनाला आलेल्या सेलिब्रिटींचे फोटो आणि व्हिडीओ झळकू लागले. या देवस्थान महात्म्यावर चित्रपट निघाला. येथील आरतीच्या  कॅसेट्स, व्हिडीओ कॅसेट्स, पोथ्या, पुस्तके, फोटो विक्री सुरु झाली. 

सिद्धिविनायकाची मूळ मूर्ती अत्यंत सुंदर, तेजस्वी आणि शास्त्रोक्त आहे. पण आता मूळ मूर्तीचे दर्शनच दुर्लभ झाले आहे. मूर्तीचा बहुतांश भाग हा सोन्याने झाकला जातो. गणेशाच्या हातातील कमळ हे चौरीसारखे दिसते. मढलेल्या सोन्याखालील  रिद्धी व सिद्धीच्या हातातील चौऱ्या दिसतच नाहीत. हातातील परशु रंगविण्याच्या नादात तो पंखा वाटू लागतो. देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा लिलाव होतो. या देवस्थानाच्या ट्रस्टवर होणाऱ्या नेमणुकांमध्ये राजकारण्यांना अधिक रस वाटू लागला आहे. देवळाला अतिरेक्यांकडून आलेल्या धमक्या, इथली गर्दी,  देवळातील बहुमोल सोने नाणे यामुळे सशस्त्र पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही, पोलीस ठाणे अनिवार्य ठरले आहे. मुहूर्त पूजेसाठी येणारी नवीन वाहने, नवस फेडण्यासाठी आणलेली लहान मुले, दिव्यांग व्यक्तींची सोय, सशुल्क दर्शन, कडक बंदोबस्त, एक्सरे स्कॅनिंग, व्यक्तिगणिक तपासणी असे अनेक पदर या देवळाभोवती तयार झाले आहेत. संकष्टी व विनायकी चतुर्थी, मंगळवार, अंगारकी अशा दिवशी अनेकदा प्रचंड गर्दी होते.

५० / ५५ वर्षांपूर्वी अशाच एका दिवशी भक्तांची रांग ही पोर्तुगीज चर्चपर्यंत आली होती. त्याचे आश्चर्य वृत्तपत्रातून व्यक्त झाले होते.  

 असे वाटते की पूर्वीच्या छोट्याशा टुमदार देवळातील सात्विक भक्ती संपली आणि आता झगमगाट, भपका, श्रीमंती, दिखाऊपणा वाढत चालला आहे का ? देवाच्या दर्शनाऐवजी प्रदर्शन सुरु झाल्यासारखे वाटते. प्रसिद्धीची जागा मार्केटींगने घेतली आहे. तरीही या देवस्थानाने आपली सामाजिक बांधिलकी टिकवून ठेवली आहे. शिक्षणसंथा, रुग्ण आणि रुग्णालये, गरजू भक्त, सामाजिक उपक्रम इत्यादींना नियमितपणे भरघोस मदत केली जाते. नैसर्गिक आपत्ती, कोरोना रोगाची साथ अशा संकटांच्यावेळी सिद्धिविनायक उदारहस्ते मदत देतो. 

शेवटी एका महत्वाच्या गोष्टीचा विचार करण्यासारखा आहे. आता माणूस हा अत्यंत व्यवहारी, व्यापारी वृत्तीचा झाला आहे. आपला फायदा होण्यासारखा नसेल तेथे माणसे १ / २ शब्दही अधिक बोलायला थांबत नाहीत. अशी माणसे देवाला इतके दान उगाचच कशासाठी देत असतील ? त्याच्या बदल्यात त्यांना घसघशीत असे कांहीतरी नक्कीच मिळत असले पाहिजे. देव भावाचा भुकेला असे कितीही म्हटले तरी माणसांची देवालासुद्धा लाच द्यायची सवय वाढते आहे का ? 
      
माणसाची ऐहिक आणि वैज्ञानिक प्रगती होते आहे तसतशी त्याची अस्थिरतेची, असुरक्षिततेची, अनिश्चिततेची भावना खूप वाढते आहे. म्हणूनच त्याची धार्मिक गरज तीव्र होत चालली असावी !

( कांही संदर्भ -- जयहिंद प्रकाशनाच्या ग.का. रायकर यांनी ६० वर्षांपूर्वी प्रसिद्ध केलेल्या पुस्तिकेतून साभार )

 छायाचित्रे -- गुगलच्या सौजन्याने
close