shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

टीम इंडियाने पुन्हा एकदा पाकच्या शिडातली हवा काढली


भारत व श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमानाने सुरू असलेल्या टी२० विश्वचषक २०२६ च्या एका बहुचर्चित सामन्यात पारंपारीक प्रतिस्पर्धी व कट्टर दुश्मन भारत व पाकिस्तान यांच्यातील अ-गट साखळीतील महत्वपूर्ण सामना कोलंबो मध्ये विना अडथळा निर्विघ्न पार पडला. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच या सामन्यावर अनिश्चिततेचं सावट होतं. मात्र सर्व राजकीय सोपस्कार पार पडल्यानंतर सामन्याला हिरवा कंदिल मिळाला खरा पण प्रत्यक्ष सामन्यात झुंजार टीम इंडियाने पाकिस्तानला त्यांचा हिरवा झेंडा फडकविण्याची कुठलीच संधी न देता पाकविरूध्दचा आजवरचा सर्वात मोठा एकतर्फी विजय मिळवत सुपर आठ गटात पहिल्या क्रमांकाने पात्रता मिळविली.

रविवारी कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर भारताविरुद्ध पाकिस्तानची फलंदाजी  पूर्णतः अपयशी ठरली. विजयासाठीच्या १७६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ १८ षटकांत ११४ धावांतच कोसळला. त्यामुळे त्यांना ६१ धावांनी पराभव पत्करावा लागला. धावफलक व सामन्याचा निकाल पाहता, हे स्पष्ट होते की हा केवळ पराभव नव्हता तर संपूर्ण पाक संघ दबावाखाली कोलमडला होता. 

पाकच्या हातून पॉवरप्लेमध्येच सामना निसटला.


पाकिस्तानच्या पराभवाचा पाया पहिल्या सहा षटकांत रचला गेला. पॉवरप्लेमध्ये संघाने चार  महत्वाचे गडी गमावले, टी-२० विश्वचषकात पाकिस्तानने पहिल्या सहा षटकांत चार विकेट गमावल्याची ही दुसरी वेळ आहे. पहिल्या तीन फलंदाजांनी फक्त १० धावा केल्या, हि टी-२० विश्वचषकात आणि भारताविरुद्धची त्यांची सर्वात कमी धावसंख्या व वाईट कामगिरी ठरली. साहिबजादा फरहान पहिल्याच षटकात हार्दिक पांड्याच्या चेंडूवर शुन्यावरच बाद झाला. त्यानंतर जसप्रीत बुमराहने त्याच्या पहिल्याच षटकात सैम अयुब (६) आणि कर्णधार सलमान अली आगा (४) यांना बाद करून पाकिस्तानचे कंबरडे मोडले. बाबर आझमलाही अक्षर पटेलने ५ धावांवर बाद केले. ४.५ षटकांत धावसंख्या त्यांची अवस्था ४ बाद ३४ अशी झाली होती आणि सामना जवळजवळ भारताच्या ताब्यात आला होता.

फिरकीच्या चर्चेत वेगवान गोलंदाजांचा ठसा

सामन्यापूर्वी, फिरकी गोलंदाजी महत्त्वाची भूमिका बजावेल अशी चर्चा होती, परंतु भारत सुरुवाती पासूनच वेगवान गोलंदाजांवर अवलंबून होता. पाकिस्तानच्या पहिल्या तीन विकेट पूर्णपणे वेगवान गोलंदाजांनी घेतल्या. आकडेवारीवरून असे दिसून येते की पॉवरप्लेमध्ये चांगल्या लांबी (६-८ मीटर) आणि शॉर्ट बॉलविरुद्ध पाकिस्तानच्या फलंदाजांना सर्वात जास्त संघर्ष करावा लागला. भारतीय गोलंदाजांनी सातत्याने योग्य क्षेत्रात गोलंदाजी केली, ज्यामुळे फलंदाजांना मुक्तपणे खेळता आले नाही.

फिरकीपटूंनी दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

ईशान किशन बाद झाल्यानंतर धावगती मंदावली. नवाज आणि उस्मान तारिक यांनी किफायतशीर षटके टाकून भारतावर दबाव आणला. कर्णधार सूर्यकुमार यादवने ३२ धावा केल्या पण मोठे फटके मारू शकला नाही. शिवम दुबे (२७) आणि तिलक वर्मा (२५) यांनी योगदान दिले, परंतु सतत विकेट पडल्यामुळे संघ शेवटच्या षटकांमध्ये मुक्तपणे खेळू शकला नाही. तिलक वर्मा चांगल्या फॉर्मात आहे मात्र मोठी खेळी करण्यात त्याला यश मिळताना दिसत नाही. त्याच्या बाबत या विश्वचषकात एक दुर्मिळ योगायोगा घडला आहे. त्याने खेळलेल्या तिनही सामन्यात त्याने प्रत्येकी २५-२५-२५ अशा धावा केल्या आहेत.

पाकच्या डावात स्थिरता नव्हतीच


उस्मान खानने पाककडून सर्वाधिक ४४ धावा, ३४ चेंडूत करताना निश्चितच आक्रमक फटके मारून प्रतिआक्रमण करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला दुसऱ्या टोकाकडून साथ मिळाली नाही. शादाब खान (१४), शाहीन आफ्रिदी (नाबाद २३) आणि फहीम अश्रफ (१०) व्यतिरिक्त इतर कोणताही फलंदाज प्रभाव पाडू शकला नाही. सात फलंदाज दुहेरी आकडी धावसंख्या गाठू शकले नाहीत. मधल्या फळीतील फलंदाज पूर्णपणे दबावाखाली असल्याचे दिसून आले. नियमित अंतराने विकेट्स पडल्या. संघाची १०.४ षटकांत ५ बाद ७३, १२.१ षटकांत ८ बाद ७७ आणि १७.६ षटकांत ११४ अशी घसरण झाली. धावगती ६.३३ होती, जी १७६ धावांच्या लक्ष्यासमोर अत्यंत कमी होती.

भारतीय गोलंदाजांची संघटीत कामगिरी
भारताकडून हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. कुलदीप यादव आणि तिलक वर्मा यांनीही प्रत्येकी एक बळी घेतला. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे भारतीय गोलंदाजांनी कोणत्याही फलंदाजाला सातत्यपूर्ण भागीदारी करू दिली नाही. सामन्याचा निकाल निश्चित झाल्यानंतर तर भारताने आपल्या दुसऱ्या फळीतील गोलंदाजांनाही गोलंदाजी देऊन सरावाची संधी दिली.

सुरुवातीच्या झटक्यानंतरही भारतीय फलंदाज वरचढ


प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने २० षटकांत ७ बाद १७५ धावा केल्या. एकवेळ संघ २०० धावा सहज करेल असे वाटत होते, परंतु मधल्या षटकांमध्ये झालेल्या अपयशामुळे धावगतीचा वेग कमी झाला. पाकिस्तानने २० पैकी १८ षटकांत फिरकी गोलंदाजांसह गोलंदाजी केली हा सामन्यातील प्रमुख चर्चेचा विषय होता. सलमान आगाने पहिल्याच षटकात अभिषेक शर्माला बाद केल्याने भारताला सुरुवातीला धक्का बसला. तथापि, नंतर ईशान किशनच्या आक्रमक दृष्टिकोनाने सामन्याचा मार्ग बदलला. तिलक वर्मासोबत मिळून त्यांनी पॉवरप्लेमध्ये जलद धावा केल्या. शाहीन आफ्रिदीच्या षटकात १५ धावा आणि शेवटच्या षटकात ११ धावा यामुळे भारत मजबूत स्थितीत आला. सहा षटकांनंतर धावसंख्या १ बाद ५२ होती व ईशान परिपूर्ण फॉर्ममध्ये दिसत होता.

ईशानने दबाव निर्माण केला


मधल्या षटकांमध्ये भारताचा डाव शिखरावर पोहोचला. अबरारच्या षटकात सलग तीन चौकार मारून इशान किशनने पाकिस्तानवर पूर्णपणे दबाव आणला. शादाब खानच्या षटकात १७ धावा मिळाल्या आणि भारत २०० च्या जवळ पोहोचेल असे वाटले. ईशानने फक्त ४० चेंडूत ७७ धावांची स्फोटक खेळी केली, ज्यामध्ये १० चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. पण १३ व्या षटकात सैम अयुबने त्याला बाद केले आणि पाकिस्तानला सामन्यात परतण्याची मोठी संधी मिळवून दिली. हाच तो वळणबिंदू होता जिथे सामना थोडासा वळला.

शेवटी रिंकूची बॅट गर्जली
डेथ ओव्हर्समध्ये भारताला जलद फिनिशिंगची आवश्यकता होती. रिंकू सिंगने चार चेंडूत ११ धावा काढून काहीसा दिलासा दिला, पण संघाला फक्त १७५ धावांपर्यंतच पोहोचता आले. एकवळ १९०-२०० धावसंख्या गाठण्याची शक्यता असलेली धावसंख्या मधल्या आणि डेथ ओव्हर्समध्ये मंदावल्याने मर्यादित राहिली.


पाकिस्तान फिरकीपटूंवर अवलंबून होता


पाकिस्तानची रणनीती स्पष्ट होती. त्यांनी २० पैकी १८ षटके फिरकीपटूंसह टाकली, ज्यामध्ये एकूण सहा फिरकीपटूंचा वापर करण्यात आला. सुरुवातीला ही रणनीती ईशानच्या आक्रमक दृष्टिकोनाविरुद्ध कुचकामी ठरली, परंतु मधल्या षटकांमध्ये फिरकी गोलंदाजांनी भारताचा वेग मंदावला. एकूणच, चांगली सुरुवात आणि मजबूत मध्य टप्प्यामुळे भारताने स्पर्धात्मक धावसंख्या नोंदवली. तथापि, मधल्या षटकांमध्ये अपयश आणि मंद धावगतीमुळे संघ मोठ्या धावसंख्येपासून कमी पडला.

या सामन्यापूर्वी पाकचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर होता, मात्र या पराभवानंतर त्यांची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली. दुर्देवाने त्यांच्या पुढील सामन्यात नामीबीयाविरूध्द बरे वाईट झाले तर त्यांची सुपर आठ मधूनही गच्छंती होस शकते. पाकच्या या पराभवानंतर संपूर्ण पाकिस्तानात सुतकी अवकळा पसरली होती. तेथील सामान्य क्रिकेट रसिक भयंकर निराश झाले होते, तर प्रसिध्दी माध्यमे, सोशल मिडीयावर संपूर्ण क्रिकेट व्यवस्थेवर आगपाखड होत आहे. एकंदर भारताकडून झालेला पराभव सर्वांच्याच जिव्हारी लागला आहे. तर भारतात त्या विरूध्द परिस्थिती असून संपूर्ण भारतीय संघावर स्तुतीसुमनांचा वर्षाव करताना कोणीही थकताना दिसत नाहीच शिवाय भारतात दुसरी दिवाळीच साजरी होतानाचे दृश्य दिसत आहे.

@डॉ.दत्ता विघावे               
     क्रिकेट समिक्षक
    मो. क्रं - ९०९६३७२०८२.
close