श्री साईबाबा संस्थानच्या संघाला 'शिस्तबद्ध संघ' पुरस्कार; मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (IAS) यांच्या हस्ते खेळाडूंचा भव्य सत्कार
शिर्डी प्रतिनिधी: ( तुषार महाजन )
कोल्हापूर येथे नुकत्याच अत्यंत दिमाखात पार पडलेल्या 'राज्यस्तरीय मंदिर लीग क्रिकेट स्पर्धेत' श्री साईबाबा संस्थान, शिर्डीच्या क्रिकेट संघाने उत्कृष्ट खेळासह मैदानावर आदर्श शिस्त दाखवून सर्वांची मने जिंकली आहेत. या राज्यस्तरीय स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत श्री साईबाबा संस्थानच्या संघाला मानाचा समजला जाणारा 'शिस्तबद्ध संघ' (Disciplined Team Award) हा विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
राज्यभरातील विविध मंदिरांच्या संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यांमध्ये शिर्डी संस्थानच्या संघाने केवळ उत्तम खेळाचेच प्रदर्शन केले नाही, तर मैदानावर आणि मैदानाबाहेरही खिलाडूवृत्ती आणि शिस्तीचे काटेकोर पालन केले. त्यांच्या या आदर्श वर्तनाची दखल घेत आयोजकांनी त्यांना 'शिस्तबद्ध संघ' म्हणून घोषित केले. या सन्मानाप्रित्यर्थ संघाला ५,५५५/- रुपये रोख रक्कम आणि आकर्षक स्मृतिचिन्ह देऊन कोल्हापूर येथे सन्मानपूर्वक गौरवण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून पाठीवर कौतुकाची थाप
हा अभिमानास्पद पुरस्कार आणि सन्मान मिळवून संघ शिर्डीत परतल्यानंतर, श्री साईबाबा संस्थान ट्रस्टच्या वतीने संपूर्ण क्रिकेट संघाचा विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आदरणीय श्री. गोरक्ष गाडीलकर (IAS) यांच्या शुभहस्ते विजयी संघातील सर्व खेळाडूंचा आणि व्यवस्थापकांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी खेळाडूंशी संवाद साधताना श्री. गोरक्ष गाडीलकर साहेब म्हणाले की, "क्रीडा क्षेत्रात यश-अपयश येतच असते, मात्र मैदानावर तुम्ही जी शिस्त, संघभावना आणि खिलाडूवृत्ती दाखवली, ती खऱ्या अर्थाने श्री साईबाबांच्या शिकवणीला आणि संस्थानच्या लौकिकाला साजेशी आहे." त्यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करत भविष्यातील क्रीडा स्पर्धांसाठी त्यांना प्रोत्साहन आणि भरघोस शुभेच्छा दिल्या.
संघाने मिळवलेल्या या विशेष यशामुळे श्री साईबाबा संस्थानचे अधिकारी, कर्मचारी, विश्वस्त मंडळ आणि शिर्डी ग्रामस्थांमधून खेळाडूंवर अभिनंदनाचा मोठा वर्षाव होत आहे.साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार यांनी अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.

