पोलीस आणि मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार आणि कौतुकाचा वर्षाव
शिर्डी प्रतिनिधी:
सध्याच्या धावपळीच्या आणि स्वार्थी जगात प्रामाणिकपणा हरवत चालला आहे की काय, अशी शंका अनेकदा उपस्थित केली जाते. मात्र, श्री साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिर्डीत एका कर्मचाऱ्याने दाखवलेल्या अतुलनीय प्रामाणिकपणामुळे माणुसकी आणि तत्त्वनिष्ठा आजही जिवंत असल्याची प्रचिती आली आहे. दर्शन रांगेजवळ एका साई भक्ताचे हरवलेले, रोख रक्कम आणि अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज असलेले पाकीट मूळ मालकाला सुरक्षितपणे परत करण्यात आले असून, या स्तुत्य उपक्रमाबद्दल सर्वत्र जोरदार चर्चा आणि कौतुक होत आहे.
साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीच्या मालपुरवठा विभागात कार्यरत असलेले तसेच 'साईश्रद्धा प्रतिष्ठान'चे संस्थापक व अध्यक्ष माननीय श्री. संजय महाजन हे नेहमीप्रमाणे आपल्या कर्तव्यावर हजर होते. मंदिर परिसरातील स्टॉल नंबर १३ (फुलहार दुकानाजवळ)उभे असताना, त्यांच्या निदर्शनास एक बेवारस पडलेले पाकीट आले.
त्यांनी तत्काळ ते पाकीट उघडून पाहिले असता, त्यामध्ये काही रोख रक्कम, एटीएम कार्ड आणि भक्ताची अत्यंत महत्त्वाची वैयक्तिक कागदपत्रे असल्याचे त्यांना आढळून आले. बाहेरगावाहून आलेल्या एखाद्या भाविकाचे हे पाकीट हरवल्यामुळे त्याची किती मोठी गैरसोय आणि घालमेल होत असेल, याची जाणीव ठेवून श्री. संजय महाजन यांनी क्षणाचाही विलंब न लावता ते पाकीट सुरक्षितपणे संस्थानच्या संरक्षण कार्यालयात जमा केले. त्यांच्या या तत्परतेमुळे आणि प्रामाणिकपणामुळे संबंधित साई भक्ताला त्याचे हरवलेले पाकीट सर्व ऐवजासह सुखरूप परत मिळाले. श्री साईबाबा संस्थानने रीतसर 'आभारपत्र' देऊन त्यांच्या या कृतीची नोंद घेतली आहे.
आदरणीय श्री. संजय महाजन यांनी दाखवलेला हा प्रामाणिकपणा केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित नसून, तो संपूर्ण साईबाबा संस्थानच्या आणि शिर्डीच्या लौकिकात भर घालणारा आहे. त्यांच्या या निस्वार्थी कार्याची दखल घेत विशेष त्यांचा सन्मान करण्यात आला.
या सत्कार प्रसंगी श्री साई संस्थान एम्पलॉइज सोसायटीचे चेअरमन श्री. विठ्ठलराव पवार, ज्येष्ठ पत्रकार प्रमोदजी आहेर, पोलीस उपनिरीक्षक रोहिदासजी माळी आणि संचालक रामजी गागरे आदी मान्यवर आवर्जून उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या हस्ते श्री. महाजन यांना शाल आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
सर्वत्र होतेय कौतुकाचा वर्षाव:
बाबांच्या दरबारात सेवा करताना 'श्रद्धा आणि सबुरी' या तत्त्वांचे पालन करणे हेच आमचे कर्तव्य आहे," अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. पैशांचा मोह न ठेवता भाविकांचे नुकसान टाळणाऱ्या संजय महाजन सर यांच्या या कृतीने अनेकांसमोर एक मोठा आदर्श निर्माण केला आहे. सोशल मीडियासह संपूर्ण शिर्डी परिसरात आणि साई भक्तांमध्ये सध्या या घटनेची विशेष चर्चा रंगली असून, श्री. महाजन यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.

