टी-२० विश्वचषकाच्या एका रोमांचक सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा दोन गड्यांनी पराभव केला. इंग्लंडकडून कर्णधार हॅरी ब्रुकने शतक झळकविले, ज्यामुळे संघाला लक्ष्याचा यशस्वीपणे पाठलाग करता आला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने २० षटकांत नऊ गड्यांच्या मोबदल्यात १६४ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने १९.१ षटकांत आठ विकेट्सच्या मोबदल्यात १६६ धावा करून सामना जिंकला. इंग्लंडकडून ब्रुकने सर्वाधिक १०० धावा केल्या, परिणामत: इंग्लंडला सुपर एटमध्ये सलग दुसरा विजय मिळाला.
उपांत्य फेरीत पोहोचणारा पहिला संघ
अशाप्रकारे इंग्लंडने उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले आहे, तर पाकिस्तानचा पुढचा मार्ग अत्यंत कठीण झाला आहे. पाकिस्तानचा पहिला सामना पावसामुळे वाया गेला होता आणि आता त्यांचा एक सामना शिल्लक आहे. जरी पाकिस्तानने हा सामना जिंकला तरी त्यांच्याकडे फक्त तीन गुण असतील. दरम्यान, श्रीलंका आणि न्यूझीलंडला पाकिस्तानला मागे टाकण्याची संधी असेल. ब्रूक वगळता, इंग्लंडसाठी कोणताही फलंदाज मोठा डाव खेळू शकला नाही.
या विजयाबरोबरच इंग्लंड सलग सर्वाधिक वेळा टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा संघ बनला आहे. इंग्लंड हा सलग पाचवा संघ आहे, ज्याने या बाबतीत पाकिस्तान आणि श्रीलंकेला मागे टाकले आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका सलग चार वेळा उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. इंग्लंडने सन २०१६, २०२१, २०२२, २०२४ आणि २०२६ च्या टी-२० विश्वचषकांमध्ये उपांत्य फेरी गाठली होती.
टी-२० विश्वचषकात शतक झळकावणारा पहिला कर्णधार
इंग्लंडची सुरुवात चांगली झाली नाही, शाहीन आफ्रिदीने इंग्लंडला सुरुवातीलाच तीन धक्के देत बॅकफूटला ढकलले. शाहीनने पहिल्याच चेंडूवर फिल साल्टला बाद केले, त्यानंतर जोस बटलरला दोन धावांवरच बाद केले. त्यानंतर पॉवरप्ले दरम्यान शाहीनने जेकब बेथेललाही बाद करून इंग्लंडला तिसरा धक्का दिला. बेथेल आठ धावा काढून बाद झाला. तथापि, ब्रूकने चिकाटीने खेळत जबाबदारीने डाव पुढे नेला. ब्रूकने प्रथम २८ चेंडूत अर्धशतक आणि नंतर ५० चेंडूत शतक पूर्ण केले. टी-२० विश्वचषकात शतक झळकविणारा ब्रूक हा पहिला कर्णधार बनला. शिवाय, तो सन २०१० मध्ये भारताविरुद्ध ९८ धावा करणाऱ्या ख्रिस गेलला मागे टाकत स्पर्धेत सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारा कर्णधार ठरला.
टी-२० विश्वचषकात लक्ष्याचा पाठलाग करताना शतक ठोकणारा ब्रूक चौथा फलंदाज ठरला. त्याच्या आधी सन २०१४ मध्ये अॅलेक्स हेल्सने श्रीलंकेविरुद्ध, सन२०१६ मध्ये ख्रिस गेलने इंग्लंडविरुद्ध आणि विद्यमान स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पथुम निस्सांका यांनी अशी कामगिरी केली होती. टी-२० विश्वचषकात इंग्लंडसाठी ब्रूक हा तिसरा सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे, त्यापूर्वी अॅलेक्स हेल्स नाबाद ११६* आणि जोस बटलर नाबाद १०१ यांनी शतके ठोकली आहेत.
ब्रूक व्यतिरिक्त इतर फलंदाजांचे अपयश
या सामन्यात इंग्लंडचे फलंदाज अपयशी ठरले. फक्त तीन फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. ब्रूक व्यतिरिक्त, विल जॅक्स आणि सॅम करन यांनी दुहेरी आकडा ओलांडला. विल जॅक्सने २३ चेंडूत एक चौकार आणि दोन षटकारांसह २८ धावा केल्या, तर करनने १५ चेंडूत एका चौकारासह १६ धावा केल्या. सामना शेवटपर्यंत अत्यंत रोमांचक राहिला, कारण इंग्लंडला सहा चेंडूत तीन धावांची आवश्यकता होती आणि त्यांनी आठ विकेट गमावल्या होत्या. सलमान मिर्झा शेवटच्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी आला आणि जोफ्रा आर्चरने पहिल्याच चेंडूवर चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला. पाकिस्तान कडून वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने शानदार कामगिरी करत चार विकेट्स घेतल्या, तर मोहम्मद नवाज आणि उस्मान तारिकने प्रत्येकी दोन बळी मिळाले.
पाकिस्तानकडून फरहानने अर्धशतक झळकावले
तत्पूर्वी, पाकिस्तानकडून फक्त साहिबजादा फरहानने अर्धशतक झळकविले ज्यामुळे पाकला आव्हानात्मक लक्ष्य ठेवण्यास मदत झाली. फरहानने ४५ चेंडूत ७ चौकार आणि दोन षटकारांसह ६३ धावा केल्या. पॉवरप्लेमध्ये इंग्लंडने पाकिस्तानला दोन धक्के दिले, परंतु फरहानने बाबर आझमसह तिसऱ्या विकेटसाठी ४६ धावा जोडल्या. बाबर २४ चेंडूत २५ धावा काढून बाद झाला. त्यानंतर फरहान आणि फखर जमानने चौथ्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी केली, परंतु ओव्हरटनने फरहानला बाद केले.
फरहानशिवाय, फखर जमानने २५, शादाब खानने २३, उस्मान खानने ८, सैम अयुबने ७, सलमान आघा ५ आणि शाहीन आफ्रिदीने २ धावा केल्या, तर सलमान मिर्झा २ धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडकडून लियाम डॉसनने तीन, तर जोफ्रा आर्चर आणि जेमी ओव्हरटनने प्रत्येकी दोन बळी घेतले. आदिल रशीदने एक बळी घेतला.
पाकिस्तान उपांत्य फेरीत पोहोचू शकेल का ?
आता प्रश्न असा आहे की, पाकिस्तान उपांत्य फेरीत पोहोचू शकेल का ? उत्तर हो आहे, पण मार्ग खूप कठीण आहे आणि त्याला इतर संघांवर अवलंबून राहावे लागेल. आता समीकरण पाकिस्तानच्या नियंत्रणाबाहेर आहे आणि फक्त इतर संघांचे निकाल पाकिस्तानसाठी मार्ग मोकळा करतील. शेजारी देशाचा एक तोटा असा आहे की, त्याने दोन सामने खेळले आहेत आणि आता सुपर ८ गट २ मध्ये फक्त एक सामना खेळायचा आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना पावसामुळे वाया गेला आणि दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. इंग्लंडनेही दोन सामने खेळले आहेत, तर श्रीलंका आणि न्यूझीलंडला अजूनही प्रत्येकी दोन सामने खेळायचे आहेत.
समीकरण क्रमांक १: - न्यूझीलंडने त्यांचे दोन सामने गमावले आणि पाकिस्तानने श्रीलंकेला हरवले,
पाकिस्तानचे पहिले समीकरण असे आहे की त्यांना श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवावा लागेल. तसेच श्रीलंका आणि इंग्लंडने न्यूझीलंडला हरवावे हे देखील सुनिश्चित करावे लागेल. यामुळे न्यूझीलंडला फक्त एक गुण मिळेल, तर श्रीलंकेला दोन गुण मिळतील. पाकिस्तानने श्रीलंकेवर विजय मिळवला तर त्याचे तीन गुण होतील. यामुळे न्यूझीलंड आणि श्रीलंकेचे नाव बाद होईल आणि पाकिस्तान इंग्लंडसह पात्र ठरेल. पाकिस्तानसाठी हे सर्वात सोपे समीकरण आहे.
समीकरण क्रमांक २ : - जर न्यूझीलंडने एक सामना जिंकला तर पाकिस्तानचा मार्ग कठीण होईल, पण अशक्य नाही. जर न्यूझीलंडने त्यांच्या दोन सामन्यांपैकी एकही सामना जिंकला तर पाकिस्तानचा मार्ग कठीण होईल, पण तरीही त्यांना संधी आहे. न्यूझीलंडचा सध्याचा नेट रन रेट शून्य आहे. त्यांचा पुढचा सामना आज श्रीलंकेविरुद्ध आणि त्यानंतर २७ तारखेला इंग्लंडविरुद्ध आहे.
जर न्यूझीलंडने श्रीलंकेला हरवले तर त्यांचा नेट रन रेट सकारात्मक होईल. दरम्यान, पाकिस्तानचा नेट रन रेट -०.४६१ आहे. त्यानंतर पाकिस्तानला खात्री करावी लागेल की, न्यूझीलंड मोठ्या फरकाने जिंकू नये, किंवा न्यूझीलंड श्रीलंकेविरुद्ध जिंकू नये आणि इंग्लंडविरुद्ध हरू नये. यामुळे त्यांचा नेट रन रेट थोडा कमी होईल. पाकिस्तानचा फायदा असा आहे की त्यांचा शेवटचा सुपर ८ चा सामना २८ फेब्रुवारी रोजी श्रीलंकेविरुद्ध आहे. न्यूझीलंडने त्यांचे सर्व सुपर ८ सामने पूर्ण केले असतील आणि त्यांना न्यूझीलंडच्या नेट रन रेटला मागे टाकण्यासाठी किती षटके किंवा धावा जिंकायच्या आहेत याची कल्पना असेल. तथापि, जर पाकिस्तान श्रीलंकेविरुद्ध एका धावेनेही हरला तर त्यांचा खेळ संपेल.
जर न्यूझीलंड श्रीलंकेविरुद्ध हरला आणि इंग्लंडविरुद्ध मोठा विजय मिळवला, तर त्यांचा नेट रन रेट अजूनही वाढेल. तथापि, पाकिस्तानला २८ फेब्रुवारी रोजी त्यांचा शेवटचा ग्रुप २ सामना खेळण्याचा फायदा होईल. एकंदर बघता इंग्लंडविरुद्धच्या पराभवाने पाकच्या पुढच्या प्रवासाला सुरूंग लागला एवढे मात्र नक्की !
@डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक
मो. क्रं - ९०९६३७२०८२.

