शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह:-
पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव येथे वारंवार होणाऱ्या विज खंडित समस्येमुळे ग्रामस्थांचा संयम सुटला असून या गंभीर प्रश्नावर नागरिकांनी तीव्र आंदोलन छेडले. गावातील मार्गदर्शक रवींद्र उर्फ भोरू म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी महावितरणच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला. तसेच या संदर्भात पोलीस स्टेशनलाही निवेदन देण्यात आले.
कोरडगाव हे पाथर्डी तालुक्यातील मोठ्या बाजारपेठेचे गाव मानले जाते. मात्र इतक्या महत्त्वाच्या गावात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. महावितरण कार्यालयाच्या हलगर्जीपणामुळेच ही समस्या निर्माण होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी यावेळी केला. सतत होणाऱ्या वीज खंडितामुळे व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे, तर विद्यार्थीवर्गालाही त्याचा मोठा फटका बसत आहे.
सध्या दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू असताना गावात वारंवार अंधार पडत असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास करणे कठीण झाले आहे. याशिवाय शेतीसाठी लागणाऱ्या वीजपुरवठ्याच्या अभावामुळे शेतकऱ्यांनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दिवसभर वीज नसल्याने पिकांना पाणी देणे कठीण होत असून शेती उत्पादनावरही त्याचा परिणाम होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली.
गावात वारंवार अंधार पडत असल्यामुळे चोरट्यांना देखील संधी मिळत असून घरफोड्यांच्या घटनांची भीती वाढली असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. त्यामुळे कोरडगावमध्ये तात्काळ सुरळीत वीजपुरवठा सुरू करावा, तसेच गावासाठी दोन नवीन डीपी बसवाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी जोरदारपणे मांडली. यासोबतच गावासाठी कायमस्वरूपी एक अधिकारी आणि एक वायरमनची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणीही पुढे आली. सध्या वायरमन वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे किरकोळ बिघाडही अनेक तास तसेच राहतात, अशी नाराजी नागरिकांनी व्यक्त केली.
महावितरण प्रशासनाने तात्काळ या प्रश्नाकडे लक्ष द्यावे, अन्यथा मंगळवार दिनांक १७ मार्च २०२६ रोजी कोरडगाव येथे रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी यापूर्वी दिला होता.
आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन महावितरणचे कनिष्ठ अभियंता गणेश सांगळे यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी दोन ते तीन दिवसांत सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आंदोलन तात्पुरते मागे घेतले.
या आंदोलनात रवींद्र उर्फ भोरू म्हस्के, प्रताप देशमुख, स्वराज बोंद्रे, सुनील शिंदे, नवनाथ वाळके, काकासाहेब देशमुख, त्रिंबक देशमुख, युन्नूसभाई शेख, अनिल ससाने, सुदर्शन काकडे, अरुण मुखेकर, सोपान भिंगारे, अमोल काकडे, शुभम टुपके, जालिंदर मुखेकर, संतोष कुसळकर, विलास मुखेकर यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

