टी-२० विश्वचषकाच्या सुपर एट सामन्यात गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर इंग्लंडने यजमान श्रीलंकेचा ५१ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने २० षटकांत नऊ गडी बाद १४६ धावा केल्या. प्रत्युत्तरात संपूर्ण श्रीलंकेचा संघ १६.४ षटकांत ९५ धावांवर सर्वबाद झाला. अशाप्रकारे इंग्लंडने श्रीलंकेविरुद्ध सलग १२ वा टी-२० विजय नोंदवला. या सामन्यात श्रीलंकेची फलंदाजी इतकी खराब होती की, पाच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले नाहीत, तर दोन फलंदाज खाते न उघडताच बाद झाले.
श्रीलंकेकडून शनाकाने सर्वाधिक धावा केल्या
श्रीलंकेकडून कर्णधार दासुन शनाकाने सर्वाधिक ३० धावा केल्या. कामिंदू मेंडिस १३, दुनिथ वेलागे १० आणि महेश तिक्षणाने १० धावा केल्या. इंग्लंडकडून विल जॅक्सने तीन, तर जोफ्रा आर्चर, लियाम डॉसन आणि आदिल रशीदने प्रत्येकी दोन बळी घेतले, तर जेमी ओव्हरटनला एक बळी मिळाला.
आर्चर आणि जॅक्सने पाउल फिरवले
आर्चर आणि ऑफस्पिनर जॅक्सने सामना पूर्णपणे पालटला. या जोडीने पॉवरप्लेमध्ये घातक मारा करताना सहाव्या षटकापर्यंत श्रीलंकेची पाच बाद ३४ अशी अवस्था केली. यातून श्रीलंकेचा संघ शेवटपर्यंत सावरूच शकला नाही आणि त्यांचा डाव शंभरीच्या आतच आटोपला.
सॉल्टच्यामुळे इंग्लंडच्या डावाची लज्जत वाढली
सॉल्टचा खेळ, ज्यामध्ये सहा चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता, तो सामन्यात निर्णायक ठरला. या सामन्यात इंग्लंडची देखील फलंदाजी खराब झाली. त्यांनीही नियमित अंतराने गडी गमावले. इंग्लंडकडून सॉल्टने ४० चेंडूत ६२ धावा केल्या, त्यामुळेच त्यांना सन्मानजनक धावसंख्या गाठता आली. स्पर्धेत पहिल्यांदाच पॉवरप्ले ओलांडणाऱ्या सॉल्टने काही आकर्षक शॉट्स खेळले. त्याने वेलाजच्या गोलंदाजीवर एक्स्ट्रा कव्हरवर षटकार मारला आणि चामीराविरुद्ध फाइन लेगवर मोठा फटकाही खेळला. सॉल्टने ३६ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. वेलाजने परत येऊन त्याच्या दुसऱ्या स्पेलमध्ये सॉल्टला बाद केले, त्यानंतर इंग्लंडचा डाव कोसळू लागला.
सॉल्टच ठरला इंग्लंडचा तारणहार
इंग्लंडच्या डावाबद्दल बोलायचे झाले तर, सॉल्टशिवाय इतर कोणताही फलंदाज लक्षणीय खेळी करू शकला नाही. इंग्लंडकडून विल जॅक्स २१, हॅरी ब्रुक १४, सॅम करन ११, जोस बटलर ७, टॉम बेंटन ६, लियाम डेव्हिसन ६ आणि जेकब बेथेल ३ धावा केल्या, तर जेमी ओव्हरटन १० धावांवर नाबाद राहिला. श्रीलंकेकडून दुनिथ वेलाजने तीन, तर दिलशान मदुशंका आणि महेश तिक्षणाने प्रत्येकी दोन बळी घेतले. दुष्मंथा चामीरा यांनी एक बळी घेतला.
रविवारी दिवसातील दुसऱ्या सामन्यात टी-२० विश्वचषकातील गतविजेत्या भारताला पहिला पराभव पत्करावा लागला. दक्षिण आफ्रिकेने सुपर एट टप्प्यात भारताची विजयी मालिका थांबवली, त्यामुळे उपांत्य फेरीत पोहोचण्याचा त्यांचा मार्ग कठीण झाला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने २० षटकांत सात बाद १८७ धावा केल्या. प्रत्युत्तरा दाखल भारताची फलंदाजी खराब होती आणि संघ १८.५ षटकांत १११ धावांवरच आटोपला. अशाप्रकारे, दक्षिण आफ्रिकेने हा सामना ७६ धावांनी जिंकला.
कोणा एका खेळाडूवर अवलंबून राहणे भारताला महागात पडले आहे. प्रत्येकी एका फलंदाजाच्या भरवशावर भारताने गट टप्प्यात जवळजवळ प्रत्येक सामना जिंकला आहे. ही कमकुवत कडी असल्याचे अनेकदा सिद्ध झालेही. परंतु सुपर एटच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाची फलंदाजी उघडी पडली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताची फलंदाजी इतकी खराब होती की, शिवम दुबे वगळता कोणताही फलंदाज लक्षणीय खेळी करू शकला नाही.
टी-२० विश्वचषकात धावांच्या बाबतीत सर्वात मोठा पराभव
सन २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक अंतिम सामन्यानंतर भारताने आयसीसी स्पर्धेत आपला पहिलाच सामना गमावला आहे. आयसीसी स्पर्धेत भारताचा कोणत्याही स्वरूपात १८ सामन्यांमधील हा पहिलाच पराभव आहे. सन २०२४ च्या टी-२० विश्वचषकानंतर भारताने या स्पर्धेत सलग १२ सामने जिंकले होते, परंतु आता ती मालिका खंडित झाली आहे. शिवाय, टी-२० विश्वचषकात धावांच्या बाबतीत हा भारताचा सर्वात मोठा पराभव आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात धावांच्या बाबतीत हा भारताचा दुसरा सर्वात मोठा पराभव आहे. यापूर्वी सन २०१९ मध्ये न्यूझीलंडने भारताचा ८० धावांनी पराभव केला होता.
भारताच्या पराभवाची कारणे
या सामन्यात भारताच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण त्यांची खराब फलंदाजी होती. लक्ष्याचा पाठलाग करताना सलामी जोडीला चांगली सुरुवात देण्यात अपयश आले, ज्यामुळे दबाव वाढला. पॉवरप्लेमध्ये भारताने तीन गडी गमावले, ज्यामुळे संघाला पुनरागमन करणे कठीण झाले. या स्पर्धेत भारताचा मधला क्रम संघर्ष करत आहे आणि या सामन्यातही हे स्पष्ट झाले. भारताला एका खेळाडूवर अवलंबून राहणे देखील महागडे ठरले आहे.
चार फलंदाज आपले खाते उघडू शकले नाहीत. या सामन्यात भारताची फलंदाजी इतकी खराब होती की चार फलंदाज आपले खाते उघडू शकले नाहीत. ईशान किशन, रिंकू सिंग, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह आपले खाते उघडू शकले नाहीत. तिलक वर्मा (१) आणि अर्शदीप सिंग (१) हे दुहेरी आकडा गाठू शकले नाहीत. भारताकडून शिवम दुबेने ३७ चेंडूत सर्वाधिक ४२ धावा केल्या, ज्यात एक चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. कर्णधार सूर्यकुमार यादव (१८), हार्दिक पंड्या (१८) आणि वॉशिंग्टन सुंदर (११) हेच दुहेरी आकडा गाठू शकले. मात्र मोठा डाव खेळण्यात एकालाही यश आले नाही. दक्षिण आफ्रिकेकडून मार्को जेनसनने चार, तर केशव महाराजने तीन, कॉर्बिन बॉशने दोन आणि एडेन मार्करामने एक बळी मिळविला.
ब्रेव्हिस-मिलर जोडीने खेळाला कलाटणी दिली
तत्पूर्वी, मार्करमने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला, परंतु त्यांनी फक्त २० धावांत तीन फलंदाज गमावले. दुसऱ्या षटकात सलामीवीर क्विंटन डी कॉक (०६) ला बुमराहने बाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले, तर अर्शदीप सिंगने पुढच्या षटकात मार्कराम (०४) ला मिड-ऑफवर हार्दिकद्वारे झेलबाद केले. रियन रिकल्टन (०७) ने अर्शदीपच्या चेंडूवर षटकार मारला, परंतु पुढच्या षटकात मिड-ऑफवर शिवम दुबेने त्याला झेलबाद केले. त्यानंतर मिलर आणि ब्रेव्हिसने डाव सावरला. दोन्ही फलंदाज सुरुवातीपासूनच चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होते आणि चौथ्या विकेटसाठी ९७ धावा जोडल्या.
दक्षिण आफ्रिकेचे शतक १२ व्या षटकात पूर्ण झाले. पुढच्या षटकात ब्रेव्हिसने दुबेच्या चेंडूवर तिसरा षटकार मारला, परंतु पुढचा चेंडू हवेत मारल्यानंतर डीप मिडविकेटवर अभिषेकने त्याला झेलबाद केले. ब्रेव्हिसने २९ चेंडूत ४५ धावा केल्या, ज्यात तीन चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. दुबेच्या त्याच षटकात षटकार मारून मिलरने २६ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. स्टब्सनेही वरुणच्या चेंडूवर षटकार मारला, परंतु मिलरला लाँग ऑफवर तिलक वर्माने झेल दिला. मिलर ३५ चेंडूत सात चौकार आणि तीन षटकारांसह ६३ धावा काढून बाद झाला. तथापि, शेवटच्या षटकात स्टब्सने हार्दिकच्या चेंडूवर एक चौकार आणि दोन षटकार मारून संघाचा धावसंख्या १९० च्या जवळ नेली. भारताकडून बुमराहने तीन, तर अर्शदीपने दोन आणि वरुण चक्रवर्ती आणि शिवम दुबेने प्रत्येकी एक बळी घेतला.
भारताची फलंदाजी पराभवाला मुख्यतः कारणीभूत असली तरी द. आफ्रिकेच्या फलंदाजी दरम्यान पॉवर प्लेनंतर भारताचे सर्वच गोलंदाज बोथट ठरले. क्षेत्ररक्षणातही ढिसाळपणा होता. शिवाय आफ्रिकेचे त्यांच्या पहिल्या पॉवर प्लेनंतर नशिब उजळले. फलंदाजांनी त्यांची भूमिका योग्यरित्या बजावली. गोलंदाजी अचूक व धारदार होती, क्षेत्ररक्षणात चपळता होती. भारतीय फलंदाजांना मैदानी फटक्यांवर चौकार सहजासहजी मिळू दिले नाहीत.
या स्पर्धेत भारताच्या सलामीवीरांपैकी किमान एकाला शुन्यावर बाद होण्याचा शाप मिळाला की काय ? असे वाटत आहे. अभिषेक शर्मा तीनदा तर ईशान किशन एक वेळा शुन्यावर बाद झाला आहे. नामिबीयाविरूध्द संजू सॅमसन संघात होता, मात्र त्याने ८ चेंडूत वादळी २२ धावा केल्या होत्या. या स्पर्धेत अभिषेक फॉर्मात नाही. शिवाय आजारपण व मानसिक स्थिती यांची साथ मिळत नसल्याने करो किंवा मरोच्या स्थितीत असलेल्या भारताला पुढच्या सामन्यात आत्मविश्वास गमावलेल्याअभिषेकला खेळवून जमणार नाही. त्याऐवजी संजूला संधी देणे योग्य ठरेल. तसेच गौतम गंभीरला स्वतःची इज्जत वाचवायची असेल तर संघाकडून सर्वोत्तम कामगिरी करवून घ्यावीच लागेल. तरच छुपी ताकद असलेल्या झिंबाब्वे व विंडीजचे आक्रमण परतवता येईल अन्यथा गतविजेत्यांचा प्रवास सुपर एटमध्ये संपेल.
@डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक
मो. क्रं - ९०९६३७२०८२.

